हूकर, सर जोसेफ डाल्टन : (३० जून १८१७–१० डिसेंबर १९११). ब्रिटिश वनस्पतिवैज्ञानिक. ते वनस्पतींच्या अभ्यासा-करिता केलेल्या अनेक सफरी, वनस्पतींच्या भौगोलिक वितरणाचा अभ्यास तसेचचार्ल्स डार्विन यांना प्रोत्साहित करणारे व त्यांच्या उत्क्रांती सिद्धांताचे समर्थन करणारे यांबद्दल प्रसिद्ध होते. ते प्रसिद्ध वनस्पति-वैज्ञानिकसर विल्यम जॅक्सन हूकर यांचे द्वितीय पुत्र होते. ते क्यू येथील रॉयल बॉटॅनिक गार्डन्सचे सहायक संचालक (१८५५–६५) व संचालक (१८६५–८५) होते.

 

सर जोसेफ डाल्टन हूकर
 

हूकर यांचा जन्म हेल्सवर्थ (सफोक, इंग्लंड) येथे झाला. त्यांनी ग्लासगो विद्यापीठातून एम्.डी. ही पदवी प्राप्त केली (१८३९). वडिलांच्या वनस्पतिसंग्रहामुळे व ज्ञानामुळे त्यांना किशोरावस्थेतच वनस्पतींसंबंधीसखोल माहिती होती. त्यामुळे ते अनेक सफरींमधील पहिल्या प्रवासासाठी पूर्ण सिद्ध होते. ते एच्.एम्.एस्. एरेबस या जहाजावर शल्यविशारद व वनस्पतिवैज्ञानिक म्हणून अंटार्क्टिकाच्या शोधमोहिमेवर गेले (१८३९–४३). त्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण आपल्या प्रवासावर आधारित अनेकग्रंथ लिहिले. त्यांपैकी द बॉटनी ऑफ द अंटार्क्टिक व्हॉयेज ऑफ एच्. एम्. डिस्कव्हरी-शिप्स एरेबस अँड टेरर इन १८३९–१८४३ (१८४४–६०) र्‍होडोडेंड्रॉन ऑफ सिक्कीम-हिमालया (१८४९) हँडबुक ऑफ द न्यूझीलंड फ्लोरा (१८६४) द फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया (१८७२–९७) आणि जर्नल ऑफ अ टूर इन मोरोक्को अँड द ग्रेट ॲटलास (१८७८) हे महत्त्वाचे होत. रॉकी पर्वत आणि कॅलिफोर्निया या ठिकाणच्या शेवटच्या शोधमोहिमांवरून त्यांनी अमेरिकी व आशियाई वनस्पतिसृष्टीतील (पादपजातींतील) सहसंबंध दर्शविणारे अनेक महत्त्वपूर्ण शोधनिबंध प्रसिद्ध केले (१८७७). त्यांच्या शोधमोहिमांमुळे विज्ञानाला अनेक नवीन वनस्पतींच्या जातींची माहिती झाली. त्यांपैकी अनेक जाती उद्यानविद्येच्या क्षेत्रात-परिचित झाल्या. त्यांनी संग्रहित केलेल्या संशोधन व माहितीमुळे त्यांना वनस्पतिभूगोलतज्ञ अशी ख्याती प्राप्त झाली. 

 

हूकर यांच्या प्रवासातून व अभ्यासातून निष्पन्न झालेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनस्पतींच्या भौगोलिक वितरणाचे विश्लेषण आणि त्यांतील विविधता. त्यांच्या कार्यामुळे तसेच चार्ल्स डार्विन यांचे मित्र असल्यामुळे त्यांना भूवैज्ञानिक सर चार्ल्स ल्येल यांच्यासमवेतजुलै १८५८ मध्ये लिनीअन सोसायटीचे (लंडन) ऐतिहासिक सभेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी प्राप्त झाली. या सभेत त्यांना डार्विन आणि आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी एकाच वेळी सादर केलेल्या ‘नैसर्गिक निवडीमुळे उत्क्रांतीची संरचना झाली आहे’, या दाव्याची पडताळणी करून त्यासंबंधी निर्णय द्यायचा होता. त्यांनी सकारात्मक निर्णय दिल्यानंतर त्यांच्यावर विज्ञानबाह्य घटकांकडून चौफेर टीका झाली. हूकर हे उत्क्रांती सिद्धांताची उपयोजिता आणि महत्त्व यासंबंधी समर्थन करणारे पहिले व्यक्ती होते. साधारणपणे वनस्पतिविज्ञान (विशेषतः वनस्पति-भूगोल) यांत उत्क्रांतीचे महत्त्व त्यांनी विशद केले. हूकर यांच्या कार्यात मानाचा शिरपेच खोवणारी घटना १८८३ मध्ये घडली. त्यांनी ⇨ जॉर्ज बेंथॅम यांच्या समवेत संकलित केलेल्या जेनेरा प्लॅण्टॅरम या ग्रंथाचा शेवटचा खंड त्या वर्षी प्रसिद्ध केला. या ग्रंथात त्यांनी वनस्पतींच्या सु. ७,५६९ प्रजाती आणि सु. ९७,००० बीजधारी जातींचे वर्णन केलेले आढळते. त्यांतील अनेक नमुन्यांचे त्यांनी स्वतः निरीक्षण केलेले असून बहुतांश जाती क्यू येथील संग्रहालयात आहेत.  

 

हूकर यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांमध्ये रॉयल सोसायटीचे अध्यक्षपद (१८७२–७७) आणि ‘सर’ हा किताब (१८७७) यांचा समावेश आहे.

 

हूकर यांचे सनिंग्डेल (बर्कशायर) येथे निधन झाले. 

जमदाडे, ज. वि. भारस्कर, शिल्पा चं.