सोनामुखी (कॅसिया अंगुस्तिफोलिया) : (१) पानांफुलांसहित फांदी, (२) शिंबा, (३) शिंबेतील बिया, (४) फूल, (५) केसरदले.

सोनामुखी : (हिं. बं. सुनामकी, सन्ना; गु. सेनामकी, नाट-की-सन्ना; क. नेलवरिके, निलविरई; सं. मार्कंडी, भूम्यारी; इं. इंडियन सेन्ना, तिनेवेल्ली सेन्ना; लॅ. कॅसिया अंगुस्तिफोलिया ; कुल – लेग्युमिनोजी, उपकुल – सीसॅल्पिनिऑइडी). सोनामुखीचे बहुवर्षायू झुडूप ७०–१०० सेंमी.पर्यंत उंच वाढते. त्याचे उगमस्थान सौदी अरेबिया व आफ्रिकेतील उष्ण प्रदेश आहे. भारतात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक इ. राज्यांत त्याची लागवड करण्यात येते, परंतु अलीकडच्या काळात गुजरात व राजस्थान राज्यांत तिचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. जर्मनी, जपान, अमेरिका, इंग्लंड, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व इतर चाळीस देशांमध्ये या वनस्पतीची निर्यात होते व त्यापासून दरवर्षी सु. १५ कोटी रुपयांचे विदेशी चलन मिळते (२०१३).

पूर्वी भुईतरवड (कॅ. ऑबोव्हॅटा) व तत्सम जाती (कॅ. कोलोसेरिसिया) यांची पाने ज्या कारणांसाठी वापरली जात असत त्यासाठी आता सोनामुखी वापरली जाते. टाकळा, ⇨ तरवड व ⇨ बाहवा यांच्यासारखीच काही शारीरिक लक्षणे सोनामुखीत आहेत. संयुक्त व पिसांसारख्या पानांस ५–८ दलांच्या जोड्या, पानांच्या बगलेत पिवळ्या फुलांच्या मंजऱ्या आणि चपट्या व रुंद शिंबा असतात.

जमीन व हवामान : सोनामुखीचे पीक हलक्या, मुरमाड, पडीत व चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत उत्तम प्रकारे येते. पिकास कोरडे व उष्ण हवामान अधिक मानवते. पिकाची वाढ २५°–४०°  से. तापमानाला चांगली होते.

लागवड : उन्हाळ्यात जमीन उभी-आडवी नांगरून व काडीकचरा वेचून साफ करतात. त्यामुळे अधिक काळ जमीन तणविरहित राहते. १०–१५ टन कुजलेले शेणखत घालून जमीन भुसभूशीत करतात.

पिकाची लागवड मॉन्सून सुरू झाल्यानंतर जुलै ते सप्टेंबरपर्यंत केव्हाही करता येते. शेतातील पाण्याचा निचरा योग्य तर्‍हेने न झाल्यास पिकाला हानी पोहचू शकते. एक हेक्टर जमिनीकरिता साधारणपणे १५ किग्रॅ. बियाणे लागते. पेरणी करताना दोन ओळींतील आणि दोन झाडांतील अंतर ३० सेंमी. ठेवतात. पेरणीपूर्वी प्रति किग्रॅ. बियाण्याला ३ ग्रॅ. थायरम लावतात.

भरखते : सोनामुखी पिकास हेक्टरी ८० किग्रॅ. नायट्रोजन व ४० किग्रॅ. फॉस्फेट देतात. त्यापैकी १/३ नायट्रोजन व पूर्ण फॉस्फेट पेरणीच्या वेळेस देतात. उर्वरित नायट्रोजन एका महिन्याच्या अंतराने १/३ या प्रमाणात देतात.

पीक संरक्षण : आर्द्रतायुक्त ढगाळ वातावरणात पानांवर तपकिरी काळ्या रंगांचे डाग पडतात. त्याकरिता डायथेम एम.-४५ याची ०·१५% या प्रमाणात सात दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार फवारणी करतात.

काढणी : पेरणीनंतर ८०–१०० दिवसांनी सोनामुखीची पाने कापणीसाठी तयार होतात. पानांची तोडणी ७-८ सेंमी. या उंचीवरून करतात. पाने तोडताना झाडे उपटली जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. पहिल्या तोडणीनंतर ६०–७० दिवसांच्या अंतराने वर्षभरात चार वेळा तोडण्या करतात.

सोनामुखीपासून साधारणत: एक हेक्टर कोरडवाहू क्षेत्रात दर वर्षी ६-७ क्विंटल शेंगा मिळतात. एक वेळा पेरणी केल्यानंतर या पिकाचे ४-५ वर्षांपर्यंत उत्पादन घेता येते.

सोनामुखीचे ए.एल.टी.एफ.-२, सोना व तित्रेव्हेलीसेना हे सुधारित वाण आहेत.

औषधी उपयोग : प्रामुख्याने सोनामुखीची वाळलेली पाने व शिंबा यांचा औषधाकरिता वापर करतात. पानांमध्ये सेन्नोसाईडे हे महत्त्वाचे औषधी घटक असतात. सोनामुखीचा स्वाद कडवट, चिकट व उत्तेजक असून मुख्यतः रेचक म्हणून वापरले जाते. अपचन व अजीर्ण यांमुळे झालेल्या पोटदुखीवर सोनामुखीची पाने, हिरडा, बेहडा, आवळकाठी व सैंधवचूर्ण (पंचसकार) १-२ चमचे रात्री झोपतेवेळी घेतल्यास कोठा साफ राहतो. पचनशक्ती, भूक वाढविणे, चेहऱ्यावरील मुरुम, पुरळ तसेच मोठ्या कोशिकांमध्ये साचलेला वायू दूर करण्यासाठीसुध्दा सोनामुखीचा उपयोग होतो.

परांडेकर, शं. आ.