ज्येष्ठमध : (ज्येष्ठमध, ज्येष्ठीमध हिं. मुल्हट्टी, जैठिमध, मीठी लकडी गु. जेठिमध क. व सं. यष्टिमधू, मधूक इं. लिकराइस लॅ. ग्लिसिऱ्हायझा ग्लॅब्रा कुल-लेग्युमिनोजी, उपकुल-पॅपिलिऑनेटी). फार प्राचीन काळापासून ही उपयुक्त व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी  मनुष्याच्या परिचयाची आहे. मूलतः ही भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील असून दक्षिण यूरोप, पश्चिम व मध्य आशिया, बलुचिस्तान व उपहिमालय प्रदेश येथे रानटी अवस्थेत आढळते. स्पेनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर ही लागवडीत आहे. अमेरिका मोठ्या प्रमाणावर हिची मुळे आशिया मायनर, रशिया व तुर्कस्तान येथून आयात करते. भारतात पंजाबात, जम्मू व काश्मिरमध्ये 

ज्येष्टमध : (१) मुळाचा तुकडा, (२) मुळाचा उभा अर्ध.

हिची लागवड केली जाते. डोंगराळ व ओलसर प्रदेश, खोल, सकस व भुसभुशीत जमीन आणि ऊबदार हवा हिला आवश्यक असतात. ही सु. १ मी. उंच वाढते व साधारणतः तळापासून तिला अनेक फांद्या फुटतात व त्यांवर विषमदली संयुक्त पाने येतात दले चार ते सात जोड्या व शिवाय एक जास्त असते. पानांच्या बगलेत लहान जांभळट फुलांची कणिशे येतात. फुलांची पतंगरूप रचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨लेग्युमिनोजी  अथवा शिंबी कुलात वर्णिल्याप्रमाणे शिंबा (शेंगा) चपट्या, लहान, प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त) व अनेक बीजी बिया (३-४) मूत्रपिंडाकृती असतात. औषधात वापरला जाणारा ज्येष्ठमध म्हणजे या वनस्पतीचे सावलीत वाळविलेले मुळाचे तुकडे होत ते मऊ, लवचिक, सूत्रल (तंतुमय) व आतून पिवळसर असून त्यांना मधुर चव असते व त्यांचा उपयोग औषधात केला जातो. तथापि इतर विविध उपयोग आहेत. तंबाखूला स्वाद आणण्यास, मेवामिठाईत व बूट-पॉलिश कारखान्यात ज्येष्ठमधाचा उपयोग करतात. त्यात असलेले ग्लिसिऱ्हायझीन साखरेच्या ५० पट गोड असते. बिअर नावाच्या पेयात फेसाकरिता निरुपयोगी ठरलेल्या मुळांचा उपयोग करतात. तांबूल, चघळण्याचा गोंद, कित्येक औषधे यांतही चवीकरिता व स्वादाकरिता मुळे वापरतात. मध-अर्क शक्तिवर्धक, सौम्य रेचक, जंतुनाशक, कफोत्सारक (कफ पातळ करून पडून जाण्यास सुलभ करणारा), शामक, आरोग्य पुनःस्थापक, वेदनाहारक, पौष्टिक असून घसादुखीवर, जनन-मूत्र-मार्गातील रोगांवर व वृश्चिकदंशावर गुणकारी आहे. कडू औषधांची चव पालटविण्यास ह्याचा अर्क त्यात घालतात. मॅफ्‌टेक्स नावाखाली लाकडी तक्त्यात याचा सूत्रल भाग मिसळतात.                                             

महाजन, श्री. द.