सायकस : प्रकटबीज वनस्पतींपैकी  [⟶ वनस्पति, प्रकटबीज उपविभाग] ⇨सायकॅडेलीझ गणातील व सायकॅडेसी कुलातील ही एक प्रजाती असून हिच्या सु. २० जाती उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आढळतात. शोभेकरिता त्यांची बागेत लागवड करतात. सायकॅडेलीझ हा प्राचीन गण असून त्याचे जीवाश्म (शिळारुप झालेले अवशेष) मध्यजीव महाकल्पाच्या (सु. २३–९ कोटी वर्षांपूर्वीच्या) खडकांत सापडतात. तेव्हापासून त्यांचा विस्तार झालेला असूनही त्यांची संख्या व प्रसार फार कमी आहे. त्यांना ‘जिवंत जिवाश्म’ म्हणतात. कारण आजही त्यांच्यात अनेक आदिम लक्षणे आढळतात.सायकसाच्या भारतातील पाच जातींपैकी सा. सर्सिनॅलिससा. रेव्होल्यूटा या दोन जाती सामान्यपणे आढळतात. सा. रंफी ही जाती प. बंगाल, द. भारत व अंदमान बेटे येथे आढळते. सा. सर्सिनॅलिससा. पेक्टिनॅटा या दोन जाती सिक्कीम,प. बंगाल व आसाम येथे आढळतात. सा. बेडोमी ही सहावी जातीही भारतीय असल्याचा उल्लेख आढळतो. सा. सियामेन्सिस हा सयामी वृक्ष शोभादायक असल्याने भारतात उद्यानांत लावलेला दिसतो तसेच सा. रेव्होल्यूटा हा मूळचा चीन व जपान येथील वृक्ष असून तो उद्यानांत लावतात सा. सर्सिनॅलिस  हाही ओरिसा व द. भारतीय वृक्ष असून उद्यानप्रिय आहे. यांपैकी बहुतेक जातींपासून कमीअधिक प्रमाणात साबुदाणा मिळतो.

वनस्पती वर्णन : हा सदापर्णी वृक्ष दिसण्यास माडाच्या झाडासारखा मात्र लहान असून तो १·५० ते ६·५० मी. उंच असतो. यांच्या जाडजूड खोडावर फांद्या नसतात परंतु टोकांस अनेक मोठ्या संयुक्त व पिसासारख्या गर्द पानांचा झुबका असतो. यांशिवाय रुक्ष, जाड, पिंगट व खवल्यांसारख्या अनेक लहान पानांमुळे (शल्कपर्णामुळे), गळून गेलेल्या जुनाट हिरव्या पानांच्या किणांमुळे (वणांमुळे) आणि पर्णतलांच्या अवशेषांनी खोडाचा पृष्ठभाग व्यापलेला व खरबरीत झालेला असतो. हिरवी पाने, खवले व प्रजोत्पादक अवयव (बीजुकपर्णे) एकाआड एक येतात आणि खवले इतर भागांचे कोवळेपणी संरक्षण करतात.

आ. १. सायकस : संपूर्ण स्त्री-वृक्षहिरव्या पानाचा देठ जाडजूड असतो. त्यावर दोन्ही बाजूंस सरळ तीक्ष्ण काटे असून ते दलांची रूपांतरे होत. देठाचा तळभाग बळकट पसरट असतो. संयुक्त पानाची मध्यशीर (पर्णाक्ष) जाड व टोकाकडे निमुळती होत गेलेली असून तिच्यावर अनेक (५०–६०) अरुंद, चिवट, गर्द हिरवी व तीक्ष्ण टोकांची दले परस्परांऐसमोर किंवा एकाआड एक असतात. कलिकावस्थेत नेचांच्या पानांप्रमाणे ती दले किंवा पाने टोकाकडून तळाकडे गुंडाळलेली असतात [⟶नेचे]. प्रत्येक दलात फक्त एकच मध्य शीर असून बाजूच्या शिरा नसतात. प्रत्येक झाडास एक लांब, बळकट व जाड-जूड प्रधान मूळ असून त्यावरची अनेक मुळे बाजूस पसरतात. काही मुळांच्या फांद्या द्विशाखा क्रमाने जमिनीलगत

