विभज्या : (मेरिस्टेम). उच्च दर्जाच्या वनस्पतींत श्रमविभाग व विशेषीकरण या तत्त्वांनुसार विशिष्ट ठिकाणी शरीरातील वाढ होत असते. याला कारणीभूत असणाऱ्या कोशिका (पेशी) किंवा त्यांचे थर म्हणजे विभज्या होय. वनस्पतींच्या अवयवांची वाढ होत असताना त्यांतील कोशिकांची संख्या वाढणे, त्यांचे आकारमान वाढणे आणि त्यांमध्ये अनेक अंतर्बाह्य फरक होऊन त्यांच्या भावी कार्यानुसार त्यांचे प्रभेदन (मूळच्या आकारात व रचनेत विशेष प्रकारे फरक होणे) यांचा समावेश होतो. गर्भावस्थेत बहुतेक सर्व शरीरात किंवा शरीराच्या लहानमोठ्या भागांत कोशिकांची व ऊतकांची (समार रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांची) निर्मिती व प्रभेदन चालू असते. जसजसा विकास अधिकाधिक होत जातो, तसतसे निर्मिती व प्रभेदन यांचे क्षेत्र मर्यादित होते व त्या वृद्धिक्षेत्रांना व वृद्धिस्थानांना विभज्या म्हणतात (प्राण्यामध्ये अशी वाढ होण्याची मर्यादित क्षेत्रे नसतात आणि हा वनस्पती व प्राणी यांच्यातील महत्त्वाचा फरक होय). कोशिकांच्या विभाजनाच्या (त्यांची विभागणी होऊन संख्यावाढीच्या प्रक्रियेच्या) मौलिक प्रक्रियेवर अवयवांची पुढील वाढ अवलंबून असल्याने विभज्या ही संज्ञा सार्थ वाटते. काही विभज्यांची क्षेत्रे व मूळच्या गर्भातील विभज्या [⟶गर्भविज्ञान] यांचे सातत्य अखंड राहते परंतु काही विभज्या पुढे पूर्णत्वास पोहोचलेल्या किंवा पोहोचत असणाऱ्या भागात नव्याने निर्माण होतात यांपैकी पहिल्या प्रकारच्या विभज्यांना प्राथमिक व दुसऱ्यांना द्वितीय म्हणतात. विभाजी कोशिका व विभाजी ऊतक असे सामान्यपणे म्हटले जाते, तेव्हा त्याचा अर्थ विभाजन सतत चालू ठेवणारी कोशिका किंवा चालू ठेवणारा त्यांचा समूह इतकाच असून त्यांचा मूळच्या विभज्येत अंतर्भाव असतोच, असे नाही.

विभज्यांची संरचना, स्वरूप व कार्य लक्षात घेऊन त्यांचे वर्गीकरण केले असले, तरी या मृदूतकासारख्या जिवंत व फार कमी प्रमाणात प्रभेदित ऊतकापासून फारशा भिन्न नसतात. सजीव व पूर्ण वाढ झालेल्या ऊतकांचे रूपांतर परत विभज्येत होण्याची शक्यता असते उदा., जेव्हा एखाद्या झाडाचे कलम अथवा रूपांतरित खोडाचा भाग किंवा पान (उदा., पानफुटी, बिगोनिया इ.) जमिनीत लावल्यानंतर त्यातील जिवंत कोशिकांपासून मुळे किंवा कोंब फुटतात, तेव्हा तेथे विभांजी ऊतक नव्याने निर्माण होऊन पुढे नवीन वनस्पती वाढू लागते [⟶पुनर्जनन]. पातळ कोशिकावरण, मोइ प्रकल (केंद्रक कोशिकेतील विशेषत्व पावलेला महत्त्वाचा नियंत्रक भाग) आणि दाट व कधी रिक्तिकायुक्त (जिवंत द्रव पदार्थातील पोकळ्या किंवा अन्य पदार्थयुक्त थेंब असलेला) परिकल (जिवंत द्रव पदार्थ्) ही लक्षणे सर्व विभाज्यांच्या कोशिकांत आढळतात शिवाय त्या विभाजी ऊतकातील कोशिकांमधून (अंतराकोशिकी) मोकळ्या जागा नसतात. [⟶कोशिका].

