सॅपिंडेलीझ : (अरिष्ट गण). हे फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एका गणाचे शास्त्रीय नाव आहे. ⇨ रिठा ह्या सॅपिंडेसी (अरिष्ट) कुलातील व सॅपिंडस या प्रजातीतील वनस्पतीच्या संस्कृत नावावरून कुलाला व गणाला त्या अर्थाची संस्कृत नावे दिली आहेत. जी. एच्. एम्. लॉ रेन्स यांच्या पद्घतीत सॅपिंडेलीझ गणात ११ उपगण व २३ कुले (आडोल्फ एंग्लर यांच्या मते १२ उपगण व २३ कुले) आहेत. कारण सॅपिंडिनी हा उपगण लॉरेन्स यांनी मानलेल्या पद्घतीत नाही. ए. बी. रेंडेल यांनी सॅपिंडेलीझ गणात ⇨ ॲनाकार्डिएसी (आमकुल), ⇨ सॅपिंडेसी, ॲसरेसी, हिपोकॅस्टनेसी व पॉलिगॅलेसी ह्या पाच कुलांचा समावेश केला आहे. पॉलिगॅलेसी कुलाबद्दल रेंडेल यांनी शंका व्यक्त केली असून एंग्लर यांच्या पद्घतीत त्या कुलाचा समावेश ⇨ जिरॅनिएलीझ मधील (भांड) गणातील पॉलिगॅलिनी या स्वतंत्र उपगणात केलेला आढळतो. तथापि ई. वॉर्मिंग यांनी सॅपिंडेलीझमध्ये ठेवण्यास दुजोरा दिला आहे. जिरॅनिएलीझ, रूटेलीझ (सताप) व यूफोर्बिएलीझ (एरंड) ह्या गणांशी सॅपिंडेलीझचे आप्तभाव अनेकांना मान्य असून ⇨ जॉन हचिन्सन यांच्या मते सॅपिंडेलीझचा उगम यूफोर्बिएलीझ गणापासून झाला असावा सी. ई. बेसी यांनी सेलॅस्ट्रॅलीझपासून(ज्योतिष्मती गण ) तो उगम झाला असावा, असे मानले आहे.

सॅपिंडेलीझ गणातील बहुतेक वनस्पती झुडपे व वृक्ष असून त्यांचा प्रसार मुख्यतः उष्णकटिबंधात आहे. त्यांची पाने बहुतांशी संयुक्त व पिच्छाकृती (पिसासारखी विभागलेली) असून क्वचित ती हस्ताकृती (पंजासारखी) असतात. उपपर्णे (तळाशी असणारी उपांगे) क्वचित फुले बहुधा द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, एकसमात्र किंवा अरसमात्र [एक किंवा अनेक परंतु केंद्रातून जाणाऱ्या उभ्या पातळ्यांनी सारखे भाग होणारी ⟶ फूल], अवकिंज किंवा परिकिंजाकडे कल झुकणारी बिंब अवकिंज प्रदले (पाकळ्या) बहुधा असतात त्याखाली संदले परिहित [छपरावरील कौलांप्रमाणे ⟶ पुष्पदलसंबंध] केसरमंडले दोन किंजमंडलात ऊर्ध्वस्थ (संदलापेक्षा वरच्या पातळीत) किंजपुट व प्रत्येक पुटकात (कप्प्यात) एक ते दोन क्वचित अधिक बीजके (अपक्व बीजे) बीजकविन्यास (बीजकांची मांडणी) अक्षलग्न (किंजपुटातील आसाला चिकटलेली ) फळे विविध व बहुधा एकबीजी बियांत पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) नसतो.

पहा : सॅपिंडेसी.

संदर्भ : 1. Lawrence, G. H. M. Taxonomy of Vascular Plants, New York, 1965.

2. Mitra, J. N. An Introduction to Systematic Botany and Ecology, Calcutta, 1964.

3. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge,1963.

परांडेकर, शं. आ. जमदाडे, ज. वि.