भुरी : (मिल्ड्यू). कवकांमुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे) वनस्पतींना निरनिराळे रोग होतात व त्यांच्या लक्षणांवरून त्यांची नावे प्रचारात आली आहेत. त्यांपैकी भुरी हा एक वनस्पतीरोग आहे. या रोगात वनस्पतीच्या पृष्ठभागावर कवकाच्या वाढीचा थर आढळून येतो. भुरी रोगाचे लव भुरी व चूर्ण भुरी असे दोन प्रकार आहेत.

लव भुरी : (डाउनी मिल्ड्यू). कवकांच्या ⇨फायकोमायसिटीज वर्गातील पेरोनोस्पोरेसी कुलातील कवकांमुळे निरनिराळ्या वनस्पतींवर हा रोग आढळून येतो. लक्षणांवरून निरनिराळ्या पिकांत या रोगाला लव भुरी, केवडा, गोसावी अशी नावे प्रचलित आहेत. रोगकारक कवक सदापरजीवी (अनिवार्यपणे इतर जीवांवर उपजीविका करणारे) असून त्यांची वाढ वनस्पतीच्या अंतर्भागात होते आणि त्वग्रंध्रांतून (बाह्यत्वचेतील सूक्ष्म छिद्रांतून) विबीजुकदंड आणि विबीजुके (अथवा बीजुककोशदंड आणि बीजुककोश) बाहेर पडतात [⟶कवक]. पोषकाच्या (आश्रयी वनस्पतीच्या) पृष्ठभागावरील ही वाढ मऊ केसांप्रमाणे (लवदार) दिसते. यावरून या रोगाला लव भुरी असे नाव पडले आहे. रोगग्रस्त पानांवर ही वाढ खालच्या बाजूवर दिसून येते. कवकाची रंदुके (दोन प्रजोत्पादक कोशिकांच्या-पेशींच्या-संयोगाने बनलेली बीजुके) पोषकाच्या अंतर्भागात तयार होतात. कवकतंतू आंतरकोशिकी (दोन कोशिकांच्या मधील भागात) असून त्यांचे बोटासारखे शोषक भाग कोशिकांत प्रवेश करून कोशिकांतून पोषकद्रव्याचे शोषण करतात. विबीजुकाचे अंकुरण चरबीजुकांद्वारे (केसासारख्या साधनाच्या साहाय्याने पाण्यात हालचाल करू शकणाऱ्या बीजुकांद्वारे) अथवा जनित्रनलिकांद्वारे होते. अंकुरणासाठी पोषकाच्या पृष्ठभागावर पाण्याचा पातळ थर असणे अत्यंत आवश्यक असते.

पेरोनोस्पोरेसी कुलातील कवकांमुळे होणारे रोग हे खऱ्या अर्थाने लव भुरी रोग आहेत परंतु काही वनस्पतीरोगशास्त्रज्ञ व बटाट्याचा गरवा करपा रोग [⟶बटाटा] या रोगाचाही लव भुरी रोगात समावेश करतात. पेरोनोस्पोरेसी कुलातील स्क्लेरोस्पोरा, प्लास्मोपॅरापेरोनोस्पोरा ह्या तीन वंशातील कवकांमुळे महत्त्वाच्या पिकांवर लव भुरी रोग होतो.

भारतात द्राक्ष, ज्वारी, बाजरी व वाटाणा या पिकांवर लव भुरी रोग प्रामुख्याने आढळून येतो. मोहरी, कोबी, फुलकोबी, मुळा, सलगम व कांदा या आणि कुकर्विटेसी कुलातील (काकडी कुलातील) पिकांवरही हा रोग आढळून येतो.

द्राक्ष : वेलाच्या रसाळ फांद्यावर हा रोग दिसून येतो. याला ‘केवडा’ [⟶केवडा रोग ] असेही प्रचलित नाव आहे. रोगामुळे पाने व फांद्या वाळतात व फळे तडकतात अथवा कुजतात. रोगाची सुरुवात पानांच्या वरच्या बाजूवर लहान हिरवट पिवळ्या ठिपक्यांच्या स्वरूपात होते. हे ठिपके आकारमानाने वाढतात आणि तपकिरी रंगाचे होतात. हवा दमट असल्यास पानांच्या खालच्या बाजूवर पांढरट रंगाची कवकाची लवदार वाढ आढळून येते. काही दिवसांनी पाने वाळतात, ठिसूळ बनतात व नंतर गळून पडतात. मोठ्या प्रमाणावर पाने गळाल्यास फळे सुरकुततात व कुजतात. थंड, ढगाळ व दमट हवा या रोगाच्या वाढीसाठी पोषक असते. कोरड्या व उष्ण हवेत हा रोग वाढू शकत नाही.

