एकांतरण, पिढ्यांचे : येथें प्रथम वनस्पतींतील पिढ्यांच्या एकांतरणासंबंधी विवरण केलेले असून नंतर प्राण्यांसंबंधीचे विवरण केलेले आहे.

अपवाद म्हणून काही वनस्पती (उदा., नील-हरित शैवले, पिथोफोरा, प्ल्यूरोकॉकस इ.) सोडल्यास बहुतेक सर्व वनस्पतींच्या जीवनचक्रात दोन अवस्था आढळतात. यांतील एक अवस्था अलैंगिक असून तिच्या कोशिकांत (पेशींमध्ये) रंगसूत्रांची (एका पिढीतून दुसर्‍या पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणार्‍या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची) संख्या व्दिगुणित (दुप्पट) असते [→ कोशिका]. दोन सारख्या किंवा भिन्न गंतुकांच्या (प्रजोत्पादक कोशिकांच्या) संयोगानंतर ही द्विगुणित अवस्था सुरू होते व बीजुकांच्या (लाक्षणिक प्रजोत्पादक भागांच्या) निर्मितीबरोबर संपते. या व्दिगुणित बीजुकधारी अवस्थेस बीजुकधारी पिढी म्हणतात. दुसरी अवस्था लैंगिक असून गंतुके निर्माण करते. या अवस्थेतील सर्व कोशिकांत रंगसूत्रांची संख्या एकगुणित (एकपट) असते. जनक-कोशिकांतील न्यूनीकरणानंतर (दुप्पट असलेली रंगसूत्रांची संख्या एकपट होते अशा प्रकारच्या कोशिका विभाजनानंतर) बीजुके तयार होताच ही अवस्था सुरू होते व गंतुकसंयोगाबरोबर संपते. ह्या एकगुणित गंतुकधारी अवस्थेस गंतुकधारी पिढी म्हणतात. ह्या दोन अवस्था एकानंतर दुसरी अशा निर्माण होतात व या प्रक्रियेस ‘पिढ्यांचे एकांतरण’  म्हणतात. ह्यातील महत्त्वाच्या घटना म्हणजे न्यूनीकरणाने होणारे कोशिकांचे विभाजन व गंतुकसंयोगने रंगसूत्रांची व्दिगुणित अवस्था पुन्हा येणे ह्या होत. कारण यामुळे वनस्पतींच्या लक्षणांत महत्त्वाचे बदल घडून येऊ शकतात [ → बहुगुणन न्यूनीकरण].

लैंगिक प्रजोत्पादनात दोन गंतुकांच्या संयोगाने द्विगुणित झालेली रंगसूत्रांची संख्या बीजुकजनक-कोशिकांतील न्यूनीकरणाने एकगुणित होते व त्यामुळे रंगसूत्रांची विशिष्ट संख्या त्या त्या अवस्थेत व त्या त्या विशिष्ट वनस्पतीत ठराविक राहते. काही वनस्पतींत या दोन्ही अवस्थांतील पिढ्यांचे प्राबल्य सारखे असून बाह्यरूपही सारखेच असते तथापि ह्या दोन पिढ्यांत कोशिकेतील रंगसूत्रांच्या संख्येत व प्रजोत्पादनाच्या पद्धतीत फरक असतो. काही वनस्पतींत दोन्हींपैंकी एक अवस्था प्रभावी असून दुसरी अवस्था वाढीसाठी प्रबल अवस्थेवर अवलंबून असते. वनस्पति-कोटीतील सर्वांत खालच्या दर्जाच्या (शैवले व कवके) वनस्पतींपासून या प्रक्रियेस प्रारंभ झालेला दिसून येतो.

