गवते : (सं. तृण क. हुळ्ळू इं. ग्रासेस कुल-ग्रॅमिनी ). या सदरात येणाऱ्या वनस्पतींइतक्या सामन्य व जगभर विपुल प्रसार असलेल्या दुसऱ्या वनस्पती नाहीत, असे म्हटले तरी चालेल. बीजे धारण करणाऱ्या वनस्पतींत संख्येच्या बाबतीतसुद्धा (५,००० जाती ) त्यांची बरोबरी करणाऱ्या व त्यांच्या वर क्रमांक असणाऱ्या थोड्याच वनस्पती आहेत (कंपॉझिटी १६,००० लेग्युमिनोजी १२,००० ऑर्किडेसी १०,००० यूफोर्बिएसी ६,८०० रूबिएसी ५,५००). गवत हा शब्द ‘यवस’ या संस्कृत नावापासून आला असून त्यामध्ये अनेक अन्नधान्यांची पिके व इतर विविधोपयोगी गवतांचा समावेश केला गेला आहे. शास्त्रीय दृष्ट्या गवतांची महत्त्वाची शारीरिक लक्षणे ⇨ग्रॅमिनी  व ⇨ग्रॅमिनेलीझ  यांत वर्णिल्याप्रमाणे आहेत. इंग्रंजीत ‘ग्रासेस’ या संज्ञेत कधीकधी ⇨सायपेरेसी  व जुंकेसी या कुलांतील काही जातींचा समावेश करतात, कारण अनेकदा त्या गवताबरोबरच वाढतात. भौगोलिक परिस्थितीनुसार पृथ्वीवरील निरनिराळ्या प्रदेशांत गवतांच्या अनेक जातींचे प्रदेशनिष्ठ व विशिष्ट प्रकारचे वनश्रीचे प्रकार दिसतात त्यांना सामन्य नाव कुरण किंवा तृणभूमी असे असले, तरी त्यांतील गवतांचे स्वरूप, प्रादेशिक हवामानातील फरक व गवतांचे आकारमान ध्यानात घेता रुक्ष तृणक्षेत्र (पँपास), मिश्रतृणक्षेत्र (व्हेल्ड), शाद्वल (मेडो), गुरचरण (पाश्चर), प्रशाद्वल (प्रेअरी), तृणसंघात (स्टेप), रुक्षवन (सॅव्हाना), तृणक्षेत्र (लानोज), डाऊन्स इ. प्रकार आढळतात. जास्तीत जास्त ६,००० मी. पर्यंतच्या उंच प्रदेशांत गवत वाढते. गवते ⇨ मरुवनस्पती, काही ⇨जलवनस्पती आणि इतर ⇨ मध्यवनस्पती  आहेत. भरपूर पावसाच्या जंगलात काही गवते दुसर्या मोठ्या झाडांच्या फांद्यांवर [→ अपिवनस्पति] वाढतात. गवते वर्षायू किंवा अनेकवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणारी ) असतात फुलझाडांपैकी (आवृतबीज वनस्पतींपैकी) एकदलिकित वर्गात उपयुक्ततेच्या दृष्टीने गवतांचा पहिला क्रमांक लागतो. गहू, मका व भात ह्या मनुष्य प्राण्यांना आवश्यक असलेल्या शूकधान्यांचे (तृणधान्यांचे) उत्पादन अनादी काळापासून सुरू आहे. यज्ञकर्मात आणि इतर धार्मिक क्रियाकर्मात दर्भ, कुश, काळा व पिवळा वाळा, साळ , सत्तु (सातू), मोळ (मौजी तृण), दूर्वा  इ. गवतांचा उपयोग आजतागायात करतात. विविध उपयोग ध्यानात घेऊन गवतांचे मुख्य प्रकार खाली दिल्याप्रमाणे ओळखले जातात.

