कळलावी : (खड्या नाग हिं. कलिहारी गु. दुधियोवच्छोनाग क. कोळिकुक्कनगिड सं. अग्निमुखी, शक्रपुष्पी, गर्भघातिनी इं. ग्‍लोरी लिली लॅ. ग्‍लोरिओसा सुपर्बा कुल-लिलिएसी). ही  ओषधीय [→ ओषधि] (२⋅५–६ मी. उंच) शाखायुक्त वेल श्रीलंका, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, मलाक्का, दक्षिण व्हिएटनाम व भारतातील उष्ण भाग येथील दमट जंगलांत व कधी बागेत लावलेली  आढळते. हिमालयात २,१७० मी. उंचीपर्यंतही आढळते. हिचे भूमिस्थित (जमिनीतील) खोड (मूलक्षोड) वर्षानुवर्षे वाढत राहते, परंतु वायवी (जमिनीवरील), नाजूक बारीक खोड वर्षापुरतेच  राहते. मूलक्षोड पांढरे, ग्रंथिल (१५–३० X २·५ – ३·८ सेंमी.) व कमानदार असते. पाने बिनदेठांची, साधी, एकांतरित (एकाआड एक) किंवा संमुख (समोरासमोर), अंडाकृती-कुंतसम (भाल्यासारखी), टोके प्रतानांत (तनाव्यांत) रूपांतर पावल्याने वेल त्यांच्या साहाय्याने चढते. जुलै-ऑक्टोबरात मोठी फुले एकाकी व पानांच्या बगलेत किंवा शेंड्याकडे येतात फांद्यांवर पाने   जवळजवळ आल्याने त्यांचे झुबके बनतात. परिदले लांबट व सहा असून त्यांच्या कडा नागमोडी व रंग हिरवा, पिवळा, नारिंगी व लाल असा बदलत जातो [→ फूल] सात दिवसांपर्यंत ती कोमेजत  नाहीत. केसरदले सहा, लांब व पसरट किंजल लांब व फुलाच्या तळाकडे वळलेले [→फूल]. बोंड  पटभिदुर (अनेक कप्प्यांनी तयार झालेले व विभाजक पडद्यांपाशी फुटणारे) व लांबटगोल बिया  अनेक, गोलसर बीजावरण पंखासारखे व सच्छिद्र असते. मूलक्षोड रेचक, कृमिनाशक, पित्तवर्धक  असून कुष्ठ, चर्मरोग, मूळव्याध, शूळ (तीव्र वेदना) इत्यादींवर देतात प्रमेहावर त्यातील पिठूळ भाग पोटात देतात. फुले ज्वर व तहानेवर उपयुक्त. मूलक्षोड विषारी असल्याने प्राणघातक आणि  गर्भपातक परिणामाकरिता उपयोग केल्याचे उल्लेख आहेत. ‘गर्भघातिनी’ हे संस्कृत नाव त्यावरून  पडले असावे. अधिक प्रमाणात घेतल्यास प्राणघातक ठरते. पानांचे चूर्ण गिनीमध्ये केसातील उवा  मारण्यास वापरतात. 

पहा : लिलिएसी वनस्पति, विषारी.

जगताप, अहिल्या पां.

कळलावी