रोगट पाने, फांद्या व फळे गोळा करून जाळणे आणि छाटणीनंतरच्या नवीन फुटीवर १% बोर्डो मिश्रण अथवा इतर ताम्रयुक्त कवकनाशक फवारणे या उपायांनी या रोगाचे नियंत्रण करता येते. कवकनाशकाची किती वेळा फवारणी करावयाची हे मुख्यतः हवामानावर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे पहिली फवारणी फांद्या १५ ते २० सेंमी. लांब असताना, दुसरी फवारणी वेल फुलावर येण्याच्या सुमारास आणि फळांच्या रंग बदलण्याच्या सुमारास करतात. [⟶द्राक्ष].

बाजरी : (केवडा, गोसावी रोग). रोगाची महत्त्वाची व ठळक लक्षणे कणसांत आढळून येतात. दाण्याऐवजी तेथे पिळवटलेल्या हिरवट पानांसारखी वाढ दिसून येते व कणसाचा सर्व अथवा काही भाग अशा प्रकारच्या वाढीने व्याप्त होतो. यामुळे रोगट कणीस हिरवे दिसते. या लक्षणावरून या रोगाला इंग्रजीत ‘हिरव्या कणसाचा रोग’ अशा अर्थाचे नाव पडले आहे. मराठीतील ‘गोसावी रोग’ हे नावही याच लक्षणावरून पडले आहे. बऱ्याच वेळा उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पुढील हंगामात हा रोग बाजरीच्या रोपट्यांवर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. रोगट रोपट्यांची पाने पांढरट रंगाची (केवड्याच्या पानासारखी) होतात म्हणून या रोगास ‘केवडा’ हेही नाव पडले आहे.

आ. १. लव भुरी : (अ) ज्वारी : रोगामुळे चिरटलेली पाने (आ) बाजरी : रोगट कणीस (इ) द्राक्ष : (१) रोगट फांदी, (२) रोगट पान, (३) बीजुककोश दंड व बीजुककोश.

रोगाची सुरुवात पानांवर होते. पाने प्रथम पांढरट व मागाहून तपकिरी रंगाची होतात. त्यांच्या खालच्या बाजूवर कवकाची पांढऱ्या रंगाची लवदार वाढ दिसून येते. नंतर पाने काहीशी पिळवटलेली दिसतात आणि थोड्याफार प्रमाणात चिरटतात (ज्वारीवरील याच रोगात पाने मोठ्या प्रमाणावर चिरटतात). रोगाने वाळलेल्या पानांत आणि कणसांतील पानासारख्या वाढीमध्ये कवकाची रंदुके तयार होतात व ती खाली पडलेल्या पानांबरोबर शेतातील जमिनीत मिसळली जातात. पुढील हंगामात रंदुकाचे अंकुरण होऊन कवक नव्याने उगवून आलेल्या रोपट्यांच्या मुळांतून प्रवेश करते व नंतर ते पानांच्या देठांत वाढते. आर्द्र हवेत चरबीजुके पानांतील त्वग्रंध्रांतून प्रवेश करून पानांतील कोशिकांत मोठ्या प्रमाणात वाढतात. पिकाची फेरपालट करणे व रोगप्रतिबंधक प्रकारांची लागवड करणे हे या रोगावर उपाय आहेत. [⟶बाजरी].

   

ज्वारी : रोगाचा प्रादुर्भाव शेतातील मागील हंगामातील रोगट झाडांच्या अवशेषातील रंदुकांमार्फत होतो. रोपे फिकट पिवळी पडतात व पानांच्या खालील बाजूला कवकांची लवदार वाढ आढळून येते. जास्त वाढ झालेल्या रोपांच्या पानांवर दोन्ही बाजूंना पांढरे अरुंद पट्टे दिसून येतात व काही दिवसांनी हे पट्टे तपकिरी रंगाचे होतात आणि त्यांच्या बाजूने पाने चिरटतात. पट्ट्यांत रंदुके तयार होतात व खाली पडलेल्या पानांच्या चिरट्यांबरोबर ती मातीत मिसळली जातात. रोगामुळे झाडे खुरटतात आणि कणसांत दाणे धरत नाहीत अथवा धरल्यास ते पोचट असतात. या रोगावर बाजरीप्रमाणे रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे व पिकाची फेरपालट करणे हेच उपाय आहेत. [⟶ज्वारी].