शैवले : अगदी सर्वांत साध्या अशा नील-हरित शैवलात लैंगिक जननाची प्रक्रिया नसल्याने पिढ्यांचे एकांतरण आढळत नाही. हरित शैवलांतील बहुतेक वंशांत (उदा., स्पायरोगायरा,युलोथ्रिक्स, इडोगोनियम, इ.) गंतुकधारी पिढी प्रबल व प्रमुख असते व तिच्यापासून निर्माण होणार्‍या गंतुकांच्या संयोगाने बनणारी कोशिका (रंदुक) हीच बीजुकधारी पिढी असते (आ.१). रंदुकांचे लवकरच न्यूनीकरण होऊन बीजुके निर्माण होतात व प्रत्येक बीजुक रूजल्यानंतर पुन्हा अनेक कोशिका असलेली एकगुणित गंतुकधारी पिढी निर्माण होते. याच वर्गातील काही वनस्पतींत (उदा., क्लॅमिडोमोनस) दोन्हीही पिढ्या एककोशिक व बाह्यरूपात सारख्या असतात, तर इतर काही वनस्पतींत (उदा., क्लॅडोफोराउल्वाएंटरोमॉर्फा तसेच कवकांपैकीॲलोमायसीज) दोन्ही पिढ्या बहुकोशिक असून स्वरूपाने सारख्या दिसतात. त्यांच्या कोशिकांतील रंगसूत्रांच्या संख्येवरून व प्रजोत्पादनाच्या पद्धतीवरून ह्या एकमेकींपासून ओळखता येतात.

आ.२१. पिढ्यांचे एकांतरण (जटिलतादर्शक). बीजुकधारीची वाढती जटिलता व वाढता आकार आणि गंतुकधारीच्या आकारातील उतार व वाढता साधेपणा दर्शविणारा तक्ता.

पिंगल शैवलांपैकी कटलेरियालॅमिनेरिया, इ. शैवलांच्या बीजुकधारी व गंतुकधारी पिढ्या स्वरूप व आकाराने भिन्न असतात, तर डिक्टिओटामध्ये दोन्ही पिढ्या सारख्या व बहुकोशिक असतात, लॅमिनेरियात बीजुकधारी पिढी लांब पानासारख्या आकाराची व ठळक असून गंतुकधारी पिढी शाखायुक्त पण धाग्यासारखी असते.एक्टोकार्पस या शैवलात पिढ्यांच्या स्वरूपात अनित्यता आढळते. काही जातींत दोन्ही पिढ्या समान तर इतर काही जातींत असमान असतात. फ्यूकसमध्ये प्रमुख व प्रभावी पिढी बीजुकधारी असते. हिच्यावर असलेल्या अवयवांत एकगुणित गंतुके निर्माण होतात त्यांच्या संयोगाने बनलेल्या रंदुकापासून नवीन बीजुकधारी पिढी बनते.


तांबड्या शैवलात पिढ्यांच्या एकांतरणाचे अनेक प्रकार आढळतात. बॅट्रॅकोस्पर्मम या गोड्या पाण्यात वाढणार्‍या शैवलात प्रभावी व प्रमुख पिढी गंतुकधारी असते, अंदुकाचे (स्त्री-जनन कोशिकाचे) फलन व रंदुकनिर्मिती त्यावर होते बीजुकधारी पिढी म्हणजे हेच रंदुक, कारण लवकरच न्यूनीकरण-विभाजनाने त्यापासून एकगुणित कोशिकांचे तंतू व त्यांपासून एकगुणित बीजुके बनतात. ही बीजुके रुजून त्यांपासून एकगुणित, स्वतंत्र, साधी, तंतुयुक्त शैवलासारखी वनस्पती बनते (चांट्रासिया) त्यापासून पुन्हा अलैंगिक प्रकारे बीजुके व त्यांपासून पहिल्यासारखी गंतुकधारी पिढी, जन्मास येते. म्हणजे येथे एक प्रभावी गंतुकधारी पिढी, दोन एकगुणित बीजुके निर्माण करणार्‍या एकगुणित पिढ्या परंतु अत्यंत अल्पजीवी व साधी बीजुकधारी पिढी (रंदुक) ह्यांचा जीवनचक्रात अंतर्भाव होतो. काही उच्च जातीच्या तांबड्या शैवलांत (उदा., फायलोफोरा) गंतुकधारी पिढीपासून पहिल्याने व्दिगुणित बीजुकधारी पिढी व त्यापासून व्दिगुणित बीजुके ही बीजुके रुजून बनलेल्या स्वतंत्र बीजुकधारीपासून न्यूनीकरणाने एकगुणित बीजुके व यांच्यापासून पुन्हा पहिल्याप्रमाणे गंतुकधारी, अशा प्रकारे दोन बीजुकधारी व एक गंतुकधारी यांचे एकांतरण आढळते [→ शैवले].