वाढून पोवळ्याप्रमाणे [विद्रुमरुप ⟶ मूळ–२] दिसतात. त्यात प्रथम हवेतून नायट्रोजन घेऊन तो स्थिर करणारे काही सूक्ष्मजंतू (स्यूडोमोनस व ॲझोटोबॅक्टर ) शिरतात व नंतर काही नील-हरित ⇨शैवले (नॉस्टॉकव ॲनाबीना )वस्ती करतात हा एक ⇨सहजीवनाचा प्रकार मानतात.

आ. २. (अ) गुरबीजुकपर्णे : (१) सा. रेव्होल्यूटा, (२) सा. सर्सिनॅलिस; (आ) पुं-शंकू; (इ) लघुबीजुकपर्ण (सा. सर्सिनॅलिस).संरचना : या वृक्षाची अंतर्रचना सामान्यपणे द्विदलिकित वनस्पतींप्रमाणे असते तथापि काही महत्त्वाचे फरक आढळतात. ⇨वाहक वृंदात वाहिन्याप्रकाष्ठ व सहचरी-कोशिका ⇨परिकाष्ठ नसतात. द्वितीयक वाढ ( मुळात व खोडात ) असंगत असते. कारण पहिला ⇨ऊतककर  कार्यनिवृत्त झाल्यावर ⇨परित्वचेपासून किंवा ⇨मध्यत्वचे पासून बनलेल्या नवीन ऊतककराच्या अनेक पट्ट्यांपासून आतल्या दिशेकडे अनेक संलग्न वाहक व वृंद निर्माण होतात. श्लेष्म ( बुळबुळीत द्रव्ययुक्त) नाली बहुतेक सर्वत्र आढळतात. पानाचा देठ, दलांची मध्यशीर व फार कोवळी खोडे यांमध्ये उभयवर्धी (आतील व बाहेरील बाजूंस वाढणारे) प्रकाष्ठ असते. दलांच्या संरचनेत पृष्ठभागाखाली पृष्ठाशी समांतर रचलेल्या अनेक वर्णहीन, मृत अथवा सजीव व लांबट कोशिकांचे ऊतक (संचरणोतक) आढळते आणि ते बाजूच्या शिरांच्या अभावाची उणीव भरुन काढते. मुळांत कोवळेपणी द्विसूत्र ⇨रंभ परंतु नंतर त्रिसूत्र ते बहुसूत्र असते. बहुधा मुळांत चतुःसूत्र (प्रकाष्ठाचे चार वृंद असलेले) रंभ असंगत द्वितीयक वाढ असते [⟶शारीर, वनस्पतींचे]. पान व मूळ यांच्या संरचनेतील इतर तपशील द्विदलिकित वनस्पतींप्रमाणे असतो.

प्रजोत्पादन : सायकसाची प्रजोत्पादक इंद्रिये शंकूसारखी असून नर-वृक्ष आणि स्त्री-वृक्ष अशा दोन भिन्न झाडांवर येतात. नर-वृक्षाच्या खोडावर पूर्ण वाढ झाल्यावर टोकासच नर-शंकू आल्याने खोडाची पुढची वाढ खुंटते तथापि बाजूच्या कळीपासून ते वाढत राहते. असा प्रकार वारंवार घडल्याने सकृद्दर्शनी दिसणारे ⇨खोड संयतपद (अनेक वेळा नवीन कळीपासून बनलेले भाग एकत्र झालेले खोड) असते. स्त्री-वृक्षावर मात्र शंकूसारखा प्रथम दिसणारा किंजदलांचा  [गुरुबीजुक-पर्णांचा ⟶ फूल] झुबका टोकास असला, तरी खोडाच्या सलग वाढीस बाधक ठरत नसल्याने ते एकपद असते.

