कासे गवत : (हिं. कास सं. व गु. काश गु. कांसडो इं. थॅच ग्रास लॅ. सॅकॅरम स्पाँटॅनियम कुल-ग्रॅमिनी). उसाच्या वंशातील हे सहा मी. उंच, मोठे, राठ, सरळ वाढणारे बहुवर्षायू (अनेक वर्षं जगणारे) व उपयुक्त गवत [→ ग्रॅमिनी] भारतात व पाकिस्तानात सर्वत्र, शिवाय श्रीलंका, द. यूरोप, पू. ऑ‌स्ट्रेलिया व आफ्रिकेतील उष्ण प्रदेश येथेही आढळते. खोड उभे, भरीव, गुळगुळीत व फुलोऱ्याजवळ लवदार पाने सपाट, राठ, चिवट, लांब, रेखीय, ०⋅३—०.८ x ३०—७५ सेंमी. आवरक (खोडास वेढणारा पानाचा देठ) गुळगुळीत व जिव्हिका पापुद्र्यासारखी परिमंजरी व तिच्या खालच्या भागांवर रेशमी व रुपेरी केसांचे आवरण असते. कणिशके प्रशूकहीन (कुसळहीन), एकपुष्पी, द्विलिंगी [→ पुष्पबंध फूल] फुले ऑक्टोबर-नोव्हेंबरात येतात. बी भरपूर तयार होते. बहुधा ओल्या जागी याची बेटे आढळतात. मूलक्षोडापासून (जमिनीतील खोडापासून) नवीन उभी खोडे वाढतात, पाने व देठ छपरे, चटया, तट्टे, दोऱ्या, झाडू इत्यादींकरिता वापरतात. खोड कागदाच्या लगद्याकरिता, लेखण्या व झाडूकरिता व कोवळेपणी सर्वच भाग म्हशींना चाऱ्याकरिता उपयोगात आहेत. सारक, वाजीकर (कामोत्तेजक), रक्तदोषनाशक, पित्तविकारनाशक इ. औषधी गुण या वनस्पतीत आढळतात. रेताड जमिनीस स्थिरपणा आणण्यास हिची लागवड करतात भूमध्यसामुद्रिक प्रदेशात कुंपणाकरिता लावतात.

पहा : ऊस गवते.

ठोंबरे, म. वा.