सर्पगंधा : (म. हडकी हिं. छोटाचांद क. चंद्रिका, शिवनाभिबळ्ळी सं. सर्पगंधा, जाकुली, सर्पाक्षी, चंद्रिका इं. राऊवोल्फिया रूट, सर्पेंटाइन-सर्पेंटिना रूट लॅ. राऊवोल्फिया सर्पेंटिना कुल-ॲपोसायनेसी). फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ही एक औषधी दृष्टया फार महत्त्वाची वनस्पती असून हिचे लॅटिन प्रजातिनाम राऊवोल्फिया हे लेओनार्ट राऊवोल्फ ह्या सोळाव्या शतकातील जर्मन वनस्पतिशास्त्रज्ञ व वैदय यांच्या स्मरणार्थ दिले आहे हिचे जातिवाचक अथवा गुणनाम सर्पेंटिना हे संस्कृत ‘सर्पगंधा’ यावरून घेतलेले दिसते इंगजी नावेही त्यावरूनच पडलेली दिसतात. ह्या प्रजातीत एकूण १०० जाती असून भारतात फक्त पाच जाती आढळतात. त्यांपैकी ही एक भारतात आयात झालेली असून तिचे स्वाभाविकीकरण (स्थानिक निसर्गाशी समरस होऊन जाणे) झाले आहे. सर्वच जाती ओषधीय [लहान व नरम → ओषधी] किंवा झुडपे (क्षुप) असून त्या चिकाळ (दुधाळ) व गुळगुळीत असतात.

आ. १. सर्पगंधा (राऊवोल्फिया सर्पेंटिना ) : पानाफुलोऱ्यासह फांदी.वनस्पतिवर्णन : सर्पगंधा हे सरळ वाढणारे उपक्षुप (लहान झुडूप), बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे), सु. १५-४५ सेंमी. (जास्तीत जास्त ९० सेंमी.) उंच असून त्याचे प्रधानमूळ मांसल, नरम व कधीकधी अनियमितपणे गाठाळ असते. खोडाची साल फिकट तपकिरी, त्वक्षायुक्त [बुचासारख्या पदार्थांनी भरलेल्या कोशिका-पेशी-असलेली → त्वक्षा] व भेगाळ असते. पाने साधी, प्रत्येक पेऱ्यावर तीनच्या झुपक्यात, मोठी ७·५-१७·५ × ४·३-६·८ सेंमी., दीर्घवृत्ताकृती, कुंतसम (भाल्या-सारखी) किंवा व्यस्त अंडाकृती (अंड्याच्या उलट आकारांची), टोकदार किंवा लांबट टोकांची, वरच्या बाजूस गर्द हिरवी पण खाली फिकट हिरवी असतात. पांढरी किंवा लालसर व १·५ सेंमी. लांब फुले अनेक व वल्ल्री प्रकारच्या [→ पुष्पबंध] फुलोऱ्यावर पानांच्या बगलेत मार्च- मेमध्ये येतात. फुलातील संवर्त (पाकळ्यांखालचा भाग) व देठ लालभडक पुष्पमुकुट नलिकाकृती व तळाजवळ अरूंद आणि वर फुगीर फळाचे दोन भाग, प्रत्येकी एकबीजी अश्मगर्भी (बाठायुक्त) असून पूर्ण फळ लंबगोल व तिरपे, ०·६ सेंमी. व्यासाचे, जांभळट काळे व त्याचे भाग काहीसे जुळलेले असतात बिया बारीक अंडाकृती व सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या) असून याची इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨पोसायनेसीत (अथवा करवीर कुलात) वर्णन केल्यापमाणे असतात.

प्रसार : ह्या झुडपाचा प्रसार भारतात उपहिमालयाच्या प्रदेशात पंजाब ते पूर्वेकडे नेपाळ, सिक्कीम व भूतानपर्यंत, आसामात, गंगेच्या मैदानी प्रदेशातील खालच्या टेकड्यांत, पूर्व व पश्चिम घाटांत, मध्य प्रदेशातील काही भागांत व अंदमान बेटांत झालेला आढळतो. भारताबाहेर बांगला देश, श्रीलंका, म्यानमार (बह्मदेश), मलाया, थायलंड आणि जावा येथेही याचा प्रसार झालेला आहे. समुद्रसपाटीपासून ते सु. १,२०० मी. उंचीपर्यंत असलेल्या ओलसर व पानझडी जंगलात ही झुडपे बहुधा आढळतात उघडयावर किंवा सदापर्णी (सदाहरित) जंगलात ती क्वचित दिसतात फार तर त्यांच्या सीमेवर असतात. साल, वड, पिंपळ, ऐन, अर्जुन, कुडा, कासूद, कासोदा, शिसवी, आंबा, हेदी इत्यादींच्या सावलीत ती विशेषकरून दिसतात. तसेच कधीकधी वेताच्या बेटांमधूनही आणि दक्षिण पठाराच्या परिसरात बांबूंच्या वनांतही ती आढळतात. मनुष्यवस्तीच्या आसपास व रूळलेल्या मार्गाकडेने त्यांचा आढळ असतो.