वाटाणा : या पिकावरील लव भुरी रोग विशेषेकरून उत्तर भारतात आढळून येतो. पाने व उपपर्णे यांवर हा रोग प्रथम दिसून येतो. मागाहून हा कोवळ्या शेंगावर पसरतो आणि त्यांत दाणे भरत नाहीत. झाडाची वाढ खुरटते व रोगाचे प्रमाण जास्त असल्यास झाडे मरतात. रोगग्रस्त शेतातील पिकांचे अवशेष जाळून नष्ट करणे व पिकाची फेरपालट करुन त्याच शेतात दोन-तीन वर्षे वाटाण्याचे पीक न घेणे हे रोगावर उपाय आहेत. कवकनाशकाच्या फवारणीमुळे विशेष फायदा होत नाही.

चूर्ण भुरी : (पावडरी मिल्ड्यू). ⇨ॲस्कोमायसिटीज वर्गातील एरिसायफेलीझ गणातील एरिसायफेसी कुलातील कवकांमुळे अनेक पिकांवर चूर्ण भुरी रोग होतो. विशेषतः समशीतोष्ण हवामानात हा रोग अनेक वनस्पतीवर आढळून येतो. या रोगात पोषकाच्या पृष्ठभागावर पांढरट करड्या रंगाची संगजिऱ्याच्या पुडीप्रमाणे दिसणारी वाढ दिसून येते आणि त्यात कवकजाल, विबीजुकदंड, रंगहीन विबीजुके व कवकजालात विखुरलेले काळ्या रंगाचे युक्तधानीफल [⟶कवक] यांचा समावेश असतो. चूर्ण भुरी रोगाची सर्व कवके सदापरजीवी असतात. काही अपवाद वगळता त्यांचे शोषक भाग पोषकाच्या बाह्यत्वचेतील कोशिकांत आढळून येतात परंतु त्यामुळे बाह्यत्वचेला इजा झाल्याचे दिसून येत नाही. विबीजुके साखळीत असतात. वाऱ्यामुळे ती अलग होतात व दूर अंतरावर नेली जातात व अशा तऱ्हेने रोगाचा पिकाच्या हंगामात प्रसार होतो. पृष्ठभागावरील कवकाच्या वाढीमुळे सूर्यप्रकाश पोषकाच्या पृष्ठभागापर्यंत पोहचत नाही व त्यामुळे प्रकाशसंश्लेषणाच्या (सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करून कार्बन डायऑक्साइड व पाणी यांसारख्या साध्या संयुगापासून कार्बोहायड्रेटांची निर्मिती करण्याच्या) कार्यात व्यत्यय येतो. रोगट पाने पुष्कळ आठवड्यांपर्यंत टिकून राहतात व त्यांत ऊतकमृत्यूची (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांच्या मृत्यूची ) लक्षणे आढळून येत नाहीत.

एरिसायफेसी कुलातील पुढील महत्त्वाच्या वशांतील कवकांमुळे चूर्ण भुरी रोग उद्भवतात : (१) स्फेरोथेका, (२) पोडोस्फीरा, (३) एरिसायफे, (४) फायलॅक्टिनिया, (५) मायक्रोस्फिरा व (६) अन्सिन्यूला. युक्तधानीफलांवर निरनिराळ्या प्रकारची उपांगे असतात त्यांवरुन आणि धानीफलांतील धानीच्या संख्येवरुन विशिष्ट वंशाची ओळख पटते. धानीफले फुटून त्यांतून धानी मोकळ्या होऊन त्यांतून धानीबीजुके बाहेर पडतात व ती लैंगिक बीजुके असतात.

आ. २. चूर्ण भुरी : (अ) पोषकाच्या पृष्ठभागावर वाढणाऱ्या कवकाच्या अवस्था : (१) कवकजाल, (२) विबीजुकदंड, (३) विबिजुके (आ) एरिसायफेसी कुलातील रोगकारक वंशाच्या युक्तधानीफलांवरील उपांगे : (१) स्फेरोथेका व एरिसायफे, (२) पोडोस्फीरा व मायकोस्फीरा, (३) फायलॅक्टिनिया, (४) अन्सिन्यूला (इ) द्राक्षावरील चूर्ण भुरी : (१) रोगट खोड, (२) रोगट पान, (३) रोगट फळ (ई) गुलाबावरील चूर्ण भुरी : रोगट पान (उ) गव्हावरील चूर्ण भुरी : रोगट पाने (३) रोगट फळ (ई) गुलाबावरील चूर्ण भुरी : रोगट पान (उ) गव्हावरील चूर्ण भुरी : रोगट पाने (ऊ) काकडीवरील चूर्ण भुरी : रोगट पान.

भारतात द्राक्ष, गुलाब, आंबा, नागवेल, गवारी, भेंडी, वाटाणा, काळा भोपळा, दुध्या भोपळा, सफरचंद, गहू, ओट व सातू या पिकाहा रोग प्रामुख्याने आढळून येतो आणि इतर अनेक लागवडीखालील व जंगलातील वनस्पतींवर व तणांवरही तो आढळून येतो आणि पानांच्या भुरकट रंगामुळे लांबूनही तो ओळखता येतो. सर्वसाधारणपणे ‘भुरी’ या नावानेच तो शेतकरी वर्गात ओळखला जातो.

