साजेरी (सॅगेरियाडाल्झेली) : पाने व कळ्यांसह फांदी. साजेरी  :  (म. कोछ्क , हरकिंजल , उंडी क.सगरे लॅ.सॅगेरिया लॉरिफोलिया कुल-ॲनोनेसी). फुलझाडांपैकी [ ⟶ वनस्पति , आवृतबीज उपविभाग] हा एक सदापर्णी , मध्यम आकारमानाचा , शोभेचा व ⇨ लॉरेल सारखा वृक्ष असून कोकण व पश्चिम घाटातील दाट जंगलांत , सस. पासून सु. ७०० मी. उंचीपर्यंत आढळतो. तसेच माथेरान , नागोठाणे , त्रावणकोर व उ. कारवार इ.ठिकाणीही हा वृक्ष आढळतो. ह्याच्या सॅगेरिया ह्या प्रजातीत सु.१ ० जाती असून भारतात ४ जाती आढळतात. ह्याच्या खोडावरील साल गडद रंगाची व खवलेदार पाने साधी , मोठी ( १३ – २३ × ६· ५ – ७· ८ सें मी .) , जाड , चिवट , वर चकचकीत व खाली फिकट १ ० – १ ५ पां ढऱ्या , द्विलिंगी , सच्छदक (तळाशी उपांगे असलेल्या) फुलांचे झुपके फांद्यांवर असलेल्या कठीण गाठींवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येतात. संदले तीन , गोल सर व तळाशी जुळलेली प्रदले ( पाकळ्या) सहा , जाड , परिहित , सुटी , दोन्ही मंडलात सारखीच केसरदले (पुं-केसर) १२ – १ ८ व तंतुहीन किंजदले (स्त्री-केसर) व किंजपुट ३ – ६ पक्व किंजपुटाचा व्यास २· ५ सेंमी. असून तो गोलसर व गुळगुळीत असतो बिया अनेक असतात. याची इतर सामान्य लक्षणे ⇨ ॲनोनेसी कुलात (सीताफळ कुल) वर्णन केल्याप्रमाणे असतात. याचे लाकूड फिकट पिवळे किंवा लाल रंगाचे , चिवट , मजबूत , लवचिक , कठीण व जड असून ते सजावटी सामान , गाड्यांचे दांडे , नाळी , घरबांधणी , शोभेच्या वस्तू इत्यादींकरिता उपयुक्त असते. पाने कडू , स्तंभक (आकुंचन करणारी ) व तिखट असून ती संधिवातावर शेक देण्यास वापरतात.

सॅगेरिया (बोकॅजिया) डाल्झेली ही साजेरीच्या प्रजातीतील दुसरी जाती अन्नमलई व तिरुनेलवेली टेकड्यांत आणि केरळात सस.पासून सु. ८०० मी. उंचीपर्यंत आढळते तिचे गुणधर्म साधारण साजेरीसारखेच असतात.

सॅ. लिस्टेरी (प्रकार अंदमानिका , इं. अंदमान बो-वुड ट्री ) ह्या प्रजातीतील वृक्ष सु. २ ४ मी.उंच वाढतो. तो अंदमान येथील पानझडी जंगलात आढळतो त्याला ‘ चाई ’ किंवा ‘ चुई ’ म्हणतात. याचे लाकूड वापरासाठी चांगले असते ते पिवळट पांढरे , मजबूत , टिकाऊ , बळकट व जड असून त्याला चांगली झिलई देता येते व त्यावर रंगही चांगला बसतो. ते नावा व नाळी यांकरिता वापरतात. तसेच हत्यारांचे दांडे , फर्निचर , व्हायोलिनाचे गज , मासेमारीच्या व गोल्फच्या काठ्या इत्यादींकरिताही वापरतात.

पहा : ॲनोनेसी.

संदर्भ : 1 . C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 19 7 2 .

2 . Kirtikar, K. R. Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. I, New Delhi, 19 75.

वैद्य , प्र. भ. परांडेकर , शं. आ.