भाली : (लॅ. पॅनिकम पिलोजम कुल – ग्रॅमिनी). ⇨ वरी व ⇨ सावा यांच्या पॅनिकम या वंशातील ही एक उपयुक्त वनस्पती आहे. जगात या वंशाच्या एकूण सु. ५०० जाती असून त्यापैकी भारतात फक्त २३ आहेत. अनेक जाती चराऊ गवतांबद्दल व उपयुक्त धान्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. भादली उष्ण कटिबंधातील अनेक देशांत आढळते. भारतात (ओरिसा, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व तमिळनाडू येथे) आणि आफ्रिकेत पिकविले जाणारे हे एक खरीप गवत आहे. डोंगरावर हलक्या जमिनीत याचे पीक काढतात. हे गवत सु. ०.५ – १ मी. उंच वाढते व याला सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये परिमंजरीवर फुले येतात [⟶ पुष्पबंध]. याचे लालसर पिंगट दाणे (बी) ⇨ राळ्याप्रमाणे असून ते गरीब लोक शिजवून खातात अगर त्यांचे पीठ करून भाकरी करतात. ह्या गवताचा हिरवा चारा पाळीव जनावरांना खाऊ घालतात.

पहा : गवते ग्रॅमिनी ग्रॅमिनेलीझ.

ठोंबरे, म. वा.