बेहडा : (बेहेडा, भेडा, वेळा हिं. वहेरा गु. बेहेडो क. तारीगिड सं. बहेदुक, विभितक इं.बॅस्टर्ड मायरोबलन बेलिरिका कुल-कॉंब्रटेसी). ऋक् सहिता, तैतिरीय संहिता  आणि सुश्रुत संहिता  यांत बेहड्याचा (विभीतक) उल्लेख आला असून यज्ञीय इंधनाकरिता, फासे खेळण्याची फळे, औषधे इत्यादींसंबंधी याची माहिती आढळते ब्रूहत् संहितेत याचा घरबांधणीस उपयोग करू नये असेही नमूद आहे.

बेहडा : (१) फांदी, (२) फुलोरा, (३) कच्ची फळे, (४) पक्क फळे, (५) फळाचा आडवा छेद.

कौटिलीय अर्थशास्त्र, महाभारत, वामनपुराण  इ. ग्रंथांत याचे उल्लेख आले आहेत.

बेहडा हा सु. १५-२५ मी. (क्वचित ४० मी.) उंची व २.४-२.६ मी. घेर असलेला मोठा पानझडी वृक्ष ब्रम्हदेश, श्रीलंका आणि भारत येथे सर्वत्र मिश्र जंगलांत आढळतो. मुख्यतः फळे व लाकूड यांकिाता याची लागवड करतात. याची साल निळसर किंवा राखी रंगाची असून तिच्यावर असंख्य उभ्या बारीक भेगा असतात ती आतून पिवळट असते. कोवळ्या फांद्या व फुलांचे संवर्त (पाकळ्यांखालचा भाग) लवदार असतात. पाने साधी, एकाआड एक, चिवट, साधारण लंबगोल (१०-२० ७-१५सेंमी.) व गुळगुळीत असून ती फांद्यांच्या टोकांस विशेषेकरून अधिक दिसतात पानाची मध्यशीर दोन्ही बाजूंस ठळकपणे दिसते. पाने फेब्रुवारी-मार्चमध्ये गळतात व नंतर नवीन पालवी येते. कणिशप्रकारचे फुलोरे ख् पुष्पबंध, पानांच्या बगलेत येतात व त्यांवर फेब्रुवारी मे मेमध्ये करडी, हिरवट-पिवळट लहान, दुर्गंधीयुक्त, द्विलींगी व पुं-पुष्पे एकाच कहणयाात येतात पुं-पुष्पे फक्त टोकांस असतात फुलांना पाकळ्या नसतात ख् फूल,. द्विलींगी पुष्पामध्ये फळे बनतात. फळे (बेहडे) आठळीयुक्त, लंबगोल, तपकिरी, काहीशी पंचकोनी, लवदार, सु. २.५ सेंमी व्यासाची असून नोव्हेंबर ते फेब्रुवारीत पिकतात. बेहड्याची इतर सामानय लक्षणे  कॉंब्रटेसीत (अर्जुन कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.

फळे (बिया) भरपूर येतात व बीजप्रसारही चांगला होतो बियांत अंकुरणक्षमता चांगली असते. पहिल्या एकदोन वर्षात लहान नवीन रोपे सावलीत चांगली वाढतात ह्या कारणांमुळे झाडांचा नैसर्गिक प्रसार भरपूर होतो. दाट जंगलातील हवामान त्यांना अनुकूल असते. पक्व फळे खाली पडल्यावर गोळा करून त्यांची टरफले काढतात व लागलीच बिया उन्हात सुकवितात. सुमारे वर्षभर बियांची अंकुरणक्षमता टिकून राहते तोपर्यंत त्या साठवून ठेवता येतात. बिया किंवा सु. एक वर्षाची रोपे पावसाळ्याच्या आरंभी लावुन नवीन लागवड करतात. साधारणपणे पंधरवड्यात बियांपासून रोपे बनतात तीन ते चार महिन्यांची रोपेही लावतात व ते श्रेयस्कर असल्याचे आढळले आहे. झाडांची वाढ प्रथम कमी असते परंतु पुढे ती झपाट्याने होते. सुमोर २० वर्षात त्याच्या खोडाचा व्यास १२ सेंमी. होतो व ७० वर्षात तो दुप्पट होतो.

बेहड्याचे लाकूड पिवळट करडे, कठीण, बळकट असून टिकाऊ नसेते सावलीत ते अधिक टिकते तसेच पाण्यातही टिकते. कापण्यास व रंधण्यास सोपे पण गुळगुळीत करण्यास कठिण वजनाने साधारण सागवनासारखे घरबांधणीत व किरकोळ कामास बरे कागदाचा लगदा, फळ्या, होडगी, तरफे, गाड्या, नांगर, प्लायवुड, कोळसा व जळाऊ लाकूउ इत्यादींसाठी ते वापरतात. फळे कातडी रंगविण्यास व कमाविण्यास चांगली. बियांतील गर खाद्य पण जास्त खाल्ल्यास विषारी. बियांचे तेल केसांना लावतात, ते संधिवातावर चोळतात, साबणाकरिता त्याचा उपयोग होतो मात्र त्यात खेबरेल व गोडे तेल मिसळावे लागते. सालीतुन पाझरणाऱ्या डिंकाची दतर प्रकारात भेसळ करतात तो पाण्यात फारसा विरघळत नाही. सालहत १.४-७ टक्के टॅनीन असते. फळ कडू, स्तंभक (आकुंचन करणारे), शक्तिवर्धक, सारक (पोट साफ करणारे) व ज्वरनाशी असते मूळव्याध, जलशोफ (पाणी साचून सूज येणे). अतिसार, कोड, पित्तविकार, अग्निमांद्य (भूक मंद होणे) व डोकेदुखी यांवर उपयुक्त. फळातील गर मधातून डोळे सुजल्यावर लावतात. अर्धपक्व फळ रेचक बियांतील गराने गुंगी येते. फळात १७टक्के टॅनीनयुक्त पदार्थ असलयाने ते खोकल्यावर गुणकारी असते. ⇨हिरडा  बेहडा व आवळकाठी [ आवळ्याच्या गराचे सुके तुकडे → आवळा] यांच्या चूर्णास `त्रिफळा’ म्हणतात. त्यात बहुधा १ भाग, हिरडा, २ भाग बेहडा, व ३ भाग आवळकाठी असते. त्रिफळा चूर्णाचा उपयोग देशी वैद्यकात बराच करतात. ते चूर्ण सारक असून मूळव्याध, पोटाच्या तक्रारी, नेत्रविकार इत्यादींवर गुणकारी असते. बेहड्याची पाने `टसर’ रेशीम किड्यांना खाऊ घालतात.

संदर्भ :  1. C. S. I. R. The Wealth of India,Raw Materials, Vol. X, New Delhi,1976.             2. Jain, S. K. Medical Plants, New Delhi,1968.             3. Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. II, Delhi,1975.             4. काशीकर, चिं. ग. भारतीय वनस्पतीचा इतिहास, नागपूर, १९७४.

जोशी, रा. ना. परांडेकर, शं. आ.