(१) शूकधान्ये व अन्नधान्ये : गहू, ज्वारी (जोंधळा), भात, बाजरी, मका, सावा, वरी, राय, सातू (जव), ओट, नाचणी  (रागी ), कोद्रा (हरीक), रान जोंधळा इत्यादी. (२) चाऱ्यांची  गवते : गजराज, हरळी, गिनी गवत, कुसळी, हरीक, तांबिट, पवना (शेडा) इत्यादी. शूकधान्यांतील व अन्नधान्यातील कित्येकांच्या कणसाशिवाय (किंवा त्यासह) इतर भागांचा चारा होतो. कृषिविज्ञानात चारा (गवत) या संज्ञेत गवताखेरीज इतर कित्येक वनस्पतींचा (विशेषतः काही शिंबावंत म्हणजे शेंगा येणाऱ्या वनस्पतींचा) अंतर्भाव केलेला आढळतो. (३) साखरेकरिता उपयुक्त : उसाचे खोड साखरेकरिता वापरतात, पण इतर भागांचा चारा गुरांना घालतात व चिपाडापासून कमी प्रतीचा कागद बनविता येतो. (४) बांधकामास व कागदनिर्मितीस उपयुक्त : बांबू (कळक), ऊस, कासे, गवत. (५) सुगंधित द्रव्याकरिता लागणारी गवते : वाळा, पिवळा वाळा, गवती चहा, रोशा गवत, गुच्छघास इत्यादी. (६) शोभेची गवते : कुंड्यांतून वा जमिनीत लावली जातात बांबूच्या उपकुलातील (बांबुसॉइडी) काही जाती देवनळ, पॅनिकम प्‍लिकेटम, रानजोंधळा इत्यादी. (७) औषधाकरीता उपयुक्त गवते : गवती चहा, दूर्वा (हरळी), रोहिश, बांबू इत्यादी. (८) मक्याचे तेल खाण्याकरिता व साबणकरिता उपयुक्त असते.

यांशिवाय इतर अनेक उपयोगांकरिता गवतांचा वापर करण्यात येतो. जमिनीची धूप थांबविणे, समुद्रकिनारपट्टीस स्थैर्य आणणे, चाऱ्यास निरुपयोगी अशा तणा ऐवजी उपयुक्त गवते वाढण्यास संधी देणे, निरनिराळ्या खेळांकरिता (क्रिकेट, हॉकी, टेनिस, शर्यती, मैदानी खेळ, घोड्यांच्या शर्यती इ.) बंगल्यात व बागेतून हिरवळी राखणे इ. दृष्ट्या गवतांची योग्य निवड, लागवड व संवर्धन करणे अत्यावश्यक असते. हिरवळीकरिता थेमेडा, ब्रॉथिओक्‍लोआ व हरळीच्या जाती विशेषकरून लावतात. हिरवळ करण्याकरिता जमीन खोल, भुसभुसीत व स्वच्छ करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी भरपूर उत्तम शेणखत घालून तयार ठेवतात नंतर हिरवळीच्या मुळासकट काड्यांचे तुकडे करून ते शेण-पाण्यात मिसळून तयार जमिनीवर दाट पसरतात, पुढे त्यांना हिरवेपणा आल्यानंतर तण फक्त काढून टाकतात व नायट्रोजन व फॉस्फरसयुक्त खत पुरेसे देतात. खत देणे, कापणी करणे, फुले न येऊ देणे यासाठी दक्षता घ्यावी लागते. हिरवळीकरिता ‘ऑस्ट्रेलियन ब्‍ल्यू कोच ग्रास’ व इतर काही गवतेही वापरतात. अनेक कीटक, कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती), विषाणू (व्हायरस), सूक्ष्मजंतू यांपासून उपयुक्त गवतांची हानी होते त्यांपासून संरक्षण करून नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

पहा : कळप कुरण गजराज गवत गवताळ प्रदेश गिनी गवत गुच्छघास ग्रॅमिनी ग्रॅमिनेलीझ दूर्वा फेस्कू गवत वैरण.

ठोंबरे, म. वा.