वल्क : ही संज्ञा सामान्य भाषेत जिला मुळावरची किंवा खोडावरची ‘साल’ म्हणतात तिच्याकरिता वापरतात. शास्त्रीय दृष्ट्या त्यात वनस्पतीतल्या कोणत्या ऊतकांचा म्हणजे कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांचा समावेश होतो (कारण वल्क एक ऊतक तंत्र – संस्था – आहे) त्यासंबंधी पुढे विवेचन केले आहे [⟶ ऊतके, वनस्पतींतील]. कधी-कधी ⇨ त्वक्षा (बुचासारख्या पदार्थाने भरलेल्या कोशिकांचा थर), ⇨परित्वचा (त्वक्षाकर, त्वक्षा व दोन्हींच्या आतील मध्यत्वचा) या संज्ञांऐवजी वल्क ही संज्ञा वापरी जाते व त्यामुळे समजुतीचा घोटाळा होतो.

वल्क व त्याबरोबर असणारी ऊतके : (१) प्रकाष्ठ, (२) ऊतककर, (३) सजीव परिकाष्ठ, (४) वल्क, (५) परित्वचा.सामान्यपणे मूळ किंवा खोड यातील ऊतककराबाहेरच्या (ऊतके बनविणाऱ्या व सतत विभागणी करीत राहणाऱ्या कोशिकांच्या थराबाहेरच्या) सर्वच भागाला वल्क म्हटल्यास कोवळ्या खोडातल्या ⇨ परिकाष्ठ, ⇨ मध्यत्वचा व ⇨ अपित्वचा आणि तसेच कोवळ्या मुळातल्या मध्यत्वचा व अपित्वचा इ. जिवंत भाग त्यात समाविष्ट होतील. म्हणून वल्क ही संज्ञा फक्त जून झालेल्या [द्वितीयक वाढ झालेल्या ⟶ शारीर, वनस्पतींचे] काष्ठयुक्त वनस्पतींबाबतच वापरतात. द्वितीयक वाढ झालेल्या बहुधा सर्व मुळांतील परिकाष्ठ आणि परित्वचा यांचा समावेश वल्कात होतो, कारण त्यांची अपित्वचा  व मध्यत्वचा पहिल्याने ⇨ परिरंभापासून बनलेल्या त्वक्षेमुळे मृत होऊन सोलून गेलेली असते. खोडामध्ये पहिला त्वक्षाकर (त्वक्षा बनविणारा कोशिकांचा थर) वाहक ऊतककराबाहेरच्या कोणत्याही जिवंत ऊतकापासून बनतो त्यामुळे कोवळ्या वल्कामध्ये थोडीफार मध्यत्वचा, परिकाष्ठ व परित्वचा अंतर्भूत होतात. ही प्रक्रिया आयुष्यभर चालू राहिल्यास परित्वचेचा पृष्ठभाग गुळगुळीत राहतो परंतु बहुधा परित्वचेची नवीन वलये क्रमाने अधिक खोलवर बनलेल्या त्वक्षाकरामुळे निर्माण होतात, त्यांतले नवीन त्वक्षाथर अनेकदा कवचाप्रमाणे (कठीण वलयाप्रमाणे) असून मृत परिकाष्ठाभोवती त्यांचा वेढा पडल्याने परिकाष्ठाची बेटे बनतात. काही वनस्पतींत हे क्रमिक त्वक्षाथर रुंद पट्ट्याप्रमाणे किंवा पूर्ण व रुंद नळ्यांप्रमाणे वाढतात. क्रमवार बनणाऱ्या परित्वचेचे थर व त्यांनी वेढलेली मृत ऊतके यांच्या विभागांना ‘बाह्यवल्क’ म्हणतात. हा हळूहळू चिंबतो (भेगाळतो) व झिजतो आणि त्याच्या पृष्ठभागाचे स्वरूप त्यातल्या त्वक्षाकराचा उगम व मृत ऊतकांचे रचनाप्रकार यांनुसार बनते. त्याचे लहान सपाट तुकडे किंवा लांबट चिंधुके होतात. मृत परिकाष्ठ व मृत मध्यत्वचा आणि त्यांच्यासह एकाआड एक असलेल्या परित्वचेचे पट्टे यांमुळे बनलेल्या बाह्यवल्काला बार्क किंवा ‘रिटिडोम’ म्हणतात. अंतर्वल्क ही संज्ञा जिवंत परिकाष्ठापुरतीच मर्यादीत आहे.

त्वक्षाकर वलयाप्रमाणे असल्यास वल्क तक्त्याप्रमाणे सुटून निघतो (उदा., भूर्जपत्र) व त्याला ‘वलयवल्क’ म्हणतात परंतु तो लहान पट्ट्याप्रमाणे असल्यास वल्काचे लहानमोठे खवल्यासारखे तुकडे निघतात, त्यांना ‘शल्क वल्क’ म्हणतात (उदा., पेरू, यूकॅलिप्टस). त्वक्षा व इतर मृत ऊतकांमुळे वल्काचे संरक्षण हे मुख्य कार्य चांगल्या रीतीने होते. ⇨ दालचिनीच्या झाडांपासून काढलेल्या वल्काचा (बाहेरील त्वक्षा खरडून टाकून) उपयोग मसाल्यात व औषधांकरिता करतात. भूर्जपत्राच्या [⟶ बेट्युलेसी] वल्कावर पूर्वी मजकूर लिहीत असत. कित्येक झाडांच्या साली (वल्क) पूर्वी वस्त्र (वल्कले) म्हणून वापरीत.

पहा : त्वक्षा परित्वचा वल्करंध्र शारीर, वनस्पतींचे साल-१.

संदर्भ : Eames, A. J. MacDaniels, L., H. An Introduction to plant Anatomy, Tokyo, 1953.

परांडेकर, शं. आ.