कवके : ह्यांतील काही जातींत (उदा., पक्सिनिया हा तांबेरा) एकगुणित कोशिकांचे संयोग झाले, तरी त्यांतील प्रकले (केंद्रके) स्वतंत्र राहतात व दोन प्रकलांची कोशिका बनते. हिचे विभाजन एका विशिष्ट पद्धतीने होऊन प्रत्येक कोशिकेत दोन प्रकले असलेला धागा तयार होतो. बीजुकनिर्मितीच्या आधी या प्रकलांचे काही विशिष्ट ठराविक कोशिकांत संयोग होऊन रंदुके निर्माण होतात व लागलीच न्यूनीकरणाने एकगुणित रंगसूत्रे असलेली बीजुके निर्माण होतात या बीजुकांच्या रुजण्याने एकगुणित रंगसूत्रांचे एक प्रकल असलेल्या कोशिकांचे धागे निर्माण होतात [→ कवक].

शेवाळी : (ब्रायोफायटा). यांमध्ये गंतुकधारी पिढी महत्त्वाची व स्वतंत्र असते. आणि बीजुकधारी पिढी तिच्यावर अंशत: किंवा पूर्णत: अवलंबून असते. बीजुकधारी घटकांच्या स्वतंत्र अस्तित्वास आवश्यक असलेले काही बदल या वनस्पतींत झालेले दिसतात, परंतु मुळांच्या अभावी निदान पाण्यासाठी तरी बीजुकधारी पिढी गंतुकधारी पिढीवर अवलंबून असते यामुळे गंतुकधारी पिढी प्रमुख व बीजुकधारी पिढी दुय्यम दर्जाची ठरते. ह्या वर्गातील गंतुकधारी पिढी लहान, चापट, शाखायुक्त कायकाभ (ज्यांच्या शरीराचे मूळ, खोड यांमध्ये विभेदन झालेले नाही अशा) वनस्पतींच्या आकाराची किंवा पर्णयुक्त असून स्वतंत्र व हिरवी असते. बीजुकधारी पिढी (संपूर्णत: उदा., रिक्सिया किंवा अंशत: उदा., फ्युनेरिया) गंतुकधारी पिढीवर अवलंबून असून ती बहुधा हिरवी असते क्वचित नसतेही.  रिक्सियात बीजुकधारी संपूर्णत: गंतुकधारी पिढीच्या आत दडलेली असून त्यातील बहुतेक कोशिका न्यूनीकरणाने बीजुके निर्माण करतात.  अँथोसिरॉसमध्ये बीजुकधारी पिढीची वाढ तळाशी सतत चालू असते व ती हिरवी असल्यामुळे प्रकाश संश्लेषणाने (कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी यांच्यापासून सूर्यप्रकाशाच्या अस्तित्वात हरितद्रव्याच्या मदतीने) स्वत:चे अन्न तयार करू शकते.  फ्युनेरियात बीजुकधारीची वाढ मर्यादित असली तरी अन्ननिर्मिती व बीजुकांचे विकीरण यांसाठी आवश्यक ते बदल तिच्यात झालेले आढळून येतात [→ शेवाळी].