पूर्ण वाढ झालेला पुं-शंकू सु. ५० सेंमी. पर्यंत लांब, दोन्ही टोकांस निमुळता, मध्यभागी फुगीर, तपकिरी व रुक्ष असतो. त्यात एकच मुख्य अक्ष असून त्यावर अनेक रुक्ष खवल्यांसारखी केसरदले  [लिघुबीजुकपर्णे ⟶ फूल] एकाआड एक व अनेक सर्पिल ( फिरकीप्रमाणे) रांगांत रचलेली असतात ती अगवर्धी (खाली जून व टोकाकडे कोवळी अशा क्रमाने) असतात. प्रत्येकावर खालच्या बाजूस अनेक परागकोशांचे (लघुबीजुककोशांचे) पुंज असून प्रत्येकात असंख्य एकगुणित अर्धसूत्री विभाजनाने ( रंगसूत्रांचा एक संच असलेली) लघुबीजुके (परागकण) तयार होतात. हे वाऱ्याने पसरविले जातात, त्यांपैकी काही स्त्री-वृक्षावरील बीजकांवरच्या (अविकसित बीजावरच्या) चिकट श्लेष्मलाच्या थेंबावर पडून चिकटतात. तो थेंब जसजसा सुकत जातो तसतसा त्याच्या होणाऱ्या आकुंचनाने ती लघुबीजुके बीजकातील पराग-संपुटात (पराग जमवून ठेवणाऱ्या पोकळीत) ओढली जातात.

स्त्री-वृक्षावर गुरुबीजुकपर्णांच्या (किंजदलांच्या) झुबक्यातील प्रत्येक दल पक्व झाल्यावर खोडाशी पानाप्रमाणे काटकोनात राहिल्याने त्यांच्या किनारीवरच्या २–५ बीजकांवर लघुबीजुक सहजच पडतात  [⟶ परागण]. प्रत्येक गुरुबीजुकपर्ण साधारणतः लहान,रूपांतरित पानासारखे असून साधे किंवा अंशतः पिसासारखे विभागलेले आणि कोवळेपणी हिरवे किंवा तपकिरी व पिवळसर केसांनी संरक्षित असते. बीजकात प्रथम चार गुरुबीजुके असतात नंतर त्यांपैकी फक्त एका गुरुबीजुकाची संपूर्ण वाढ होऊन ते बहुकोशिक गर्भकोश बनते आणि त्यात एकगुणित प्रकलाची मुक्त विभागणी होऊन पुष्क (स्त्री-गंतुकधारी) बनतो. त्याभोवती असलेल्या पोषक ऊतकास ‘प्रदेह’ म्हणतात. फुलझाडांत (आवृतबीज वनस्पतीत) हे पुष्क फलनानंतर बनते व ते द्विगुणित (रंगसूत्रांचे दोन संच असलेल्या कोशिकांचे बनलेले) असते. सायकसामध्ये पुष्काच्या बीजकरंध्राकडील बाजूस लहान पोकळी (रेतुक-संपुट) असून त्याखाली २-३ ऱ्हसित अंदुककलश ( स्त्री-जननेंद्रिये ) बनतात. लघुबीजुक (परागकण) रुजून, त्यांतून परागनलिका वाढून ती रेतुकसंपुटात फुटते व नलिकेतील भोवऱ्यासारखी, केसाळ रेतुके संपुटातील द्रवात पोहतात. पुढे त्यामधील एक अंदुककलशातील अंदुकाशी (स्त्री-जननकोशिकेशी किंवा अंड्याशी) संयोग पावून (फलन होऊन) रंदुक (संयुक्त कोशिका) बनते. रंदुकात त्यानंतर द्विगुणितप्रकलाची मुक्त विभागणी होते व अनेक कोशिका बनतात पुढे त्यांचा विकास होऊन आदिगर्भ (गर्भाची पूर्वावस्था) बनतो. ह्याच्या खालच्या बाजूस लांब दोऱ्यासारखी आलंबके बनतात व त्यांच्या टोकांस अनेक गर्भ वाढीस लागतात [बिहुगर्भत्व ⟶ पाइन नीटेलीझ]. मात्र शेवटी एकाच गर्भाची पूर्ण वाढ होते. द्विदलिकित वनस्पतींप्रमाणे आदिमूल, आदिकोरक व दोन दलिका असे त्याचे भाग असून त्याभोवती भरपूर पुष्क असतो  [⟶ गर्भविज्ञान]. पक्व बीज लहान सफरचंदासारखे दिसते त्याचा रंग शेंदरट लाल असतो. ते अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळाप्रमाणे दिसते कारण त्याच्या तीन आवरणांपैकी मधले जाड व कठीण असते. बीज रुजताना दलिका जमिनीवर येत नाहीत पहिली पाने खवल्यांसारखी व नंतरची हिरवी संयुक्त असतात. जीवनचकात दोन पिढ्यांचे एकांतरण असते  [⟶ एकांतरण, पिढ्यांचे]. गंतुकधारी पिढीचा ऱ्हास झाल्याने बीजुकधारीचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. सायकसा चे नर-वृक्ष संख्येने कमी असल्याने फलनक्षम बीजे क्वचितच बनतात. सामान्यपणे त्यांची अभिवृद्घी शाकीय पद्घतीने ( फुटव्यांपासून ) वाढणाऱ्या कंदिकांमुळे (नवीन  झाडांमुळे)  घडून येते. उद्यानांतून केलेली लागण याच प्रकारे करतात.

