हिवर : (हिवार हिं. सफेद किकर, कारीर सं. श्वेत बारहुरा गु. हरीबावल क. बिलीजली इं. व्हाइट-बार्क्ड ॲकेशिया, व्हाइट-व्हॅलेम बार्क लॅ. ॲकेशिया ल्यूकोफोलिया कुल-लेग्युमिनोजी उपकुल-मिमोजॉइडी) . हा पानझडी वृक्ष महाराष्ट्रात (कोरड्या प्रदेशांत व रुक्ष विरळ जंगलांत), पंजाब, उत्तर प्रदेश, श्रीलंका व म्यानमार येथे आढळतो. हा ⇨ बाभूळ व ⇨ खैर यांच्या प्रजातीतील असून त्याची अनेक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी (शिंबावंत) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. 

 

हिवर वृक्षाची उंची ७.५–१५ मी. असून व्यास (घेर) १.२–१.८ मी. असतो. त्याच्या खोडावरील साल प्रथम फिकट पिवळी व नंतर काळसर रंगाची व जाड असून भरपूर फांद्यांचा विस्तार असतो. पाने संयुक्त, पिसा-सारखी, द्विगुणपिच्छाकृती (दोनदा विभागलेली) दले १२–२४, दलके ३०–६०, चिवट काटे (उपपर्णे) सरळ, २–५ मिमी. लांब देठावर अनेक पेल्यासारखी प्रपिंडे (ग्रंथी) फुलोरे गोटीसारखे फुले पांढरट पिवळी व लहान असून ऑगस्ट – नोव्हेंबरमध्ये येतात. शिंबा (शेंगा) १०–२० सेंमी. लांब व ५–१० सेंमी. रुंद, पातळ व चपट्या, पिवळ्या, हिरव्या किंवा तपकिरी रंगाच्या असून त्यांवर पिंगट किंवा करडी लव असते. बिया ८–१०, गडद तपकिरी व आयताकृती (६ ⇨ ४ मिमी.) असतात. 

 

हिवर वृक्षाचे लाकूड कठीण, बळकट, परंतु थोडे ठिसूळ असते. ते घरबांधणी, गाड्या व शेतीची अवजारे, फर्निचर व तेलघाणे यांस उपयुक्त असून ते जळणास चांगले असते. सालीपासून कठीण धागे काढून दोऱ्या व माश्यांची जाळी बनवितात. तसेच ती कातडी कमाविण्यास वापरतात. पानांपासून काळा रंग, तर सालीपासून लालसर तपकिरी रंग मिळतो. त्यांचा उपयोग रंजके व टॅनिन निर्मितीमध्ये करतात. सालीची पूड उसाचा रस व ताडी-माडीपासून बनविल्या जात असलेल्या मद्यात स्वादाकरिता घालतात. कोवळ्या शेंगांची भाजी करतात. सालीची किंवा बियांची पूड बाजरीच्या पिठात मिसळून भाकरी करतात. मोड आलेल्या बिया शिजवून खातात. बियांमध्ये प्रथिने (मुख्यतः अल्ब्युमीन व ग्लोब्युलीन) २६%, लिपिडे ५%, तंतू ७%, कार्बोहायड्रेटे ५८% व राख ४% इ. घटक असतात. तसेच त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न व मँगॅनीज ही खनिजे असतात. दुष्काळात पाने आणि शेंगा शेळ्यामेंढ्यांना चारतात. खोड व मूळ यांपासून डिंक मिळतो व तो औषधी आहे. 

परांडेकर, श. आ. मगर, सुरेखा अ.

 

हिवर