वाहिनीवंत अबीजी वनस्पती : (टेरिडोफायटा). यांत बीजुकधारी पिढीला मूळ, खोड, पर्णे इ. अवयव असून ती पूर्ण विकसित, दीर्घजीवी, वाहिनीवंत (द्रव पदार्थ वाहून नेणारे नलिकाकार भाग असणारी) व स्वतंत्र असते. तिच्या पानांवर किंवा पानांच्या बगलेत बीजुककोशांत न्यूनीकरणाने बीजुके निर्माण होतात. या बीजुकांच्या रुजण्याने गंतुकधारी पिढी जन्मास येते. बीजुके समान किंवा दोन प्रकारची असतात व त्यानुसार गंतुकधारी पिढ्या एक किंवा दोन प्रकारच्या असतात. गंतुकधारी पिढी अगदी लहान किंवा सूक्ष्म, अवाहिनीवंत, अल्पजीवी, अविकसित व कायकाभ असली तरीही बहुधा हिरवी असल्यामुळे स्वतंत्र असते.  सिलाजिनेला व तत्सम काही वंशांत मात्र ती अंशत: किंवा पूर्णत: बीजुकधारी पिढीवर अवलंबून असते. गंतुकधारी पिढीवर लैंगिक अवयव निर्माण होऊन त्यांमध्ये गंतुके निर्माण होतात व त्यांच्या संयोगाने बनलेले रंदुक जागच्या जागी वाढू लागते. यामुळे आरंभी अगदी लहान असताना बीजुकधारी पिढी गंतुकधारी पिढीवर अवलंबून असते नंतर लागलीच थोडी वाढ झाल्याबरोबर पाने व मूळ यांच्या वाढीमुळे ती स्वतंत्र होते [→ नेचे].

प्रकटबीजी व आवृतबीजी वनस्पती : या वनस्पतींत गंतुकधारी पिढी अधिकाधिक सूक्ष्म होत जाते व ती पूर्णपणे बीजुकधारी पिढीवर अवलंबून असते. ही पिढी बीजुकधारी पिढीच्या आधाराने वाढत असली व तीवर पूर्णत: अवलंबून असली तरीही त्यांतील रंगसूत्रांच्या संख्येवरून ती स्पष्ट ओळखता येते. बीजुकधारी पिढी ही प्रमुख, प्रबल, दीर्घजीवी व स्वतंत्र असते, तर गंतुकधारी पिढी सूक्ष्म, परावलंबी, अल्पजीवी व परतंत्र असते. बीजुके दोन प्रकारची असून त्यांपासून पुं-गंतुकधारी व स्त्री-गंतुकधारी पिढ्या निर्माण होतात. त्यावर अनुक्रमे पुं-गंतुके व स्त्री-गंतुके तयार होऊन त्यांच्या संयोगाने बनलेल्या नवीन रंदुकाची वाढ पूर्वीच्या बीजुकधारी पिढीवरच होते व बीजातील गर्भ हा भाग त्यापासून तयार होतो. काही वनस्पतींत दोन प्रकारची बीजुके निर्माण करणार्‍या वनस्पती (नर व मादी) स्वतंत्र असतात व बीजुकातील लिंगभेद ते बनविणाऱ्या बीजुकधारी घटकातच दिसून येतात. प्रकटबीज वर्गातील स्त्री-गंतुकधारी पिढी अनेक (साठ किंवा अधिक) कोशिकांची असते, तर आवृतबीजीत ती सर्वसाधारण आठ कोशिकांची बनलेली असते. पुं-गंतुकधारी अवस्थाही प्रकटबीज वनस्पतींत जास्तीत जास्त १८–२० कोशिकांची असून आवृतबीजीत ती फक्त तीन कोशिकांची असते [→ वनस्पती, बीजी विभाग].

आ.२. पिढ्यांचे एकांतरण (प्रमाणदर्शक). वनस्पतींच्या भिन्न गटांतील गंतुकधारी व बीजुकधारी यांच्या अवस्थांचे परस्परांशी प्रमाण दर्शविणारा तक्ता. वनस्पतीतील पिढ्यांच्या एकांतरणाचा क्रमविकास.

