पाथरी : (म., गु. भोंपाथरी हिं. बांकौ सं. गोलोमिका लॅ. लॉनिया सार्मेटोजा, लॉ. पिनॅटिफिडा कुल-कंपॉझिटी). फुलझाडांपैकी [⇨ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] द्विदलिकित वर्गातील ही लहान जमिनीसरपट वाढत राहणारी ⇨ अोषधी. श्रीलंका, मॉरिशस, ईजिप्त, पू. आफ्रिका व मलेशिया या प्रदेशांत व भारतात विशेषेकरून समुद्रकिनारी वाळवंटात आढळते. मुख्य मूळ मांसल असते. खोड लहान (०·३-०·९ मी. लांब) असून जमिनीसरपट थोडे वाढून पुन्हा मुळ्या फुटल्याने तेथे नवीन वनस्पती निर्माण करते. पाने (२·५-७·५ सेंमी. लांब) साधी व लहान खोडापासून (मुळाच्या टोकावर) वर वाढून त्यांचा गुच्छ बनतो ती जमिनीवर थोडी सपाट किंवा समांतर राहतात ती आयत, अल्पखंडित (अर्धवट विभागलेली) किंवा पश्वदंती (विभागांची टोके मागे वळलेली) काहीशी चमच्यासारखी व दातेरी असतात. काही लहान पाने जमिनीवर पानांच्या गुच्छातून वर वाढून येणाऱ्या बारीक व जमिनीसरपट खोडावर (फांदीवर) येतात ह्याच खोडावर स्तबक [⇨ पुष्पबंध] प्रकारचे पिवळे फुलोरे (९·३-१० मिमी. व्यासाचे) एकेकटे किंवा कधी दोन डिसेंबरात येतात. फुलातील पुष्पमुकुट लहान जिभेसारखा (जिव्हिकाकृती) असून त्याखालचा भाग (संवर्त) पांढऱ्या नरम केसांचा झुबका असतो [⇨ फूल]. कृत्स्नफल (शुष्क, एकबीजी व न तडकणारे फळ) दोन्ही कडे टोकदार व साधारण लांबट (५ मिमी. लांब) चौकोनी असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे व फुलाची आणि फुलोऱ्याची संरचना ⇨ कंपॉझिटी कुलात (ॲस्टरेसी अथवा सूर्यफूल कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. या वनस्पतींच्या वंशातील सर्व जातींत पिवळट चीक 

पाथरी (लॉनिया सामेटोजा) : (१) पाने व फुलोरे यांसह संपूर्ण वनस्पती, (२) स्तबक फुलोरा, (३) फूल, (४) फळ, (५) फळाचा आडवा छेद.

असतो. किनाऱ्यावरची मोकळी वाळू ही वनस्पती एकत्र बांधून ठेवते व त्यामुळे किनाऱ्याला स्थिरत्व येते तिला त्यामुळे ‘वालुकाबंधक’ म्हणतात. स्त्रियांना व दुभत्या जनावरांना अधिक दूध येण्यास आणि जनावरांना चारा म्हणून उपयुक्त आहे. ती पौष्टिक, मूत्रल (लघवी साफ करणारी), आस्वापक (गुंगी किंवा झोप आणणारी) व सौम्य रेचक असते. त्वचारोग, कावीळ व कुपचन आणि यकृतवृद्धी यांवर देतात. गोव्यात ⇨ दुधळऐवजी  वापरतात. संधिवातावर चीक लावतात.

पाथरी याच नावाने लॉनिया वंशातील एक दुसरी जाती (लॉ. न्युडिकॉलिस ) ओळखली जाते. ती तणाप्रमाणे भारतात सर्वत्र आणि हिमालयात २,४०० मी. पर्यंत आढळते. सामान्यपणे हिला पाथरी म्हणतात. सर्वसाधारणपणे हीसुद्धा काहीशा ओलसर जागी, शेतातील बांधावर, रस्त्याच्या कडेने, बागेतील पडसर जागेत वाढलेली आढळते. हिची शारीरिक लक्षणे पहिल्याने वर्णन केलेल्या जातीपेक्षा फारशी भिन्न नाहीत. पाने तशीच, काहीशी पश्चदंती, खंड गोलसर, किनारीवर तीव्र काटेरी व पाने ५–२५  X २·५ – ७·५ सेंमी. असतात. पानांच्या गुच्छातून वर वाढणाऱ्या फुलोऱ्याच्या दांड्यावर किंवा त्याच्या फांद्यांवर स्तबके (बहुधा ६-१० चे झुबके) खालून वर अग्रवर्धी क्रमाने (कोवळे सर्वांत वर आणि जून खालच्या भागांवर) आलेली असतात. लॉ. सार्मेटोजामध्ये स्तबके किंवा त्यांचे १-२ चे झुबके व काही पाने एका गुच्छातून निघून दुसरा गुच्छ निर्मिणाऱ्या बाजूच्या बारीक सरपटणाऱ्या फांद्यांवरच्या पेऱ्यांवर येतात दोन्हीतील हा फरक महत्त्वाचा आहे. लॉ. न्युडिकॉलिसची  फळे विविध आकाराची असतात. ही वनस्पती बोकडांना खाऊ घालतात तिचे थंडावा देणारे सरबत करतात पानांची आमटी किंवा भाजी करतात. पाथरीच्या लॉनिया या वंशात एकूण चाळीस जाती असून भारतात त्यांपैकी फक्त सातच आढळतात.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi, 1962.

पराडकर, सिंधु अ. परांडेकर, शं. आ.