वासा : (उधा, मेस, तेलबांबू हिं. बांस, नरबंस, कोपर क. किली बिदरा गु. नाकोरवंस सं. वंश इं. मेल बांबू, सॉलिड बांबू लॅ. डेड्रोकॅलॅमस स्ट्रिक्टस कुल-ग्रॅमिनी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ही एक गवताची जाती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), सु. ६-१५ मी. उंच व २.५-७.५ सेंमी. व्यासाची, बळकट पेरेदार व बिनकाटेरी खोडाची असून काही वर्षानी लावल्या ठिकाणी अनेक खोडांची बेटे बनतात. हा पानझडी वृक्ष असून याला फांद्या असतात व खोडात फार लहान पोकळी असते किंवा नसते. खोड आरंभी निळसर, हिरवे परंतु नंतर फिकट किंवा पिवळट होते. त्यावर काहीशी फुगीर पेरी स्पष्ट दिसतात व कांडी ५-८ सेंमी. व्यासाची व ३०-४५ सेंमी. लांब असतात तसेच पेऱ्यांवर नंतर गळून पडणारी, तपकिरी रंगाची, सु. ७.५-३० सेंमी. लांब, जाड, केसाळ व त्रिकोनी आवरणे असतात. याला अनेक गर्द, गोलसर झुबक्यांनी भरलेले फुलोरे [परिमंजरी ⟶ पुष्पगंध] येतात व त्यांवर असंख्य, केसाळ व टोकदार दुय्यम फुलोरे (कणिशके) असतात. फुलांचा मोसम नोव्हेंबर ते फेब्रुवारी असतो तथापि तो अनियमित व तुरळक आणि कधीकधी मोठ्या क्षेत्रात सामुहिक स्वरूपाचा असतो. एप्रिल ते जूनमध्ये बिया येतात. त्या गव्हाच्या तुसे असलेल्या शुष्क फळांप्रमाणे पण आकारमानाने त्यांच्या अर्ध्याइतक्या असतात. बी लंबगोल, पिंगट, व चकचकीत असते बिया निसर्गतः पावसाळ्यात त्वरित रुजून लहान रोपटी बनतात, ती जलद वाढतात. याशिवाय तळाशी असलेल्या जमिनीतील जुन्या आडव्या खोडापासून [मूलक्षोडापासून ⟶ खोड] त्याच वेळी सु. २० नवीन खोडे वर वाढू लागतात. नवीन लागवडीकरिता बिया, मुनवे, मूलक्षोडाचे तुकडे आणि छाट कलमे वापरतात. यांची वाढ जलद होते. मूलक्षोडांच्या तुकड्यांपासून लवकर (सु. ६ वर्षांत) उपयुक्त वाढ होते. त्यानंतर कापणी होते. साधारणपणे दर तीन वर्षांनी परिपक्व व जून खोडे जमिनीपासून सु. ३० सेंमी. वर शक्य तर हिवाळ्यात कापून घेतात. त्या काठ्या लांबसडक, सरळ व टणक असल्याने त्यांना चांगला भाव येतो. फुले येऊन गेलेली खोडे कागदाच्या लगद्याकरिता वापरतात.

वाशाचा प्रसार महाराष्ट्रात व भारतातील सर्व रुक्ष जंगलांत आणि जावात व म्यानमारमध्ये (ब्रह्मदेशात) आहे. सर्व भारतीय बांबूंत वासा अत्यंत काटक असून त्याचे विवध उपयोग करतात. उदा., घरबांधणी, शेतीची अवजारे, कुंचले, तट्टे, टोपल्या, तिरकमठे इत्यादी. भारतात त्याचा मुख्यत्वे कागदाच्या लगद्यासाठी उपयोग केला जातो. तसेच रेयॉन उद्योगात वासा वापरण्यात सोयीचा असल्याचे आढळले आहे. विशेष क्रियाशील म्हणजे सक्रियित कार्बन बनविण्यासही याचा उपयोग करतात. ‘राक्षसी वासा’ या नावाची याच्या प्रजातीतील एक जाती (डें. जायगँटियस) आसाम, श्रीलंका, बंगाल, मलबार इ. ठिकाणी लागवडीत आहे. तिचे खोड सु. ३० सेंमी. उंच असून कांड्याचा व्यास २० – २५ सेंमी. असतो. कांड्याचा उपयोग भांड्यांसारखा करतात. काही कीटक व प्राणी वाशाचे कोवळे भाग कुरतडून खाऊन नुकसान करतात. तांबेऱ्याची एक जातीही याला उपद्रवकारक आहे. १६% झिंक क्लोराइड ५/६ दिवस फवारल्यास नवीन खोडांना कीटक व कवचांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यहीन सूक्ष्म वनस्पतींचा) उपद्रव होत नाही. रोगट भाग कापून जाळून टाकावे लागतात. कापून साठविलेल्या वाशांवरही झिंक क्लोराइड फवारणे इष्ट असते.

पहा :  ग्रॅमिनी बांबू.

संदर्भ :  C. S. I. R., The Wealth of India, Raw Materials, Vol. III, New Delhi, 1952.

परांडेकर, शं. आ.