उक्षी : (बागुळी हिं. कोकरे क. मर्सद सं. श्वेतघातकी लॅ. कॅलिकॉप्टेरिस फ्लोरिबंडा, कुल-काँब्रेटेसी). सु. १-२ मी. उंचीचे हे झुडूप सह्याद्रीवर विपुल आढळते शिवाय द. भारत, मध्य प्रदेश, ओरिसा, आसाम तसेच चित्तगाव, मलाया इत्यादींतील पानझडी जंगलांतही सापडते. सर्वांगावर केस पाने साधी, समोरासमोर, अंडाकृती, भाल्यासारखी टोकदार, खाली काहीशी तांबूस व खाचदार फुले फिकट व पिवळट हिरवी असून फांद्यांच्या शेंड्यावर परिमंजरीत मार्च-मेमध्ये येतात. छदे केसाळ व हिरवट संवर्तनलिका काहीशी भोवर्‍यासारखी व अधःस्थ किंजपुटावर सतत वाढत राहते [→ फूल] ती एकबीजी व पंचधारी फळावर ठळकपणे दिसते. पाकळ्या नसतात. संदले पाच, केसरदले दहा व किंजपुटात बीजके तीन [→ काँब्रेटेसी].

उक्षीची पाने कडू, स्तंभक (आकुंचन करणारी), कृमिनाशक व पोटदुखीवर सारक म्हणून देतात. पानांची भुकटी हिवताप व आमांशावर लोण्याबरोबर देतात व तसेच ती व्रणांवर लावतात. फळांची राख तेलात घालून अग्‍निदग्ध व्रणावर लावतात.

परांढेकर, शं. आ.