पोपटी : (हिं. तंकारी, टिपरी क. बोंदुला, गुड्डे हण्णु गु. मोटी पोपटी सं. तंकसी इं. केप गूजबेरी लॅ. फायसॅलिस पेरुव्हियाना कुल-सोलॅनेसी). हे क्षुप (झुडुप) मूळचे अमेरिकेच्या उष्ण भागातील असून अनेक देशांत, तसेच भारतातही बऱ्याच ठिकाणी त्याची लागवड करतात. हे बहूवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) व सु. १ मी. पर्यंत उंच असून त्यावर साधी एकाआड एक अंडाकृती, जाड, टोकदार व लवदार पाने असतात. फुले मोठी, घंटाकृती व फिकट पिवळी असून प्रत्येक पातळीवर फुलाच्या तळाशी मोठा जांभळा ठिपका असतो. मृदुफळे पिवळी, गोलसर, २–३ सेंमी, व्यासाची, खाद्य व दीर्घस्थायी (सतत राहणाऱ्या) संवर्ताने (पुष्पकोशाने) वेढलेली असतात. फळांत अनेक लहान चपट्या बिया असतात. फुलाची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ सोलॅनेसी कुलात (धोतर कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळांत कॅरोटीन व ॲस्कॉर्बिक अम्ल (क जीवनसत्त्व) असून ते आंबट गोड लागते. ही वनस्पती मूत्रल (लघवी साफ करणारी) असून पानांचा रस शौचाच्या तक्रारीवर व कृमीवर देतात. पाने गरम करून पोटीस बांधण्यास वापरतात. पानांत क्लोरोजेनिक अम्ल असते. फळे कच्ची किंवा पक्की खातात त्यांचा मुरंबा घालतात किंवा मिठाई करतात.

पोपटी : (अ) फुलांसह फांदी (आ) फळ: (१) संवर्ताच्या वेष्टनासह, (२) अर्धा संवर्त काढलेले.

उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, कुन्नुर, पुणे, आराकू दरी (आंध्र प्रदेश) इ. ठिकाणी या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आढळते. या पिकाला जमीन व हवामान ⇨ टोमॅटोप्रमाणे लागते. वाढ होत असताना उबदार हवा व पाऊस असणे चांगले. फळे धरल्यानंतर पुढील वाढ कोरड्या हवेत चांगली होते. नवीन लागवड कलमे किंवा बिया लावून करतात. प्रथम बी रुजवून १५–२० सेमी. उंच रोपे आली म्हणजे सप्टेंबर–ऑक्टोबरात ती चांगल्या सकस व खतावलेल्या जमिनीत लावतात अथवा एक वर्षाच्या झाडाची कलमे काढून त्याला सेरॅडिक्स-बी लावून मार्च–जुलैत प्रत्यक्ष लावणी करतात यांना फुले लवकर येतात व फळेही अधिक येतात. लावणीच्या वेळी २·५ किग्रॅ. कंपोस्ट किंवा शेणखत प्रत्येक कलमाच्या तळाशी देतात. कोरड्या ऋतुमानात भरपूर पाणी व खत दिल्यास फळे मोठी व संख्येने अधिक येतात. साधारणपणे तीन महिन्यांत पीक तयार होते. जानेवारी ते एप्रिलमध्ये फळे मिळतात. दर झाडामागे २–४ किग्रॅ. फळे मिळतात. हेक्टरी सु. ३३,६०० किग्रॅ. पीक येते. मिश्रपीक घेतल्यास १,६५०–२,२२५ किग्रॅ फळे मिळतात. दक्षिण भारतात जुलै–सप्टेंबरात दुसरा तोडा घेतात. मिश्रपीक न घेतल्यास तीन ते चार वर्षे त्याच पिकापासून फळे मिळत राहतात परंतु मिश्रपिकातून फक्त एकच पीक मिळते. या पिकाला केवडा रोग होऊन फळे व पाने गळून पडतात हा रोग तंबाखूवरच्या केवडा रोगाचाच एक वाण आहे. याशिवाय पाने खाणाऱ्या अळ्या आढळतात. त्यांवर बीएचसी फवारतात किडीमुळे (माइटमुळे) पाने गळून पडतात त्याकरिता पाण्यात विरघळणारे गंधक नियमितपणे फवारतात.

जोशी, रा. ना. परांडेकर, शं. आ.