कमळ : (हिं. कमल, कनवाल, अंबुज गु. सुरिया कमळ क. तवरिगड्डे सं. पद्म, पंकज, सरसिज, अंबुज, कमल इं. इंडियन लोटस, सेक्रेड लोटस लॅ. निलंबो न्युसीफेरा निलंबियम स्पेसिओजम कुल-निंफिएसी). ही सुंदर, बळकट, जलवनस्पती मूळची चीन,जपान व भारत ह्या देशांतील असावी हिचा प्रसार भारतात सर्वत्र व इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत आहे. प्राचीन संस्कृत वाङ्‌मयात व वेदांत हिच्याबद्दल उल्लेख आहेत, तसेच महाकवी कालिदास व इतर भारतीय कवींनी वारंवार उल्लेख केला आहे ती हीच असावी. ही सामान्यतः गोड्या व उथळ पाण्यात वाढते. या वनस्पतीत दुधी चीक असतो. खोड (मूलक्षोड, जमिनीखालील खोड) लांब व पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते. पाने साधी, छत्राकृती, ६० – ९० सेंमी. व्यासाची, वर्तुळाकृती, लांब देठाची त्यांच्या कडा वर वळलेल्या, शिरा पात्याच्या मध्यापासून किरणाप्रमाणे पसरलेल्या व देठावर तुरळकपणे काटे असतात. फुले सुगंधी, एकाकी (एक एकटी), मोठी,१० – १५ सेंमी. व्यासाची, आकर्षक व लांब देठाची, पांढरी किंवा गुलाबी असून जुलै–ऑक्टोबरमध्ये येतात. संदले चार-पाच, पाकळ्या अनेक, पुष्पस्थली मोठी,भोवर्‍यासारखी, ५–१० सेंमी., टोकास सपाट व त्यामध्ये स्वतंत्र पोकळ्यांतून किंजदले असतात [→Ž फूल]. पक्व किंजदले (कृत्स्‍नफळ) लंबगोल, गुळगुळीत व एकबीजी बीजावरण सच्छिद्र. नवीन लागवड गड्डे व बियांपासून करतात. गड्डे (मूलक्षोड) भाजून खातात, वाळविलेले काप आमटीत घालतात, तळून खातात किंवा लोणचे करतात. त्यामध्ये रिबोफ्लाविन, निॲसीन व क आणि इ जीवनसत्त्वे असतात. कोवळी पाने व बियाही खातात. जून व वाळविलेली पाने पत्रावळीसारखी वापरतात. कमळांचा मध गुणकारी असतो. फुले थंड, स्तंभक (आकुंचन करणारी) असून पटकी व अतिसार यांवर देतात ज्वर व यकृताच्या तक्रारीवर उपयुक्त हृदयास शक्तिवर्धक असतात. बी ओकारी थांबविण्याकरिता, मुलांना लघवी होण्यास व ज्वरावर देतात ती चर्मरोगांवर व कुष्ठावर थंडावा येण्यासाठी देतात. मुळांची भुकटी मूळव्याध, आमांश, अग्‍निमांद्य इत्यादींवर गुणकारी असून नायटा आणि इतर चर्मरोगांवर लेप लावतात. श्री गणपति-पूजेत  कमलपुष्पाला महत्त्व आहे .

कमळ (निलंबियम स्पेसिओजम) : (१) पान, (२)फुलाचा उभा छेद, (३) किंजमंडल, (४) केसरदल, (५) बीज. लाल कमळ (निंफिया प्यूबिसेन्स) :(६) पान, (७) फुलाचा उभा छेद, (८) किंजमंडल, (९)पाकळ्या व केसरदले, (१०) बीजाचा उभा छेद.

लालकमळ : (रक्तकमळ हिं. कनवाल गु. निलोफल क. बिलितवरई, न्यादलेहबू सं. अलिप्रिय, शेषपद्म, रक्तोपल इं. इंडियन रेड वॉटर-लिली लॅ.निंफिया प्यूबिसेन्स कुल-निंफिएसी). या ⇨ ओषधीय जलवनस्पतीचे मूलक्षोड आखूड, उभे, गोलसर व ग्रंथिल असून ती भारतातील उष्ण भागात, उथळपाण्यात, सर्वत्र व आफ्रिका, हंगेरी, जावा, फिलिपीन्स इ. प्रदेशांत आढळते. पाने साधी, वर्तुळाकार, कोवळेपणी शराकृती (बाणासारखी), छत्राकृती, १५–२५ सेंमी. व्यासाची, तळाशी हृदयाकृती, तरंगित (लाटेसारखी) दंतुर, लांब व गुळगुळीत देठाची. त्यांची खालची बाजू लोमश (लवदार) असते. फुले सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येतात व ती एकाकी, ७⋅५–१० सेंमी. व्यासाची, गर्द लाल ते पांढरी असून फक्त सकाळी उमलतात. फुलात ४ संदले, १२ पाकळ्या व सु. ४०केसरदले आणि किंजल्काच्या किरणांवर उपांगे असतात. [Ž फूल]. मृदूफळ सच्छिद्र, मांसल, हिरवे व गोलसर असते. टंचाईच्या काळात या वनस्पतीचे सर्व भाग खातात. मूलक्षोड (गड्डे) कच्चे किंवा उकडून खातात. फुले व अपक्व फळांची भाजी करतात, बिया कच्च्या किंवा भाजून त्यांच्या पिठाची भाकरी किंवा कांजी करून खातात. अतिसेवनाने विषबाधा होते. फुलांचा काढा हृदयास शक्तिवर्धक मूलक्षोड आमांश, अतिसार, अग्‍निमांद्य, मूळव्याध इत्यादींवर उपयुक्त. फुलांचे घिल्लड, गुलकंद इ. पदार्थ करतात. धार्मिक महत्त्व वर दिल्याप्रमाणे.

उपल्याकमळ : (पोयानी, कृष्णकमळ हिं. व गु. नीलकमल, नीलपद्म सं. नीलोत्पल इं. ब्ल्यू लोटस ऑफ इंडिया, इंडियन ब्ल्यू वॉटर-लिली लॅ. निंफिया स्टेल्लॅटा कुल-निंफिएसी). कमळाची ही जात बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ओषधी असून तिचे मूलस्थान आग्‍नेय आशिया होय. मूलक्षोड लंबगोल पाने १२–२० सेंमी., वर्तुळाकृती, साधी पण तळाशी अरुंद खंडित भाग असतो कडा तरंगित किंवा अखंड, दोन्ही बाजूस गुळगुळीत व खालच्या बाजूस किरमिजी ठिपके फुले मोठी, फिकट निळी, जांभळी, पांढरी व गुलाबी, क्वचित मंद वासाची व दिवसभर उमललेली किंजल्क किरणांना उपांगे नसतात. बियांवर उभ्या रेषा असतात. सर्व भाग खाद्य असून बिया दीपक (भूक वाढविणाऱ्या) आणि मूलक्षोडाचे चूर्ण वरच्याप्रमाणेच औषधी असते.

पहा : जलवनस्पति निंफिएसी.

जमदाडे, ज. वि.

कमळ