प्राथमिक विभज्येपासून वनस्पतींच्या शरीराचे मौलिक अवयव बनतात व प्राथमिक शरीर बनते. संरचना व त्यातील भागांच्या कार्यांच्या दृष्टीने ते पूर्ण असते. शैवले, ⇨शेवाळी, काही नेचाभ पादप [टेरिडोफायटा ⟶वनस्पति, वाहिनीवंतर अबीजी विभाग] व अनेक ओषधीय [नरम व लहान ⟶ओषधि] वनस्पती यांमध्ये फक्त प्राथमिक प्रकारचे शरीरच असते. द्वितीय विभज्येची निर्मिती प्राथमिक शरीराच्या पूर्ण बनलेल्या किंवा बनत आलेल्या अवयवांत नंतर नव्याने होते आणि तेथे पूर्वी असलेल्या प्रकारच्या किंवा नवीन प्रकारच्या ऊतकांची भर पडते. यामुळे द्वितीयक शरीर बनते [⟶शारीर, वनस्पतींचे]. विभज्यांच्या वर्गीकरणात त्यांचा उगम, कार्यस्थळ, विकासाची व संरचनेची अवस्था ह्या गोष्टींना महत्त्व असते. अवयवांच्या टोकास किंवा वाढ सुरू असलेल्या बिंदूत आढळणाऱ्या विभज्येस अग्रस्थ म्हणतात. प्राथमिक शरीराची उभारणी तिच्यावर अवलंबून असते. वाढीच्या बाबतीत पूर्णत्वास पोचलेल्या शरीराच्या अवयवांत टोकाखेरीज इतरत्र आढळणाऱ्या विभज्येस तथाकथित अंतर्वेशी म्हणतात अग्रस्थ विभज्येतून सुटून मागे राहिलेला हा एक भाग असतो व उरलेली विभज्या टोकास वाढतच राहते. अनेक वनस्पतींत मूळ व खोड यांच्या बाजूमध्ये पार्श्विक विभज्या असते व तिचे कार्य त्या ठिकाणी विद्यमान ऊतकात भर टाकणे किंवा नवीन ऊतके बनविण्याचे असते त्यातील कोशिकांची विभागणी वक्रपृष्ठाशी समांतर भितींनी किंवा पडद्यांनी होते. ऊतककर (ऊतके निर्माणकरणारा कोशिका थर) व त्वक्षाकार बुचासारख्या पदार्थाने भरलेल्या कोशिका बनविणाऱ्या ऊतकाचा थर ⟶त्वक्षा] हे विभाजी ऊतकांचे थर यांपैकी आहेत [⟶परित्वचा].

आ. १. अग्रस्थ विभज्या : (अ) एक्विसीटम खोडाचे टोक (उभा छेद): (१) अग्रस्थ कोशिका (२) आद्यपर्णे (आ) सायनोकॅलॅमस (एक तृण) खोडाचे टोक (उभा छेद) : (१) कंचुक, (२) पिंड, (३) आद्यपर्णे. अग्रस्थ विभज्या : वनस्पतींच्या भिन्न भिन्न गटांत या प्रकारच्या विभज्येची संरचना व जडणघडण सारखी नसते. बहुतेक सर्व नेचे, एक्विसीटम, ⇨सायलोटेलीझ व इतर काहींत मूळ व खोड यांच्या टोकांस असलेल्या एकाच कोशिकेपासून पुढे शरीरातील सर्व ऊतके निर्माण होतात. ह्या कोशिकेखाली तिच्यापासून बनलेल्या अनेक कोशिकांचा समूह सदैव असून त्यापासून निर्माण झालेल्या व अंतर्बाह्य फरक पडलेल्या कोशिकांमुळे व वनस्पतींतील निरनिराळे अवयव बनतात परंतु हा प्रकार सर्वत्र नसतो बीजे निर्मिणाऱ्या वनस्पतींच्या मूळ व खोड ह्यांच्या शेंड्यावरच्या अनेक कोशिकांच्या थरांपासून भिन्न कार्यक्षम ऊतके बनतात. फुलझाडांच्या [⟶वनस्पति, आवृत्तबीज उपविभाग] प्ररोहाच्या (खोडाचे टोक व त्याजवळची कोवळी पाने यांच्या) टोकास विभाजी कोशिकांचे एक किंवा अनेक थर असून त्याखाली अनेक कोशिकांचा गाभा असतो. ह्या सर्वांवर अनेकदा खवले, उपपर्णे (पानांच्या तळाशी असलेली लहान उपांगे), केस इत्यादींचे संरक्षण आवरण असते येथे बाहेरच्या कोशिकांच्या थरास ‘कंचुक’ (ट्युनिका) व आतील गाभ्यास ‘पिंड’ (कॉर्पस) म्हणतात कंचुक व पिंड मिळून ‘पूर्व विभज्या’ (प्रोमेरिस्टेम) बनते व यातच नवीन अवयव हळूहळू उगम पावतात, कारण त्यातील आदिकोशिकांच्या (आरंभापासून असलेल्या विभज्येतील कोशिकांच्या) क्रियाशीलतेमुळेच प्ररोहांची वाढ सुरू होते आणि वनस्पतींच्या सर्व आयुष्यभर चालू राहून तिची उंची वाढते व नवीन अवयवांची निर्मिती होते. कंचुकातील कोशिकांचे विभाजन पृष्ठाशी काटकोन करणाऱ्या (पृष्ठजात्य) भित्तींनी (पडद्यांनी) होते व गाभ्यातील कोशिकांचे विभाजन सर्वच पातळ्यांत होते. हे दोन्ही भाग परस्परावलंबी असून त्यांची व्याप्ती व त्यांचे वर्तन बदलत असते. त्यांच्यापासून निर्मिली जाणारी ऊतके सदैव सारखी नसतात. काही प्रकटबीज वनस्पतींत [उदा., सायकस, पाइन, देवदार इ. ⟶वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] असे भाग आढळतात परंतु ते फुलझाडांतल्यापेक्षा अधिक परस्परावलंबी असतात. ह्या सर्व ठिकाणी प्रथम बाहेरच्या एका थरातील अनेक आदिकोशिकांचे विभाजन होऊन अग्रस्थ विभज्येचा बाहेरचा व आतील कोशिकाविभाग बनतो. अग्रस्थ विभज्येचे हे स्पष्टीकरण ‘कंचुक-पिंड’ वाद या संज्ञेने ओळखले जाते.


