कायक वनस्पति : (लॅ.थॅलोफायटा). ज्या वनस्पतींत मूळ, खोड, पाने, फुले, फळे व बीजे ह्यांचा पूर्ण अभाव असल्याने ज्यांचे शरीर अत्यंत साधे असते अशा वनस्पतींना हे नाव दिले जाते. १७५४ मध्ये कार्ल लिनीअस (१७०७-१७७८) ह्या स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञांनी आपल्या वर्गीकरण पद्धतीतील ‘अबीजी वनस्पती’ (क्रिप्टोगॅमिया) या वर्गात अशा वनस्पतींना शैवले व कवक (बुरशीसारखी हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पती) या दोन गणांत स्वतंत्र स्थान दिले होते. थॅलोफायटा ही संज्ञा प्रथम एंडलिकर यांनी १८३६ मध्ये उपयोगात आणली होती. या संज्ञेचा उपयोग अबीजी वनस्पतींचे तीन विभाग (थॅलोफायटा, ब्रायोफायटा व टेरिडोफायटा) पाडताना शिंपर यांनी १८७९ साली केला [→ वनस्पति, अबीजी विभाग] . १८८० च्या सुमारास रुढ झालेल्या वर्गीकरण पद्धतीत अबीजी वनस्पतींच्या गटात या तीन विभागांचा पुरस्कार केला गेला. याला पुढे बरीच मान्यता मिळून हल्ली थोड्याफार फरकाने अनेक पाठ्यपुस्तकांत ही पद्धत समाविष्ट केली जाते. विसाव्या शतकाच्या आरंभापासून वनस्पतींतील परस्परांच्या आप्तभावावर नैसर्गिक वर्गीकरण करण्याचे प्रयत्न अधिक प्रमाणावर सुरू झाल्याने थॅलोफायटा हा विभाग नैसर्गिक असल्याबद्दल  शंका घेतल्या गेल्या. या विभागात अंतर्भूत केलेल्या शैवले, शैवाक (दगडफूल), कवक, सूक्ष्मजंतू इ. सर्व साध्या वनस्पतींचे पूर्वज फार प्राचीन व साध्या प्राण्यांसारखे (फ्लँजेलॅटासारखे) असावे व शैवले, कवक व सूक्ष्मजंतू त्यांपासून स्वतंत्रपणे अवतरले असावे, ही विचारसरणी आता मान्य झाल्याने कायक वनस्पती या संज्ञेला नवीन नैसर्गिक वर्गीकरणात स्थान नसावे असे मानतात. फक्त अभ्यासाच्या सोयीकरिता तिचा सामान्य वापर मात्र अद्याप करतात.

या सर्व वनस्पती भिन्नभिन्न आकार-प्रकाराच्या व एका किंवा अनेक कोशिकांच्या (पेशींच्या) बनलेल्या असून अत्यंत सूक्ष्मापासून ते सु.६० मी. पर्यंत लांबीच्या (शैवलासारख्या) आढळतात. त्यांच्या शरीरात वाहन ऊतक तंत्राचा (अन्नपाण्याची ने-आण करणार्‍या कोशिका समूहांच्या प्रणालीचा) पूर्ण अभाव असतो. त्यांची संरचना सर्वात साधी असून सर्व वनस्पतींत त्या प्रारंभिक मानल्या जातात. त्यांची प्रजोत्पादक इंद्रिये बहुधा एककोशिक असतात तथापि ती अनेक कोशिक असल्यास गंतुके (प्रजोत्पादक कोशिका) व बीजुके (लाक्षणिक प्रजोत्पादक अंगे) यांचे आच्छादन वंध्य कोशिकांचे बनलेले नसते. सलिंग प्रजोत्पादनानंतर रंदुकापासून (दोन प्रजोत्पादक कोशिकांच्या संयोगाने तयार झालेल्या भागापासून) अनेककोशिक गर्भाचा विकास स्त्री-जननेंद्रियात किंवा इतर शारीरिक भागांत होत नाही. मूळ, खोड व पाने यांसारखे अवयव काहींमध्ये आढळले तरी उच्च वनस्पतींत आढळणार्‍या त्या नावाच्या अवयवात असणार्‍या ऊतकांच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिका समूहांच्या) अभावामुळे ते अवयव खरे नव्हेत.

पहा : कवक; वनस्पतींचे वर्गीकरण; शेवाळी;  शैवले ;  शैवाक.

परांडेकर, शं.आ.