लाखेरी : (१) पाने व फूल यांसह फांदी, (२) फुलांचा उभा छेद, (३) फश, (४) बी.

लाखेरी : (पालोर, सर्कोली क. दोड्डनेक्करे, अंकेरकी सं. कृष्णमुखी इं. इंडियन ऱ्होडोडेंड्रॉन लॅ. मेलॅस्टोमा मलबॅथ्रिकम, कुल-मेलॅस्टोमेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक मोठे झुडूप, मेलॅस्टोमा ह्या त्याच्या प्रजातील एकूण ७० जाती असून त्यांपैकी भारतात फक्त ४ आढळतात. लाखेरीचा प्रसार आशिया खंडातील उष्ण प्रदेश, श्रीलंका, उ. ऑस्ट्रेलिया, पॉलिनीशिया इ. ठिकाणी आहे. भारतात वाळवंटाखेरीज सर्वत्र सु. १,८०० मी. उंचीपर्यंत व अंदमान बेटांत हे आढळते. बहुधा जंगलात, दमट प्रदेशांत, ओढ्यांच्या काठांनी, ओलसर जागी हे सापडते शोभेकरिता बागेत लावतात. हे साधारणपणे १·५–२·५ मी. उंच असून पाने साधी, समोरासमोर, रूंदट, भाल्यासारखी किंवा आयत, ५–११ X १·६–४·५ सेंमी., राठ व काहीशी केसाळ असतात. खोडावर पातळ व लालसर तपकिरी साल असते. खोडाच्या आणि फांद्यांच्या टोकांस शाखायुक्त गुलुच्छ [⟶ पुष्पबंध] प्रकारचे फुलोरे येतात. फुले सु. २·३ सेंमी. लांब, दिखाऊ, लालसर जांभळट असून त्यांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ मेलँस्टोमेसी अथवा अंजनी कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. मृदुफळ रूंदट अंडाकृती, सु. १-१·५ सेंमी. लांब, छेदित (टोकाकडे काहीसे सपाट), सतत राहणाऱ्या संवर्ताने वेढलेले [⟶ फूल] व अनियमितपणे फुटणारे असून बिया बारीक, असंख्य व काळ्या असतात.

पाने, फुले व फळे खाद्य आहेत. फळातील मगज गोड व थोडा स्तंभक (आकुंचन करणारा) असून रूची आणि स्वाद यांबाबत ⇨ ब्‍लॅकबेरीशी तुल्य असतो. फळांपासून काळा व जांभळा रंग मिळतो. पाने व फुले यांपासून लालसर रंग काढतात. ॲटलस रेशमी किडे या वनस्पतीवर पोसले जाऊन त्यांच्यापासून उत्तम, तलम रेशीम मिळते. ही वनस्पती स्तंभक असल्याने अतिसार, आमांश व श्वेतप्रदर (पांढरी धुपणी) यांवर वापरतात. साल व मुळे जखमांवर आणि कातडीच्या काही रोगांवर उपयुक्त असतात तसेच गुळण्या करण्यासही त्यांचा उपयोग करतात. कोवळी पाने व थोडी मिरी गोमूत्रात वाटून नाळगूद रोगात देतात त्यामुळे लघवी व शौच साफ होतात.

संदर्भ : Kirtikar. K. R. Basu, B. D. Indian Medicinal plants Vol. II, New Delhi, 1975.

पाटील, शा. दा.