मर्यादवेल : (१) फुलांसह फांदी, (२) किंजपुटाचा आडवा छेद, (३) तडकलेले फळ, (४) बीज.

मर्यादवेल : (मर्दावेल, समुद्रकोश, समुद्रफेन; हिं. दोपाती लता; गु. आरवेल; क. उडुंबबळ्‌ळी; सं. मर्यादवल्ली, वृद्धदारक, सागरमेखला; इं. गोट्‌स फूट क्रीपर; लॅ. आयपोमिया पेस−कॅप्री, आ. वायलोबा, आ. मॅरिटिमा; कुल−कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). सामान्यपणे उष्ण कटिबंधात सर्वत्र, समुद्र किनाऱ्‍यावरील वाळवंटात व कधी कधी नद्यांच्या काठीही पसरून वाढणारी एक वेल. भारतात समुद्र किनारी तसेच सुंदरबन, पिलानी (राजस्थान), अंदमान बेटे इ. ठिकाणी आणि श्रीलंकेतही ही आढळते. ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) असून खोडापासून निघणारी जाडजूड पिंगट, लांब मुळे वाळवंटी जमिनीत खोलवर जात असल्याने ती जमिनीला घट्टपणा आणतात; ‘वालुकाबंधक’ म्हणून या वनस्पतीचा उपयोग होतो. पाने साधी, एकाआड एक, लांब देठाची, आपट्याच्या पानांसारखी टोकाशी खोलपर्यंत विभागलेली, काहीशी मांसल व गुळगुळीत असता पानांच्या अशा बकऱ्‍याच्या खुरासारख्या आकारामुळे त्या अर्थाचे इंग्रजी नाव पडले आहे. लॅटिन नावातही दोन खंडांचा आकार सूचित केला आहे. मराठी व संस्कृत नावांनी तिचे वसतिस्थान जमीन व समुद्र यांच्या सीमेवर असल्याचे दर्शविलेले दिसते. ह्या वेलीला साधारणपणे वर्षभर फुले येतात; फुले मोठी, सच्छद, बहुधा एकेकटी, कधी २-३ च्या कुंठित फुलोऱ्‍यात (वल्लरीत) व पानांच्या बगलेत असतात. संवर्त लहान (संदले ५); पुष्पमुकुट ४-५ सेंमी. लांब, खाली नळीसारखा पण वर पसरट, गुलाबी-जांभळट, आत तळाशी गर्द जांभळा; केसरदले तळाशी केसाळ व रुंद; किंजपुट ऊर्ध्वस्थ व त्यात चार कप्पे आणि चार बीजके [⟶ फूल]. फळ (बोंड) लहान (सु. १.५ सेंमी. लांब), अंडाकृती; बिया ४, लवदार व गर्द तपकिरी हिची इतर सामान्य शारीरिक लक्षणे कॉन्व्हॉल्व्ह्यूलेसीत (हरिणपदी कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

या वेलीच्या पानांचा लेप संधिवात, मस्तकशूळ इत्यादींवर लावतात. पानांचा रस मूत्रल (लघवी साफ करणारा) असतो; पाने वाटून दुखऱ्या भागांवर लावतात. पेंबा व झांझिबार येथे पानांची भाजी करतात. पूर्व मलेशियात पानांचे पोटीस गळवे, सूज, जखमा व काळपुळी इत्यादींवर लावतात. ही वनस्पती श्लेष्मल (बुळबुळीत पदार्थयुक्त), दीपक (भूक वाढविणारी), स्तंभक (आकुंचन करणारी), आरोग्य पुनःस्थापक, पौष्टिक व सारक असते. बिया पोटदुखीवर आणि पेटके आल्यास वापरतात. मुळांतील सुकविलेला रस रेचक असतो. खोकल्यावर वेलीचा काढा देतात. मुळांत सॅपोनीन असते. या वनस्पतीचा पाला जनावरे खातात. बाळंतिणीच्या बाजल्यास पाचव्या दिवशी ही वेल बांधल्यास सटवाई तान्ह्या मुलास पीडा देत नाही, असा समज कोकणातील काही भागांत आहे.

टिळक, शा. त्रिं.