फॅगेसी : (वंजू कुल). फुलझाडांपैकी [→ वनस्पती, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित (बियांत दोन दलिका असलेल्या) वनस्पतींच्या वर्गातील एक प्रारंभिक कुल. याचा अंतर्भाव बहुतेक शास्त्रज्ञ हल्ली वंजू गणात (फॅगेलीझमध्ये) भूर्जकुलाबरोबर [→ बेट्युलेसी] करतात तथापि काही शास्त्रज्ञ अक्रोड गणात [→ जुग्लँडेलीझ] करतात ह्याला क्युप्युलिफेरी असेही म्हटलेले आढळते. ⇨ ओक वृक्षांचा समावेश ह्या कुलात हात असल्याने ओकचे संस्कृत नाव वंजू (हिं. बंज, बान) यावरून कुलनाम (वंजू कुल) सुचविले आहे. ह्या कुलातील बहुतेक वनस्पती मोठे वृक्ष वा क्षुपे (झुडपे) असून त्यांचा प्रसार मुख्यतः उ. गोलार्धातील समशीतोष्ण प्रदेशात झाला आहे. तथापि द. गोलार्धामध्ये आणि आशियात (भारत, हिमाचल, चितगाँग इ. ठिकाणी) काही वंश आढळतात. यामध्ये एकूण सु. ८ वंश व ९०० जाती (ए. बी. रेंडेल यांच्या मते ५ वंश व ४०० जाती जी. एच्. एम्. लॉरेन्स यांच्या मते ६ वंश व ६०० जाती) आहेत. यांची पाने साधी, एकाआड एक, बहुधा काहीशी विभागलेली असून उपपर्णे पतिष्णू (गळून पडणारी) आणि खवल्यासारखी असतात. फुले एकलिंगी, एकावृत (परिदलांचे एकच मंडल असलेली), एकाच झाडावर, स्वतंत्र किंवा एकाच लोंबत्या फुलोऱ्यावर क्वचित कणिशावर [→ पुष्पबंध] किंवा एकेकटी येतात ती वायुपरागित [वाऱ्याद्वारे परागण होणारी → परागण] असतात. पुं-पुष्पात आणि स्त्री-पुष्पात खवल्यासारखी ४-६ परिदले, ४ किंवा अधिक आणि सुटी केसरदले असतात स्त्री-पुष्पात ३ किंजदले व किंजले असून तीन कप्प्यांच्या अधःस्थ किंजपुटातील प्रत्येक कप्प्यात दोन बीजके असतात [→ फूल]. फळ (कपाली) कठीण कवचाच्या सालीचे, एकबीजी व तळाशी चषकयुक्त (पेल्यासारख्या अवयवाने वेढलेले) असते हा पेला खवल्यांचा किंवा काटेरी असतो. त्यावरून क्युप्युलिफेरी हे या कुलाचे नाव पडले आहे. ⇨ ओक, ⇨ बीच, ⇨ मायफळ व ⇨चेस्टनट ह्या उपयुक्त वनस्पतींमुळे या कुलाला महत्त्व आले आहे.  संदर्भ : 1. Lawrence, G.H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.          2 . Rendle, A. B. Classification of Flowering Plants Vol. II. Cambridge, 1963.  

परांडेकर, शं. आं.