वनस्पतींच्या जीवनचक्रात पिढ्यांचे एकांतरण महत्त्वाचे आणि आवश्यक असले, तरीही काही वनस्पतींत एकांतरणाशिवाय खालील अपवादात्मक प्रकारांनी वंशवृध्दी होत असलेली आढळते : (१) शाकीय (कळ्या, कंद, खोड इत्यादींसारख्या एरव्ही फक्त पोषणाचे कार्य करणार्‍या इंद्रियांपासून होणारे) प्रजोत्पादन, (२) अगंतुकजनन, (३) अबीजुक-जनन वगैरे. शेवटच्या दोन प्रकारच्या वंशवृध्दीत गंतुकधारी अवस्था व्दिगुणीत रंगसूत्रांच्या कोशिकांपासून किंवा बीजुकधारी अवस्था एकगुणित रंगसूत्रांच्या कोशिकांपासून होऊ शकते [→ प्रजोत्पादन].


वरील विवेचनावरून असे आढळून येते की, खालच्या दर्जाच्या म्हणजेच शैवले, कवके व शेवाळी या वनस्पतींत गंतुकधारी पिढी प्रमुख असून बीजुकधारी पिढी लहान व अल्पजीवी असते. जसजसे उत्क्रांतीच्या क्रमाप्रमाणे वरच्या वर्गाकडे जावे तसतसा गंतुकधारी पिढीचा प्रबलपणा व आकार कमी कमी होत जातो व पूर्ण उत्क्रांत झालेल्या वरच्या (वाहिनीवंत) वर्गात गंतुकधारी पिढी फक्त काही कोशिकांची बनलेली व बीजुकधारी पिढीवर अवलंबित झालेली दिसते (पहा आ. २). बीजुकधारी पिढीची प्रवृत्ती याउलट दिसते. शेवाळ्यांत गंतुकधारी पिढीचे प्राबल्य कमी होण्यास व बीजुकधारी पिढीत स्वतंत्रपणे राहण्यास व वाढण्यास आवश्यक ते बदल होण्यास सुरुवात झालेली आढळते. वाहिनीवंत अबीजी वनस्पतींत बीजुकधारी पिढीच्या स्वतंत्र अस्तित्वात पोषक असे जास्त महत्त्वाचे फरक होण्यास सुरुवात होते. प्रकटबीज व आवृतबीज वनस्पतींत बीजुकधारी पिढी प्रमुख असून तीत जमिनीवर वाढण्यासाठी आवश्यक असलेले शारीरिक फरक झालेले आढळतात. ती पिढी दीर्घजीवी, स्वतंत्र व पूर्ण विकसितही झालेली आढळते यामुळे एकूण जमिनीवरच्या वनश्रीत त्या वनस्पतींची संख्या व ठळकपणा अधिक आढळतो.

परांडेकर, शं. आ. घन, सुशीला प.

प्राण्यांतील पिढ्यांचे एकांतरण : प्रत्येक प्राण्याला जगावयाचे असते आणि आपली जाती जगात कायम टिकविण्याकरिता, नैसर्गिक मृत्यू येण्यापूर्वी, आपल्या जातीच्या संख्येत भरही घालावयाची असते. जगण्याकरिता त्याला अन्नाची आणि संरक्षणाची आवश्यकता असते आणि दुसरा हेतू साध्य करण्याकरिता प्रजोत्पादनाने आपल्यासारखेच नवीन प्राणी त्याला उत्पन्न करावे लागतात. पण नुसती अगणित प्रजा उत्पन्न करण्याने हा हेतू साध्य होत नाही, तर उत्पन्न होणार्‍या नवीन प्राण्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी प्रसार करण्याकरिता साधनेही आवश्यक असतात. प्राणी मुक्तजीवी (स्वतंत्र राहाणारा) असला तर तो हा प्रश्न कमीअधिक प्रमाणात सोडवू शकतो, परंतु स्थानबध्द आणि परजीवी (दुसर्‍या जीवावर जगणार्‍या) प्राण्यांच्या बाबतीत वितरणाच्या (प्रसाराच्या) दृष्टीने खर्‍या अडचणी असतात. स्थानबध्द प्राण्यांच्या पिल्लांच्या अंगी एखाद्या नव्या ठिकाणी जाऊन तेथे स्थायिक होऊन नवे निवह (समूह वा वसाहती) तयार करण्याची क्षमता असावी लागते, तर परजीवी प्राण्यांच्या पिल्लांना नवा पोषक (परजीवी प्राण्याचे पोषण करणारा) शोधून त्याच्या शरीरात प्रवेश मिळविणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या प्राण्यांपैकी काहींमध्ये पिढ्यांचे एकांतरण (एक पिढी अलैंगिक रीतीने तर दुसरी लैंगिक रीतीने अशा आलटून पालटून पिढ्या उत्पन्न होणे) आढळते.