मूळ व खोड यांच्या वर्धिष्णू (वाढण्याची क्रियाशीलता असलेल्या) टोकांत काही फरक आढळतात. खोडांच्या टोकांपासून पानांसारखे बाजूचे अवयव येतात, तसे मुळांच्या टोकांपासून येत नाहीत. उपमुळांचा उगम टोकापासून बराच मागे व खोलवरच्या ऊतकापासून (अंतर्भव) होतो याउलट पाने टोकाच्या बाह्य कोशिकाथरापासून (बहिर्भव) येतात. खोडाच्या टोकापासून नवीन कोशिका फक्त आतील बाजूस (अक्षाकडे) येतात परंतु मुळांच्या टोकांवर संरक्षक टोपीचे [मूलत्राण⟶मूळ-२] आवरण असल्याने तिची निर्मिती सतत चालू ठेवण्यास तेथे निर्माण झालेल्या नव्या विभाजी कोशिकांचे काही थर (मूलत्राणकर) बाहेर व अनेक थर आतील भागाकडे बनतात. मुळाची अग्रस्थ विभज्या यामुळे अगदी टोकास नसते.

आ.२.अग्रस्थ विभज्या : (अ) मूळ (उभा छेद) : (१) त्वचा-जनक, (२) मध्यजनक, (३) रंभजनक, (४) मूलत्राणकर, (५) मूलत्राण (आ) खोड (उभा छेद) : (१, २, ३) ‘अ’ प्रमाणे, (४) आद्यपर्ण.

फुलझाडांमध्ये मूलाग्राच्या आदिकोशिकांचे बहुधा दोन किंवा अधिक थर असून त्यांतील एका थरापासून मूलत्राणकर किंवा फक्त मूलत्राण अपित्वचा (मुळावरील पूर्ण वाढ झालेला सर्वांत बाहेरचा थर) व मध्यत्वचा (अपित्वचेखालील बराच मोठा व अनेक थरांचा भाग) आणि दुसऱ्या थरापासून सर्व मध्यवर्ती (वाहक ऊतकांसह) भाग बनतात. इतर वनस्पतींत संख्येने कमीजास्त असलेल्या अग्रस्थ थरांपासून निर्माण होणाऱ्या भिन्नभिन्न भागांत भेद आढळतात आदिकोशिकांचे थर कधीकधी स्पष्ट नसतात कधीकधी मुळाच्या अक्षातील भिन्न विभागांची निर्मिती अग्रस्थ विभज्येतील स्वतंत्र आदिकोशिकांच्या कोणत्या थरांपासून व्हावी हे पूर्वीच ठरल्याप्रमाणे होते, असा ग्रह होतो त्यावरून खोड व मूळ यांच्या अग्रस्थ पूर्वविभज्येतील थरांना तीन स्वतंत्र नावे इन्स्टीन यांनी १८७० मध्ये दिली होती. सर्वांत बाहेरचा थर त्वचाजनक (डरमॅटोजेन), मधला ‘मध्यजनक’ (पेरिब्लेम) व सर्वांत आतील रंभजनक (प्लेरोम) असून या थरांपासून अनुक्रमे अपित्वचा, मध्यत्वचा व मध्यवर्ती स्तंभ [⟶परिरंभ वाहक वृंद भेंड] अथवा रंभ ही ऊतक तंत्रे निर्माण होतात. हे स्पष्टीकरण ऊतकजनक-वाद या संज्ञेने ओळखले जाते.

