पाणकणीस : (अ) फुलोऱ्यासह वनस्पती : (१) पुलोरा (आ) पुं-पुष्प : (१) परिदले, (२) केसरदले (इ) स्त्री-पुष्प : (१) किंजपुट, (२) परिदले.पाण कणीस: (रामबाण, जंगली बाजरी हिं. पटेर, गोंड पटेर गु. घबाजरीन क. आपिनतैन सं. एरका इं. बुलरश, कॅट टेल,एलेफंट ग्रास लॅ. टायफा अँगुस्टॅटा कुल-टायफेसी). ही गवतासारखी दिसणारी, परंतु एकदलिकित फुलझाडांपैकी टायफेसी कुलातील व सु. १·५–३ मी. उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ ओषधी  उत्तर आफ्रिकेत व उत्तर आशियात आढळते. भारतात सर्वत्र दलदली जमिनीत वाढलेली आढळते. पाने साधी, एकाआड एक, बिनदेठाची, फार लांब, अरुंद व जाड असून पर्णतल आवरक (खोडास वेढणारा) व अर्धचितीय असतो. मूलक्षोड (जमिनीखालील आडवे खोड) जाडजूड असून त्यावर बहुतेक पाने दोन रांगांत असतात. ह्या भूमिस्थित (जमिनीतील) बहुवर्षायू खोडावर ऑगस्ट महिन्यात लांब, सरळ व दंडगोलासारखा फुलोरा (स्थूलकणिश) येतो तो बाजरीच्या कणसासारखा दिसतो. त्याच्या अक्षावर काही पाने येतात. फुले एकलिंगी, फार लहान, एकाच अक्षावर, लवकर गळून पडणाऱ्या महाछदाच्या बगलेत, पुं-पुष्पे वर व स्त्री-पुष्पे खाली अशी येतात. परिदले केसासारखी पुं-पुष्पात तीन एकसंध केसरदले, क्वचित अधिक स्त्री-पुष्पात एकच किंजदल असून किंजपुट ऊर्ध्वस्थ, किंजधर व किंजल लांबट आणि किंजल्क जिव्हिकाकृती [⟶ फूल]. बीजक एकच व लोंबते असते. कधीकधी दोन प्रकारची फुले भिन्न झाडांवर असतात. वंध्य किंजदले ही स्त्री-पुष्पात आढळतात. फळ (पकालिका) शुष्क व लहान. बी सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांशयुक्त), एकच व रेषांकित असते.

खोडाचा व पानांचा अनेक प्रकारे उपयोग करतात. काश्मीरमध्ये चाळणी आणि झोपड्यांच्या व शिकाऱ्यांच्या छपरांकरिता उपयोग करतात पंजाबमध्ये चटया, दोर व टोपल्या करतात. मुळे नदीकाठची जमीन एकत्र धरून ठेवतात व त्यामुळे धूप थांबते याकरिता ही झाडे लावली जातात. नदी पार करण्यास खोड व पाने यांच्या ‘तिन्हो’ नावाच्या तात्पुरत्या नावा करतात. फुलांपासून सिंधी लोक ‘बूर’ हा खाद्यपदार्थ बनवितात. सुकी फुले उष्णतारोधक वजनाने फार हलकी असतात. गाद्या व उशा भरण्यास ती वापरतात. मूलक्षोड स्तंभक (आकुंचन करणारे) व मूत्रल (लघवी साफ करणारे) असून कांजिण्या, हगवण व प्रमेह यांवर उपयुक्त असते. पक्व कणसातील मऊ भाग जखमेत भरल्यास जखम भरून येण्यास मदत होते.

एलेफंट ग्रास हे इंग्रजी नाव दोन गवतांच्या जातींसही वापरतात. टायफा एलेफंटिना  ही पाणकणसाची दुसरी जाती असून ती भारतात सामान्यपणे आढळते. तिचे उपयोग वर दिल्याप्रमाणेच आहेत. 

जमदाडे, ज. वि.