झ्यूस्य  : या आडनावाच्या फ्रेंच घराण्यातील पाच शास्त्रज्ञांनी अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांत वनस्पतिविज्ञानात आपल्या वर्गीकरणात्मक संशोधनाने महत्त्वाची भर टाकली.

आंत्वान द झ्यूस्य : (६ जुलै १६८६–२२ एप्रिल १७५८). यांचा जन्म फ्रान्समधील लेआँ येथे झाला. त्यांचे वैद्यकीय शिक्षण माँपेल्ये येथे झाल्यावर पॅरिसमध्ये त्यांनी वैद्यत व्यवसाय सुरू केला. १७०८ मध्ये पॅरिसमध्येच ते जार्डिन डेस प्लँटेसचे प्रमुख बनले. वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान यांसंबंधी अनेक संशोधनपर निबंध त्यांनी प्रसिद्ध केले. जे. पी. टूर्नफॉर यांच्या तीन खंडाच्या एका ग्रंथाचे (Institutiones rei herbaria, १७१९) व जेबारेलियर यांच्याही एका ग्रंथाचे (Plantae per Galliam Hisapaniam, et Italiam observatae, १७१४) त्यांनी संपादन केले.

बेर्नार द झ्यूस्य : (१७ ऑगस्ट १६९९–६ नोव्हेंबर १७७७). हे आंत्वान यांचे बंधू लेआँमध्येच जन्मले आणि त्यांनी माँपेल्ये येथेच वैद्यकीय पदवी मिळविली. १७२० मध्ये त्यांनी वैद्यक व्यवसाय सुरू केला परंतु १७२२ मध्ये त्यांची जार्डीन डेस प्लँटेसमध्ये निर्देशक म्हणून नेमणूक झाली. १७२५ मध्ये त्यांना ॲकॅडेमी डेस सायन्सेसमध्ये प्रवेश मिळाला. १७५९ मध्ये पंधराव्या लुई राजांनी व्हर्सेल्सच्या ट्रियॅनान येथील उद्याननिर्मितीस त्यांना पाठविले तेथे त्यांनी वनस्पतींच्या पासष्ट कुलांतील जातींची लागवड पद्धतशीर मांडणीत केली. याच आधारावर पुढे आंत्वान लॉरां यांनी वर्गीकरण-पद्धती बसविली. टूर्नफॉर यांच्या एका ग्रंथाची त्यांनी नवीन आवृत्ती काढली.

जोसेफ द झ्यूस्य : (३ सप्टेंबर १७०४–११ एप्रिल १७७९). वरील दोघांचे हे बंधूही लेआँमध्ये जन्मले आणि त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले १७३५ मध्ये ते शार्ल मारी द. ला. काँदामीन यांच्याबरोबर पेरू देशाला याम्योत्तर वृत्ताच्या मापनाच्या सफरीवर गेले द. अमेरिकेत ते छत्तीस वर्षे राहून १७७१ मध्ये परत फ्रान्समध्ये आले. तेथे असताना त्यांनी अनेक अमेरिकी वनस्पतींची बीजे बेर्नार यांच्याकडे पाठविली त्यामध्ये ‘हेलिओट्रोप’ या उद्यान-वनस्पतींचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.

आंत्वान लॉरां द झ्यूस्य : (१२ एप्रिल १७४८–१७ सप्टेंबर १८३६). वर उल्लेखिलेल्या तिघांचे हे पुतणे लेआँमध्ये जन्मले व पॅरिसमध्ये वनस्पतिविज्ञान व वैद्यकविद्या शिकले. त्यानंतर त्यांनी बेर्नार यांचे वनस्पतींच्या वर्गीकरणविषयक संशोधन कार्य सुरू ठेवले. १७८९ मध्ये त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ Genera plantarum secundum ordines naturales disposita प्रकाशित झाला. वनस्पतींची आधुनिक नैसर्गिक वर्गीकरण पद्धती त्याच आधारावर केलेली असून त्यामुळेच बाराँ झॉर्झ क्यूव्ह्ये यांना प्राण्यांच्या वर्गाची कल्पना सुचली. १७९४ मध्ये जार्डिन डेस प्लँटेसचे रूपांतर म्युझियम द हिस्टॉरी नॅचरेलेमध्ये करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. तेथे १७७० ते १८२६ पर्यंत ते वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक होते.

आद्रीअँ लॉरां आँरी द झ्यूस्य : (२३ डिसेंबर १७९७–२९ जून १८५३). आंत्वान लॉरां यांचे हे सुपुत्र पॅरिसमध्ये जन्मले व त्यांनी घराण्याची परंपरा पुढे चालू ठेवली. १८२४ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रबंधामुळेच त्यांना एम्. डी. पदवी मिळाली. रूटेसी, मेलिएसी व माल्पीघिएसी या वनस्पती-कुलांसंबंधी फार महत्त्वाची माहिती त्यांनी संकलित केली शिवाय त्यांच्या Cours elementaire de Botanique (१८४२–४४) या ग्रंथाच्या नऊ आवृत्त्या आजपावेतो प्रसिद्ध झाल्या आहेत व अनेक भाषांत त्याची भाषांतरे झाली आहेत.

पहा : वनस्पतींचे वर्गीकरण.

जमदाडे, ज. वि.