     जेव्हा एखाद्या प्राण्याच्या जीवन-चक्रात त्याने उत्पन्न केलेली संतती प्रौढ दशेत त्याच्यापेक्षा रूपाने अगदी निराळी असते आणि या संततीपासून उत्पन्न झालेली अपत्ये जेव्हा मूळ प्राण्यासारखी असतात तेव्हा या घटनेला पिढी-एकांतरण असे म्हणतात. सीलेंटेरेटा संघात पिढी-एकांतरणाची अनेक उदाहरणे आढळतात. ओबेलिया हा निवहजीवी प्राणी समुद्रातील खडकांना व इतर पदार्थांना चिकटलेला असतो. या निवहात अलैंगिक क्रियेने–मुकुलनाने (शरीरावर बारीक अंकुरासारखे उंचवटे उत्पन्न होऊन त्यांपासून नवीन प्राणी तयार होण्याने) नवीन पॉलीप (निवहातील व्यक्ती) उत्पन्न होत असतात. अन्न मिळवून निवहाचे पोषण करणे हे त्यांचे कार्य असते. पूर्ण वाढ झालेल्या निवहावर मधूनच विशिष्ट प्रकारचे मुकुल (अंकुरासारखे बारीक उंचवटे) उत्पन्न होतात आणि त्यांच्यापासून अगदी वेगळ्या रूपाचे मुक्तजीवी प्राणी (मेड्युसे) तयार होतात. काही मेड्युसे अंडी उत्पन्न करतात तर काही शुक्राणू. अंड्यांचे निषेचन (अंडे व शुक्राणू यांचा संयोग) होऊन निषेचित अंड्यापासून उत्पन्न झालेला जीव एखाद्या आधाराला चिकटतो आणि त्याच्यापासून पॉलिप तयार होतो, या पॉलिपापासून मुकुलनाने ओबेलियाच्या निवहाची वाढ होते. अशा प्रकारे ओबेलियाचे जीवनचक्र पूर्ण होते. या जीवनचक्रात पॉलिप-अवस्था (पहिली पिढी) आणि मेड्युसा-अवस्था (दुसरी पिढी) एकाआड एक उत्पन्न होतात म्हणून ओबेलियात पिढी-एकांतरण असते असे मानतात. मेड्युसे मुक्तप्लावी (स्वैर पोहणारे) असल्यामुळे पोहत किंवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि अशा प्रकारे ओबेलियाचा प्रसार होतो.

पुष्कळ सीलेंटेरेटांमध्ये या दोन पिढ्या सारख्याच आयुष्यमर्यादेच्या अथवा गुंतागुंतीच्या संरचनेच्या नसतात. उदा., जेली फिशमध्ये (सायफोझोआ वर्ग) मेड्युसा-अवस्था प्रबल असून पॉलिप-अवस्था अल्पकालिक असते, तर कित्येक हायड्रोझोआंमध्ये पॉलिप-अवस्था प्रभावी व मेड्युसा-अवस्था अल्पकालिक असते.