आ. ३. खोडातील अग्रस्थआन विभज्या व त्यापासून बनलेल्या ऊतकांची व ऊतक तंत्राची स्आथने (उभा छेद) : (१) पूर्व विभज्या, (२) आद्यपर्णे, (३) कक्षास्थ कळी, (४) आद्यत्वचा, (५) तल्पविभज्या, (६) पूर्वोतककर, (७) अपित्वचा, (८) मध्यत्वचा, (९) दृढोतक, (१०) प्राथमिक प्रकाष्ठ, (११) ऊतककर, (१२) प्राथमिक परिकाष्ठ, (१३) भेंड.

बहुतेक मुळांत व अनेक खोडांत प्राथमिक अक्षाच्या भिन्न भागांचा (ऊतक तंत्राचा) उगम वर म्हटल्याप्रमाणे अग्रस्थ विभज्येतील स्वतंत्र थरांशी जोडता येत नसल्याने त्याची विभागणी अशा तीन थरांत (ऊतकजनकांत) प्रत्येक वेळी दिसतेच असे आढळत नाही. अंतिम टोकाच्या खालच्या भागात ऊतकनिर्मिती चालूच असते आणि ऊतक प्रभेदनाचा प्रारंभ झालेला आढळतो त्यावरून मध्ये भागाजवळच्या दाट परिकलाने (जिवंत द्रवाने) भरलेल्या लांबट कोशिकाच्या भागालला ‘पूर्वोतककर’ (प्रोकँबियम) म्हणतात कारण प्राथमिक प्रकाष्ठ (जलवाहक घटकांचा समूह) व परिकाष्ट (अन्नरसवाहक घटकांचा समूह) त्यापासून बनतात. त्यांच्याभोवती असलेल्या व रिक्तिकायुक्त परिकल असलेल्या कोशिका समूहाला ‘तल्पविभज्या’ (ग्राउंड मेरिस्टेम) म्हणतात आणि त्यापासून पुढे मध्यत्वचा व भेंड (मध्यवर्ती नरम कोशिकांचा समूह) बनतात. ह्या दोन्ही भागांवर ज्यांचे आच्छादन असते, अशा बाह्यकोशिकांच्या थराला ‘आद्यत्वचा’ (प्रोटोडर्म) म्हणतात व यापासून पुढे अपित्वचा बनते. अग्रस्थ विभज्या व त्याखालच्या (उपाग्रस्थ) भागातील अंशमात्र प्रभेदित कोशिकांचे थर या सर्वांचा अंतर्भाव प्राथमिक विभज्येत होतो कार्याच्या संदर्भात ह्या विभज्येचे आद्यत्वचा पूर्वोतककर आणि तल्पविभज्या हे प्रभेदन (वर्गीकरण) हल्ली सर्वमान्य झाले आहे.


वर उल्लेखिलेल्या ‘अंतर्वेशी विभज्ये’ची उत्तम उदाहरणे म्हणजे गवते, इतर अनेक एकदलिकित वनस्पती व एक्विसीटम यांच्या खोडाच्या पेऱ्यावरच्या (अथवा कांड्यांच्या तळाच्या) भागाची आणि अनेक गवतांच्या पानांच्या आवरक तळांची आहेत. तसेच वेलविशियाच्या [आफ्रिकी रुक्ष भागातील ‘तुंबोआ’ नावाच्या एका वनस्पतींच्या ⟶ नीटेलीझ] पर्णतलात व काही निवडुंगांच्या [⟶कॅक्टेसी] काट्यांचया तळातही ही विभज्या आढळते.

फुलातील अनेक पुष्पदले [संदले, प्रदले, केसरदले व किंजदले इ. ⟶फूल] बनण्यापूर्वी त्यांच्या अक्षात सापेक्षतः मर्यादित वाढ होणारी व प्ररोहातल्याप्रमाणे अग्रस्थ विभज्या असते. यातील मध्यवर्ती भागात प्रभेदन सत्वर सुरू होते परंतु त्याबाहेरच्या भागात कोशिकांची विभागणी अधिक काल चालू राहून पुष्पदले बनतात ही प्रक्रिया बव्हंशी पर्णनिर्मितीप्रमाणे असते [⟶ पान].

पहा : ऊतककर ऊतके, वनस्पतींतील त्वक्षा वृद्धि, वनस्पतींची शारीर, वनस्पतींचे. 

संदर्भ :1. Eames, A.J. MacDaniels, L.H. An Introduction to Plant Anatomy, Tokyo, 1953.      

          2. Harder, R. and others Strasburger’s Textbook of Botany, London, 1965. 

परांडेकर, शं. आ.