लागवड : हल्ली भारतात उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, पश्चिमबंगाल, आसाम, आंध प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र इ. राज्यातून सर्पगंधेच्या मुळांचा व्यापारी दृष्टया पुरवठा केला जातो. औषधी दृष्टया सर्पगंधेची मुळे महत्त्वाची असल्याने तिची लागवड करून मुळांचा पुरवठा औषधोदयोगाला केला जातो. अमेरिका व यूरोपातील अनेक देशांना ह्या मुळांचा व मुळातून काढलेल्या रासायनिक द्रव्याचा (राऊवोल्फियांचा) व तसेच ‘रिसर्पीन’ (रिसर्पीन) ह्या प्रमुख ⇨ अल्कलॉइडा चा पुरवठा बव्हंशी भारतातूनच होतो यांशिवाय पाकिस्तान, म्यानमार, थायलंड व श्रीलंका येथूनही तो होतो. वाढत्या मागणीमुळे स्थानिक जंगली वनस्पतींच्या पुरवठयावर फार ताण पडून जंगलातील मूळ वनस्पतींची संख्या झपाटयाने कमी होऊ लागली. त्यामुळे भारतात औषधी द्रव्याच्या निर्यातीवर शासकीय नियंत्रण घालून वनस्पतीच्या नैसर्गिक वाढीला संरक्षण दयावे लागले. त्याचा परिणाम जगातील भिन्न बाजारांवर होऊन कच्च्या औषधी द्रव्याकरिता राऊवोल्फिया प्रजातीतील इतर काही जातींचा (विशेषत: अमेरिकेत रा. टेट्रॅफिला व आफ्रिकेत रा. व्हॉमिटोरिया यांचा) वापर सुरू झाला आहे. भारतात नैसर्गिक रीत्या वाढलेल्या सर्पगंधा वनस्पतींचे संरक्षण व योग्य प्रमाणात तिचा उपयोग, याबरोबरच नवीन लागवड करून मागणीप्रमाणे पुरवठा इत्यादींसंबंधी शासन प्रयत्नशील आहे. तसेच अनेक राज्यांत प्रायोगिक संशोधन करून लागवड, प्रसार व उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. ओरिसातील एका कारखान्यात कच्च्या मालावर संस्कार करून पक्का माल बनविण्याची प्रकिया सुरू आहे.


 राऊवोल्फिया : सर्पगंधेच्या मांसल पण सुकलेल्या मुळांनाच राऊवोल्फिया हे व्यापारी नाव आहे. ही मुळे फार कडू, उष्ण व कृमिनाशक असून त्यांना वास नसतो. ती सु. ४० X २ सेंमी., काहीशी वेडीवाकडी, सुरकुतलेली, खरबरीत असून त्यांवर उभ्या रेषा असतात त्यांवरची साल भुरकट पिवळी ते तपकिरी रंगाची असून त्यांतील लाकडाचा भाग फिकट पिवळा असतो. भारतीय व ब्रिटिश औषधिकोशात त्यांना अधिकृत स्थान असून त्यांचे रंगरूप व त्यांतील रासायनिक द्रव्यांचे प्रमाण यांबद्दल निश्चित नियम नमूद आहेत. साधारणपणे ३-४ वर्षे वयाच्या वनस्पतींचीच मुळे (सालीसकट) शरद ऋतूत जमा करून ती हवेतच सुकविली जातात. त्यांमध्ये एकूण अल्कलॉइडे ०·८% आणि विजातीय पदार्थ २·०% असतात. मुळात एकूण अल्कलॉइडे २·३% आणि सालीत ४·१३%, तसेच पाने व खोड यांत सु. ०·५% असतात, असेही नमूद असल्याचे आढळते. ब्रिटिश औषधिकोशाप्रमाणे त्यांमध्ये किमान ०·१५% ‘रेसर्पिनांसारखी ’ अल्कलॉइडे असावी लागतात. मुळांचा पातळ अर्क, सुका अर्क आणि अल्कोहॉली अर्क भारतीय औषधिकोशाने मान्य केले आहेत. [→ औषधनिर्मिति].