आ. ३. सायकसाचे जीवनचक्र

उपयोग : या वृक्षांच्या खोडात व बियांत आढळणाऱ्या पिठूळ पदार्थापासून ⇨साबुदाणा काढतात, त्यामुळे काही जातींना इंगजीत ‘सॅगो पाम’ असे म्हणतात. साधारणपणे हे वृक्ष सात वर्षांचे झाल्यानंतर, बिया येण्यापूर्वी कापून पाडतात प्रथम बाहेरील साल काढून आतील खोडाच्या भागाच्या चकत्या करुन व त्या उन्हात सुकवून त्याचे पीठ करतात. नंतर ते पीठ पाण्यात घालून ढवळतात त्यामुळे त्यातील स्टार्च अलग होतो. सुमारे १२० सेंमी. लांबीच्या खोडापासून सु. २·५ किगॅ. साबुदाणा मिळतो. बियांपासूनही साधारणपणे तितकाच साबुदाणा मिळत असल्याने साबुदाणा बनविण्यासाठी मुख्यतः बियाच वापरणे फायद्याचे ठरते. बियांत सु. ३१ % स्टार्च शिवाय काही विषारी पदार्थही असतात. पीठ पुनःपुन्हा धुवून घेतल्यास विषारीपणा जातो. हे धुतलेले पीठ भारतात व श्रीलंकेत दुष्काळात खाण्यास वापरतात. मुळांत सु. १८ % स्टार्च असतो. बियांत २०·४४ % मेद (वसा) ईथर-अर्कात मिळतो. सा. रेव्होल्यूटा जातीच्या बियांत प्रतिशत प्रथिन १४, विद्राव्य नत्रहीन पदार्थ ६८ व संयुक्त फॉर्माल्डिहाइड ०·१६४–०·२२ असतात. पीठ धुतल्याने ९० % फॉर्माल्डिहाइड निघून जाते. खोडापासून डिंक मिळतो परागकण मादक असतात. पाने, साल व बिया औषधी असतात. कोवळ्या पानांचा रस वांतिकारक व वायुसारी असतो. साल व बिया वाटून खोबरेल तेलातून सूज व जखमेवर उपनाहाप्रमाणे (पोटीस) बांधतात. सा. रेव्होल्यूटा ही जाती पौष्टिक व कफोत्सारक असते.

पहा : ऊतके, वनस्पतींतील; वनस्पति, प्रकटबीज उपविभाग; शारीर,वनस्पतींचे; साबुदाणा; सायकॅडेलीझ.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. II, New Delhi, 1962.

2. Datta, S. C. An Introduction to Gymnosperms, Bombay, 1966.

3. Gupta, V. K. Varshneya, Y. P. An Introduction to Gymnosperms, Meerut, 1962.

4. Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. I, Cambridge, 1963.

परांडेकर, शं. आ.