परजीवी प्राण्यांचा विचार करता यकृत पर्णाभ कृमीसारख्या काही प्राण्यांच्या जीवनचक्रांत पिढी-एकांतरण दिसून येते असे मानले जाते. पुष्कळ अंत:परजीवी (पोषकाच्या शरीरात राहणारा परजीवी) प्राणी एखाद्या नवीन पोषकाला प्रत्यक्ष संसर्गदूषित न करता दुसर्‍या एखाद्या भिन्नजातीय पोषकाच्या द्वारे संसर्गदूषित करतात. मध्यम पोषकांत अंत:परजीवी प्राण्याचा त्याच्यापेक्षा अगदी भिन्न रूपाचा डिंभ (अळीसारखी अवस्था) तयार होतो आणि त्याने अंतिम पोषकाच्या शरीरात प्रवेश केल्याशिवाय लैंगिक प्रजोत्पादन करू शकणारा प्रौढ प्राणी त्याच्यापासून तयार होऊ शकत नाही. यकृत पर्णाभ कृमीच्या निषेचित अंड्यातून मिरॅसीडियम डिंभ बाहेर पडतो. हा मुक्त अवस्थेत असतो आणि एखादी गोगलगाय (लिम्‍निया) आढळल्यावर तो तिच्या शरीरात शिरतो. गोगलगाईच्या शरीरात त्याचे स्पोरोसिस्टामध्ये रूपांतर होते. स्पोरोसिस्टाच्या विखंडनाने नविन स्पोरोसिस्ट तयार होतात, इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीरातील जनन कोशिकांपासून अलैंगिक रीतीने [→ अनिषेकजनन] रेडिया डिंभ तयार होतो व या रेडियाच्या शरीरातील जनन-कोशिकांपासून वरील पद्धतीनेच सरकॅरिया डिंभ तयार होतो. सरकॅरिये गोगलगाईच्या शरीरातून बाहेर पडतात. त्यांना अंतिम पोषकाच्या शरीरात प्रवेश मिळाला, तर त्यांचे प्रौढ यकृत पर्णाभ कृमींत रूपांतर होते. यावरून या कृमीच्या जीवनचक्रात एकाआड एक अशा दोन अवस्था असल्याचे दिसून येईल. अंतिम पोषकाच्या शरीरात लैंगिक रीतीने प्रजोत्पादन करणारी एक अवस्था (पिढी) आणि मध्यस्थ पोषकाच्या शरीरात अलिंगी रीतीने प्रजोत्पादन करणारी दुसरी अवस्था (पिढी). यामुळे यकृत पर्णाभ कृमीच्या जीवनचक्रात पिढी-एकांतरण आहे असे मानतात.

प्रोटोझोआ संघातील फोरॅमिनीफेरा, स्पोरोझोआ इ. वर्गांतील प्राण्यांत पिढी-एकांतरण असते अशी समजूत आहे, पण हा प्रश्न वादग्रस्त आहे. या प्राण्यांत अलैंगिक जनन सर्रास आढळते, पण बहुतेकांत लैंगिक जनन आढळत नाही. मात्र हिवताप उत्पन्न करणार्‍या प्लॅझ्मोडियम या अंत:परजीवी आदिजीवाच्या जीवनचक्रात अलैंगिक आणि लैंगिक अवस्था आढळतात, पहिली माणसाच्या शरीरात आणि दुसरी डासाच्या शरीरात असते.

प्रोटोकॉर्डेटाच्या थॅलिॲसिया वर्गातील साल्पासारख्या प्राण्यात पिढी-एकांतरण आढळते. हे प्राणी स्थानबध्द किंवा परजीवी नाहीत.

कर्वे, ज. नी.

संदर्भ : 1. Dittmer, H. G.Phylogeny and form in the plant Kingdom, New Jersey, 1964.

             2. Fuller, H. G.The Plant World, New York, 1960.

             3. Hyman, L. H.The Invertebrates, Vol. I, New York and London, 1940.

             4. Milne, L. G. Milne, M. Plant Life, New Jersey, 1959.