गणेरी :(गलगल, गुंग्‍लै हिं. कुंबी, पिली कपास क.कड -बुरोगा इं. शेलसीड, यलो सिल्क कॉटन लॅ. कॉक्‍लोस्पर्मम गॉसिपियम, कॉ. रिलिजिओजम कुल-कॉक्लोस्पर्मेसी).सु. ६–९ मी. उंचीच्या या लहान पानझडी वृक्षाचा प्रसार भारतात बहुतेक सर्वत्र, शुष्क जंगलांत किंवा खडकाळ टेकड्यांवर आहे. फांद्या आखूड, दाट व पसरट साल जाड, सूत्रल (तंतुमय), भेगाळ व आतून लाल कोवळे भाग लवदार पाने संयुक्त, हस्ताकृती, ३–५ खंडित उपपर्णे रेखाकृती व शीघ्रपाती (लवकर गळणारी) पाने जानेवारीत गळतात व मे मध्ये नवीन पालवी येते. फांद्यांच्या शेंड्याकडे परिमंजरीवर पिवळी, मोठी फुले फेब्रुवारी-एप्रिलपर्यंत येतात. याचा समावेश काहींनी बिक्सेसी कुलात केला आहे. किंजपुटात तटलग्‍न बीजकविन्यास असल्याने परायटेलीझ गणात कॉक्लोस्पर्मेसी व बिक्सेसी या दोन्ही कुलांचा अंतर्भाव होतो. गणेरीची फुले द्विलिंगी असतात. संदले व प्रदले सुटी, केसरदले अनेक व बिंबावर आधारलेली असून किंजपुड ऊर्ध्वस्थ असतो [→फूल]. बीजके अनेक, एकाच कप्प्यात व तटलग्‍न असतात. बोंड मोठे, व्यस्त अंडाकृती व रेषांकित असते. बिया अनेक असून फळातील अंत:कवचावर वाढलेल्या पांढऱ्या तंतुमय पुंजक्यात विखुरलेल्या असतात. गोगलगायीच्या शंखाप्रमाणे त्या दिसत असल्याने इंग्रजी व लॅटिन नावात ते लक्षण अंतर्भूत केले आहे. बिया भाजून खातात. सालीपासून मिळणारा धागा दोरांसाठी उपयुक्त असतो. सालीपासून पाझरणारा अर्धपारदर्शक डिंक (कतिरा )गोड, शीतक व शामक असून परमा व कफविकार यांवर गुणकारी असतो. या डिंकाचा उपयोग आइसक्रीममध्ये, चिटाचे कापड छापण्यात, कातड्यांना लावण्यास आणि टसर रेशमास चकाकी आणण्यास करतात. त्याची भारतातून निर्यात होते. सुकी पाने व फुले उत्तेजक असून कोवळी पाने केस धुण्यास वापरतात. फळातील कापूस (कॅपोक) उशांकरिता व पाण्यामध्ये बुडू नये यासाठी वापरण्यात येणाऱ्या जीवसंरक्षक पट्ट्याकरिता (लाइफ बेल्टकरिता )वापरतात. लाकूड मऊ व हलके असून फारसे उपयुक्त नसले, तरी उजाड डोंगरावर पुनर्वनरोपणास ही झाडे चांगली असतात.

जमदाडे, ज. वि.

गणेरी