कलांचो : (हिं. हैझा, तातरा लॅ. कलांचो स्पॅथ्युलॅटा, कलांचो इंटेग्रा कुल क्रॅसुलेसी), फुलझाडांच्या कलांचो नावाच्या वंशातील पुष्कळ जाती विशेषेकरुन आफ्रिका व मादागास्कर येथे आढळतात. भारतात ११ जाती असून त्यांतील क. स्पॅथ्युलॅटा  ही उष्ण व उपोष्ण हिमालयात, काश्मीर ते कुमाऊँमध्ये ३१०-१,२४० मी. उंचीपर्यंत, सिमल्याजवळ १,८६० मी. उंचीपर्यंत, शिवाय दख्खनमध्ये आणि चीन, ब्रह्मदेश, जावा इ. प्रदेशांतही आढलते. ती मांसल, सरळ, ०.३-१.२ मी. उंच व बहुवर्षायू (अनेक वर्ष जगणारी)⇨औषधी असून खोड चौधरी व पाने साधी, चमच्यासारखी, लांबट, विशालकोनी, तळाशी शंकूसारखी, स्थूलदंतूर (कमीअधिक समान गोल दातेरी कडा असलेली) व गुळगुळीत, शेंड्याकडची बिनदेठाची व अरुंद आणि क्वचित त्रिदली असतात. फुले पिवळी ते लाल, आकर्षक, पुष्कळ व दाट परिमंजरीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरात येतात. पुष्पमुकुट नलिकाकृति, १.२५ सेंमी. लांब संवर्त त्यापेक्षा बराच लहान [→ फूल] पेटिकाफळ गुळगुळीत आणि पापुद्र्यासारखे बिया विपुल, लांबट व रेषायुक्त असतात.

कलांचो स्पॅथ्युलॅटा : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२)फूल, (३)पुष्पमुकुट (उघडलेला) व केसरदले, (४) फळ.

पाने पटकीवर देतात व त्यांची राख जखमांवर व गळवांवर लावतात रस मासिक पाळीच्या तापावर देतात, तो रेचक व पौष्टीक असतो. गुरे पाने खात नाहीत शेळ्या व बोकड यांनी पाने खाल्ल्यास विषबाधा होते. कलांचोच्या अनेक जाती बागेत, विशेषतः खडकाळ जागी, शोभेकरिता लावतात. बिया व कलमांनी लागवड होते. कलांचो सिलिंड्रिका या जातीत पानांच्या किनारीवर लहान कंदिका (लहान किंवा द्वितीयक कंद) येतात व त्या खाली पडून नवीन झाडे येतात.

पहा: क्रॅसुलेसी पानफुटी.          

 जमदाडे, ज. वि.