लहान चिरायत : पानाफुलांसह वनस्पती

चिरायत, लहान : (लुंतक हिं. खेत चिरायत, बारीक चिरायत, गु. जंगली करायतु लॅ. सेंटॉरियम रॉक्सबर्घाय  कुल-जेन्शिएनेसी). सु. पाच ते वीस सेंमी. उंच, सरळ वाढणाऱ्या या ⇨ओषधीचा प्रसार भारतात ६२० मी. उंचीपर्यंत सर्वत्र असून विशेषतः ती लागवडीखालील जमिनीत सामान्यपणे आढळते. हिची सर्वसाधारण लक्षणे जेन्शिएनेसी अथवा किराईत कुलातील जातीप्रमाणे [किराईत गण → जेन्शिएनेलीझ] आहेत. मूलज (मुळांपासून निघाल्यासारखी वाटणारी) पाने गुच्छाकृती दीर्घस्थायी (दीर्घकाल राहणारी), व्यस्त अंडाकृती, लहान व संमुख (समोरासमोर) असून स्कंधोद्‌भव (हवेत वाढणाऱ्या खोडापासून निघालेली पण जमिनीलगत न आलेली) पाने त्यांपेक्षा लहान, लांबट व रेखाकृती असतात. लालसर फुले द्विपद वल्लरीत [→ पुप्षबंध] फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात. पुष्पमुकुट नलिकाकृती पाकळ्या पाच व लालसर पसरट आणि तारकांसारख्या असतात [→ फूल]. बोंड लहान, लांब, अनेकबीजी असून फुटताना त्याची दोन शकले होतात. या झाडाचे सर्व भाग फार कडू व दीपक (भूक वाढविणारे) असून विशेषतः बंगालमध्ये तापावर खऱ्या किराइताऐवजी वापरतात[→ किराईत] .

जमदाडे, ज. वि.