सर्वसाधारणपणे पुष्कळ चूर्ण भुरी रोगाचे प्रमाण कोरड्या हवामानात तीव्र असते परंतु तृणधान्यांवरील चूर्ण भुरी रोगाचे प्रमाण ओलसर हवेत जास्त असते. रोगकारक कवकाच्या विबीजुकांच्या अंकुरणासाठी पोषकाच्या पृष्ठभागावर पाण्याच्या पातळ थराची आवश्यकता नसते इतकेच नव्हे तर पाण्याचा थर असल्यास पुष्कळशा चूर्ण भुरी कवकांच्या विबीजुकांचे अंकुरण होत नाही. मात्र बहुतेक जातींच्या विबीजुकांच्या अंकुरणासाठी हवेतील सापेक्ष आर्द्रता पुष्कळ प्रमाणात असणे आवश्यक असते, तर काही जातींची विबीजुके फार थोड्या सापेक्ष आर्द्रतेत अंकुरण पावतात. गहू, ओट व सातू या पिकांवर या रोगाचे प्रमाण ओलसर हवेत जास्त असते.

या रोगावर ३०० मेश गंधकाची पिस्कारणी वा पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाची फवारणी हा सर्वसाधारणपणे परिणामकारक उपाय आहे. पिस्कारणी केव्हा व किती वेळा करावयाची हे रोगाची सुरुवात केव्हा होते व त्याची तीव्रता यांवर अवलंबून असते. पुष्कळ वेळा पीक फुलावर येण्याच्या सुमारास एकच पिस्कारणी पुरेशी होते.

इतर पिकांपेक्षा द्राक्ष पिकावर हा रोग सर्वात जास्त नुकसानकारक आहे आणि त्या पिकावर तो लव भुरीपेक्षाही जास्त नुकसानकारक आहे असे मानण्यात येते. भारतातच नव्हे, तर जगात सर्वत्र हा रोग द्राक्षावर आढळून येतो आणि रोगाच्या वाढीला पोषक असे हवामान असल्यास तो मोठ्या क्षेत्रावर पसरतो. उबदार व बेताचे कोरडे हवामान या रोगाला पोषक असते. रोगाची सुरुवात लवकर झाल्यास फळे धरत नाहीत आणि उशीरा (फळे पोसण्याच्या हंगामात) सुरुवात झाल्यास फळे आकारमानाने लहान व वेडीवाकडी होतात व त्यांतील फारच थोडी पिकतात. वेलांची छाटणी केल्यावर रोगट फांद्या, पाने वगैरे रोगग्रस्त भाग जाळून नष्ट करणे आणि फुटून आलेल्या शाखांवर ३०० मेश गंधक हेक्टरी ३० किग्रॅ. या प्रमाणात पिस्कारणे हे उपाय आहेत. पहिली पिस्कारणी नवीन फूट ७.५ ते १५ सेंमी. लांब असताना आणि दुसरी फुलोरा येण्यापूर्वी करतात. तिसरी फवारणी जरुरीप्रमाणे दुसऱ्या फवारणीनंतर ४० –५० दिवसांनी करतात.

द्राक्षाच्या खालोखाल हा रोग वाटाण्याच्या पिकावर पडतो व त्या पिकावर तो लव भुरीपेक्षा जास्त नुकसानकारक असतो. शेंगात दाणे भरण्याच्या सुमारास हा रोग पडतो व कोरड्या हवेत त्याचे प्रमाण जास्त असते. लवकर तयार होणाऱ्या वाटाण्याच्या प्रकारांना विशेष नुकसान पोहोचत नाही. मात्र रोगाचे प्रमाण फार असल्यास ५०% पर्यंत नुकसान होते. ३०० मेश गंधकाच्या पिस्कारणीमुळे या रोगाचे नियंत्रण करता येते.

कापसावर पडणारा ‘दहिया’ रोग (ग्रे मिल्ड्यू) हाही भुरी रोगाचाच प्रकार आहे. [⟶कापूस].

संदर्भ : 1. Horsfall, J. G Dimond, A. E., Ed., Plant Pathology, Vol. 2, New York, 1960.

            2. Kamat, M. N. Introductory Plant Pathology, Poona, 1967.

            3. Mundkar, B. B. Fungi and Plant Disease, London, 1961.

            4. Roberts, D. A. Boothroyd, C. W. Fundamentals of Plant Pathology, San Fransisco, 1972.

            5. Walker, J. C. Plant Pathology, New York, 1969.

गोखले, वा. पु.