आ. २. सर्पगंधेची ताजी मुळे

औषधी उपयोग : भारतात सु. ४००० वर्षांपूर्वीपासून राऊ-वोल्फियाचा वापर चालू आहे. चरक कल्पम या गंथात सर्पगंधाचा उल्लेख आला आहे. मध्यवर्ती तंत्रिका तंत्रासंबंधीच्या [मज्जासंस्थेशी निगडित → तंत्रिका तंत्र] विविध तकारींवर त्याचा वापर केला जातो उदा., चिंतोन्माद, क्षोभ, उद्दीपन विकृती, चित्तविकृती, छिन्नमानस, चित्तभम, निद्रानाश, अपस्मार इत्यादी. अलीकडे राऊवोल्फिया व त्यापासून काढलेली रसायने महत्त्वाची चिकित्साविज्ञानीय माध्यमे बनलेली असून त्यांचा वापर संमोहक, शामक (शांत करणारे) व अतिरिक्त रक्तदाबरोधक म्हणून केला जातो. राऊवोल्फियात महत्त्वाचे कियाशील अल्कलॉइड ‘रेसर्पीन’ असते व्यापारी प्रमाणावर त्याचे उत्पादन रा. व्हॉमिटोरियारा. टेट्रॅफिला यांपासून करतात. सर्पेंटिनापेक्षा व्हॉमिटोरिया जातीतून रेसर्पीन दुप्पट प्रमाणात मिळते. राऊवोल्फियाच्या अर्काचा उपयोग आंत्रविकार म्हणजे आतड्यांचे विकार (अतिसार व आमांश) व कृमिविकार यांवर करतात. पटकी, शूल व ताप यांवरही इतर औषधी अर्काबरोबर देतात. गर्भाशयाच्या आकुंचनाकरिता प्रसूतिपूर्व उत्तेजक औषध म्हणून हे वापरीत होते. डोळ्यांतील स्वच्छमंडलाच्या अपारदर्शकत्वासाठी याच्या पानांचा रस वापरला जात असे परंतु या औषधाचा उपयोग श्वासनलिकादाह, दमा व आंत्रवण असलेल्या रूग्णांवर करीत नाहीत. राऊवोल्फियाच्या (मुळांच्या) सालीत सु. ९०% अल्कलॉइडे असतात लाकडात फार कमी असतात. खोडात व पानांत त्यामानाने फार कमी आढळतात. वनस्पतींच्या पानगळीच्या वेळी मुळांतील अल्कलॉइडे जास्त प्रमाणात असून पुन्हा पाने येते वेळी ती फार कमी प्रमाणात असतात. कॉल्पिसाइनाच्या प्रभावाने (रंगसूत्रे संख्येने वाढल्याने) एकूण अल्कलॉइडांचे प्रमाण अधिक होते तथापि काही प्रयोगांत रेसर्पिनाचे प्रमाण वाढलेले नव्हते. एकूण सु. ८० भिन्न अल्कलॉइडेभिन्न जातींत मिळून आढळली आहेत. भिन्न ठिकाणी निर्मिती केलेल्या मुळांत भिन्न अल्कलॉइडांचे प्रकार व प्रमाण भिन्न असते. औषधाच्या संदर्भात त्यांत दोन प्रकार (रेसर्पीन गट व अजमलीन गट) केले आहेत. औषधिविज्ञानीय दृष्टया रेसर्पीन महत्त्वाचे व बहुतेक सर्व जातींत आढळते. मध्यवर्ती तंत्रिका तंत्रावर त्याचा अवसादी परिणाम होतो (रक्तदाब कमी होतो व शांतपणा येतो) वर उल्लेख केलेल्या मनोविकार व शरीरदोषांखेरीज इतर कित्येक शारीरिक तकारींवर रेसर्पीन देतात [→औषधिक्रियाविज्ञान]. कोंबडयांना पोषणक्षमता वाढविण्यास व त्यांची चांगली वाढ होण्यास त्यांच्या खादयांतून हे देतात. राऊवोल्फियात रेसर्पिनाखेरीज पुढील इतर अल्कलॉइडे असतात : डी-सर्पिडीन रिसेनामीन, रेसर्पीनीन, सर्पेंटाइन, सर्पेंटिनीन, सर्पाजीन, अजमलीन, आयसोअजमलीन, रॉल्फीनीन इत्यादी. भारतीय बाजारात राऊवोल्फियायुक्त औषधे भिन्न नावांनी मिळतात उदा., चूर्ण, सुका व पातळ अर्क इत्यादी. परदेशी बनविलेल्या मालात यांशिवाय निर्भेळ रेसर्पीन भिन्न मात्रांत असलेल्या गोळ्या, एलिक्झिर व इंजेक्शने (अंत:क्षेपणे ) अशा स्वरूपांत मिळतात. सर्पेंटिनाच्या बियांत कमी प्रमाणात भिन्न अल्कलॉइडे असतात. [→अल्कलॉइडे].

