मुसळी, काळी : (हिं., गु. काली मुसली हिं. मुसली कंद क. नेला तटिगडे सं. भूमितला, दीर्घ कंदिका, मुसली लॅ. कुर्कुलिगो ऑर्किऑइडस कुल-ॲमारिलिडेसी). ही लहान ⇨ ओषधी एकदलिकित (बीजात एकच दल असलेल्या) वर्गातील फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग], असून फिलीपीन्स, जावा व भारत (आसाम, प. द्वीपकल्प, बंगाल इ.) येथे सामान्यपणे सर्वत्र आढळते. पावसाळ्याच्या सुरुवातीस हिची लहान रोपटी उगवतात. या बहुवर्षायू (अनेक वर्षे लागणाऱ्या) वनस्पतीचे मूलक्षोड [जमिनीतील व मुळे धारण करणारे खोड ⟶ खोड], जाडजूड असते. मुळे लांबट व मांसल असतात. पाने बिनदेठाची, साधी, लांबट व भाल्यासारखी, पातळ, चुणीदार व १५–४५ X २·५ सेंमी. असून त्यांचा जमिनीवर झुबका दिसतो. फुलोऱ्याचा दांडा, आखूड, सपाट व जाड आणि पानांच्या आवरक (वेढणाऱ्या) तळात लपलेला असून त्यावर फुलोरा [मंजरी ⟶ पुष्पबंध], मे ते जूनमध्ये येतो. फुले लहान, सच्छद (तळाशी लहान उपांगे असलेली), पिवळी, फुलोऱ्याचा फक्त तळाजवळ द्विलींगी, इतरत्र सर्व पुल्लिंगी असतात. परिदले (फुलातील देठाजवळची पानासारखी सपाट दले) सहा व केसाळ आणि केसर दले (पुं-केसर) सहा व आखूड असतात. किंजपुट लहान, अधःस्थ आणि तीन कप्प्यांचा असून बीजके ६–८ असतात. परिदले व किंजपुट यांमध्ये लहान देठासारखा भाग असतो. पुं-पुष्पात फक्त सहा केसरदले असतात [⟶ फूल]. लहान चंचुयुक्त बोंड फळ (१३ मिमि. लांब) जमिनीलगत असून त्यात १–४, काळी, चकचकीत, आयत आणि खाचदर बीजे असतात. नवीन उत्पत्ती अपप्ररोह (तळाशी जमिनीवर आडवी वाढणारी आखूड फांदी) व बीजे यांच्यामुळे होते. ह्या वनस्पतीची इतर सामान्य लक्षणे ⇨ ॲमारिलिडेसीत वा मुसली कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात.
2. Kirtikar, K. R. Basu, B. D. The Indian Medicinal Plants, Part IV, New Delhi, 1975.
जगताप, अहिल्या पां. परांडेकर, शं. आ.
“