बटाठ्याच्या ग्रंथिक्षोडाच्या आडव्या छेदाचा भाग : (१) त्वक्षा, (२) त्वक्षाकर, (३) संग्राहक मृदूतक.

त्वक्षा : (हिं. काग इं. कॉर्क लॅ. फेलेम). वनस्पतिविज्ञानात ⇨ वल्क या संज्ञेत सर्व ⇨ परित्वचेचा समावेश असून तिच्या बाहेरच्या भागास ‘त्वक्षा’ म्हणतात. रॉबर्ट हुक यांनी (१६६५) सूक्ष्मदर्शकाखाली प्रथमतः हेच ऊतक (समान कार्य आणि रचना असणाऱ्या कोशिकांचा–पेशींचा–समूह) पाहिले होते. याची निर्मिती करणाऱ्या कोशिकासमूहापासून (त्वक्षाकर) बनलेल्या कोशिकांच्या प्राथमिक आवरणावर सुबेरिन या मेदी (स्निग्ध) पदार्थाचे पापुद्रे साचून त्वक्षेची निर्मिती होते. सुंबेरिन पाण्याला अपार्य असल्याने या कोशिकांतील प्राकल (जीवद्रव्य) सुकून जाऊन त्याचे विघटन होते शिवाय रेझीन व टॅनीनयुक्त पदार्थ त्या कोशिकांत साचून राहतात त्यामुळे त्वक्षा हे मृत ऊतक बनते. त्याचे विशिष्ट गुणधर्म अपार्यता, स्थितिस्थापकता (ताण काढून घेतल्यावर मूळ स्थितीला परत येण्याचा गुणधर्म) व उष्णतारोधकता हे होत. बाजारात मिळणारे ‘बूच’ व तत्सम वस्तू कॉर्क–ओक [⟶ ओक] या उ. आफ्रिकेतील आणि प. यूरोपातील सदापर्णी वृक्षांपासून विशेष प्रयत्नानी मिळवितात. काही ओषधीय [⟶ ओषधि] वनस्पतींतही विशिष्ट परिस्थितीत त्वक्षा बनते परंतु क्षुपावर (झुडपावर) व वृक्षांवर सामान्यपणे कमीजास्त जाडीची त्वक्षा आढळते. वनस्पतीस जखम झाल्यावर तेथील जिवंत ऊतकापासून बनणाऱ्या किण नावाच्या ऊतकामध्ये व झाडांची पाने गळण्यापूर्वी तेथे त्वक्षा बनते. त्वक्षेची निर्मिती करणाऱ्या त्वक्षाकरापासून आतील बाजूस बहुधा उपत्वक्षा–द्वितीयक मध्यत्वचा–बनते परंतु बाहेरच्या बाजूस त्वक्षेचे अनेक थर बनतात. बटाट्याच्या गाठदार खोडात (ग्रंथिक्षोडात) आतील बाजूस संग्राहक मृदूतक, त्यावर त्वक्षाकर आणि बाहेर त्वक्षा कोशिकांचा थर असतो. त्वक्षाकराचा उगम ⇨ अभित्वचेत (अपित्वचेखालील कोशिकांच्या थरात) होते वेळी प्रथम ⇨ त्वग्रंध्राखाली प्रारंभिक कोशिका बनतात व ⇨ वल्करंध्रांची (जाड सालीवरील छिद्रांची) निर्मिती प्रथम होऊन त्यानंतर त्वक्षाकरापासून अनेक सुटे व अनेक थरांचे पडदे स्पर्शिकांसारखे बनतात. कॉर्कएल्म व स्वीटगम (इं. सॅटिन वॉलनट) यांच्या खोडावर त्वक्षायुक्त धारदार पंख असतात. मुळे व भूमिस्थित खोडांवर त्वक्षा फारशी नसते परंतु मूळ अथवा मूलक्षोड उघडे पडले असेल तेथे त्वक्षा बनते. काही फळांच्या सालींवर (उदा., सफरचंद, नासपती इ.) त्वक्षेचे ठिपके नेहमी आढळतात.

‘वल्करंध्रे’ व ‘शारीर, वनस्पतींचे’ या नोंदींतील संबंधित आकृत्याही पहाव्यात.

पहा : अपित्वचा ऊतककर.

संदर्भ : Eames, A. J. An Introduction to Plant Anatomy, Tokyo, 1953.

परांडेकर, शं. आ.