अभिवृद्घी व वाढ : सर्पेंटिनाची नैसर्गिक वाढ विविध प्रकारच्या जमिनींत व हवामानांत होते तथापि सर्वसाधारणत: लागवडीच्या दृष्टीने काही विशिष्ट बाबी लक्षात ठेवणे जरूर आहे. प्रत्यक्ष तीव उन्हाच्या प्रकाशाचा त्रास त्याला होतो हे निश्चित नैऋत्य मॉन्सूनच्या पावसाच्या क्षेत्रातील उष्ण व उपोष्ण पट्टयांच्या प्रदेशातील हवामानात त्याची वाढ व प्रसार चांगला असतो. उत्तर उपहिमालयी प्रदेशांपेक्षा दक्षिण द्वीपकल्पातील ज्या प्रदेशांत हवामान सर्वसाधारणपणे वर्षभर साधारण सारखे असते, तेथे याची लागवड चांगली व फायदेशीर होते. सु. १०°-३८° से. तापमान याला सुयोग्य असते. कमी पावसाच्या प्रदेशात कालव्याच्या पाण्यावर कोरड्या ऋतूत याची लागवड यशस्वी होऊ शकते. लागवडीतील जमिनीला नायट्रोजनयुक्त खते, कंपोस्ट व शेणखत दिल्यास याची वाढ चांगली होते. दुमट सकस जमिनीला निचरा चांगला असणे आवश्यक असते तथापि त्यापेक्षा काळ्या, कठीण व दुमट जमिनीत किंवा लाल जांभ्या जमिनीत याची वाढ अधिक चांगली होते मुळे अधिक जाड (ग्रंथिल) बनतात. सर्पगंधाची अभिवृद्धी बिया, छाटकलमे व मुळांचे तुकडे किंवा ठोंब लावून करतात. बियांपेक्षा कलमे लावून लागवड करणे अधिक स्वस्त असतेच, शिवाय बियांतून (काही जाती स्वयंवंध्य असल्याने) अन्य प्रकारांतील दोष येण्याचा संभव असतो. या वनस्पतीचे एकरी उत्पादन ६-७ क्विंटल मुळे (क्वचित अधिक) असल्याचे नमूद आहे. सर्कोस्पोरा, आल्टरनॅरिया इ. अनेक कवकांपासून याच्या पानांवर ठिपके येतात व पानगळ होते वाढ खुंटते. केवडा रोग व मुळांवरील गाठी आणि काही कीटक यांचाही उपद्रव याला होतो. योग्य ती ⇨ कवकनाशके व ⇨ कीटकनाशके वापरून पीक वाचविता येते. बाजारातील मालात मुळांबरोबर खोड व फांदयांची व इतर काहींत वनस्पतींची भेसळ करतात, त्यामुळे सावधगिरीने उपयोग करावा लागतो.

पहा : ॲपोसायनेसी मुंगूसवेल.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials Vol. VIII, New Delhi, 1969. 

             2. Jain, S. K. Medicinal Plants, New Delhi, 1968. 

            3. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. II, New Delhi, 1975.

            ४. जोशी, वेणीमाधवशास्त्रीआयुर्वेदीयमहाकोश : द्वितीयखंड,मुंबई, १९६८

            ५. देसाई, वा.ग.ओषधीसंगह,मुंबई, १९७५.

जमदाडे, ज.वि. परांडेकर, शं.आ.

सर्पगंधा (राऊवोल्फिया सर्पेंटिना) फांदी.