पिंपरी : फुलांसह फांदी पिंपरी : ( क. बसरीगिड इं. जावा फिग, जावा विलो लॅ. फायकस बेंजामिना कुल-मोरेसी). या वृक्षाची जंगली जाती (प्रकार कोमोसा इं. गोल्डन फिग) पूर्व हिमालय, आसाम, चित्तगॉंग, अंदमान बेटे, दक्षिण भारत, छोटा नागपूर, आंध्र प्रदेशातील उत्तर सरकार जिल्हा, त्रावणकोर, ब्रह्मदेश व चीन येथे आढळते. पिंपरीची मलेशियात लागवड करण्यात येते.

पिंपरी सदापर्णी वृक्ष (१५-३० मी. उंच) असून त्याच्या शाखांचा विस्तार छत्रीप्रमाणे असल्यामुळे छायेकरिता तो उत्तम आहे. त्याचे सर्व भाग चिकाळ असतात. पाने एकाआड एक, साधी, ५-९ सेंमी. लांब व अंडाकृती, देठ बारीक पण १०-१७ मिमी. लांब कुंभासनी फुलोरा [⟶ पुष्पबंध] बिनदेठाचा, कक्षास्थ (बगलेत येणारा) गोलाकार, अंडाकृती आणि पिकला असता रक्तवर्णी असून व्यास ८ मिमी. -२ सेंमी. असतो. स्री-पुष्पे बिनदेठाची पुं-पुष्पांची संख्या फार मोठी व ती कुंभासनीत विखुरलेली गुल्म-पुष्पांना देठ असतात [⟶ फूल]. फळ औदुंबरिक असते [⟶ फळ]. कोमोसा प्रकारात मोठे (२ सेंमी. व्यसाचे), गोलाकार पण आधाराकडे निमुळते फळ असते ते सोनेरी किंवा नारिंगी  असून फळे असताना हा वृक्ष आकर्षक दिसतो.

फळातील लहान कृत्स्नफले अंडाकृती-मूत्रपिंडाकृती असतात. पिंपरीच्या पानांचा काढा व तेल यांचे मिश्रण व्रणांना लावतात. [ चीक डोळ्यतील स्वच्छमंडलावर (बुबुळाच्या पुढच्या पारदर्शक भागावर) आलेला पांढरेपणा घालविण्यासाठी वापरतात. आईच्या दुधात हा चीक मिसळून त्याचे दोन थेंब हा विकार झालेल्या मुलांच्या डोळ्यात (छोटा नागपूर प्रदेशांतील मुंडा आदिवासींमध्ये) टाकतात. चिकात ३०% काउचुक (रबर) व ५९% रेझीन असते. याचे लाकूड आगपेट्यांकरिता योग्य असल्याचे आढळले आहे. साल चिवट असून फिलिपीन्समध्ये तीपासून दोर बनवितात. पिंपरी याच नावाने दुसरी एक जाती (फा. त्सिएला) ओळखतात [⟶ नांद्रुक]. नवीन लागवड बियांनी करतात. (चित्रपत्र ५७) 

पिंपरी (जंगली जाती – कोमोसा प्रकार) : फळांसह फांदी.

पहा : अंजीर मोरेसी.                                      

ज्ञानसागर, वि. रा.