शिवण : (हिं. गंभार, गुम्हार, गभारी, सेवन गु. सावन, शीवण क. काश्मिरीमर, शिवणी सं. सीवण, गंभारी, श्रीपर्णी, भद्रपर्णी, काश्मरी, काश्मर्य इं. स्नॅपड्रॅगॉन ट्री, कोंब टीक व्हाइट टीक लॅ. मेलिना आर्बोरिया, कुल-व्हर्बिनेसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] हा १८ मी. उंच व १·५–२ मी. घेराचा पानझडी वृक्ष भारत (सु. १,५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात व अंदमान), श्रीलंका, मलाया व फिलिपीन्स बेटे येथे आढळतो. पूर्व हिमालयातील जंगले याच्या वाढीस अनुकूल आहेत. महाराष्ट्रात तो पानझडी जंगलात (खानदेश, कोकण, मावळ) तसेच कारवार, डांग (गुजरात) येथे आढळतो. याशिवाय प. बंगाल, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक इ. राज्यांत त्याची लागवड केलेली आढळते.

शिवणीचे खोड सरळ, ६–९ मी. उंच असून त्याला फांद्या नसतात. कोवळ्या भागांवर भरपूर लव असते. साल पांढरट करडी असून पाने ७·५ सेंमी. लांब, साधी, समोरासमोर रुंद, साधारण अंडाकृती- ह्रदयाकृती, ग्रंथीयुक्त, चिवट व लांब देठाची असतात. फेब्रुवारी –एप्रिलमध्ये पानगळ होऊन मेपर्यंत नवी पालवी येते. फुलोरा ३-४ फुलांच्या अनेक झुपक्यांनी बनलेला असतो. पालवी फुटण्यापूर्वी सु. २·५ सेंमी. व्यासाची तपकिरी पिवळसर फुले येतात. फुलांची संरचना आणि इतर शारीरिक लक्षणे ⇨व्हर्बिनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. फळ खाद्य असून ते आठळीयुक्त, अंडाकृती किंवा व्यस्त अंडाकृती, २–२·५ सेंमी. लांब असते. मे-जूनमध्ये पिकल्यावर ते पिवळट नारिंगी होते. त्यात १-२ बिया असतात.

शिवणीचे लाकूड पिवळसर तपकिरी छटायुक्त पांढरे, कठीण, मध्यम प्रतीचे, टिकाऊ व चकाकणारे असून ते भारतातील उत्कृष्ट लाकडांपैकी एक आहे. रंधल्यावर त्याला उत्तम झिलई करता येते व त्यावर चांगला रंग बसतो. सजावटी सामान, कोरीव व कातीव कलाकृती, वाद्ये, ढोल, चित्रांच्या चौकटी, फण्या, खेळणी, बंदुकीचे दस्ते, कृत्रिम अवयव, होड्या, नावा, पूलबांधणी, जहाजबांधणी, आगपेट्या, आगकाड्या, कपाटे, फळ्या, पालख्या, कागद, मुद्रणालयातील ठोकळे इत्यादींसाठी उपयुक्त असते.

पानांचा रस शामक असून परमा, खोकला व चिघळलेल्या जखमा यांवर गुणकारी असतो. त्याचा लेप डोकेदुखीवर लावतात. फुले शीतक असून कोड, जखमा व रक्तदाबावर देतात. मुळे कडू व पौष्टिक, भूक वाढविणारी, सारक व दुग्धवर्धक असतात. मुळांचा काढा ताप, अपचन, बद्धकोष्ठता, शोथ (दाहयुक्त सूज) इत्यादींवर देतात. मातेचे दूध वाढण्यासाठी मूळ ज्येष्ठमध, मध व साखर यांच्याबरोबर देतात. फळ कामोत्तेजक, मूत्रल (लघवी साफ करणारे), पौष्टिक, केशवर्धक व आरोग्यपुनःस्थापक असते. शिवणमूळ दशमुळांपैकी एक आहे. खोडाची साल कडू, पौष्टिक, दीपक, ज्वरनाशक व पाचक असते.

शिवणीला भरपूर सूर्यप्रकाश व चांगल्या निचऱ्याची, गाळाची सुपीक जमीन मानवते. हा वृक्ष हिमतुषार सहन करतो, पण त्याला पाण्याची कमतरता चालत नाही. वृक्षावरून पडलेली फळे उगवून निसर्गतः वृक्ष वाढतात. पन्हेरीत रोपे वाढवूनही लागवड करतात. गर्दी झाल्यास विरळणी करतात. याच्या पानांवर एरी हे रेशमाचे किडे पोसतात.

शिवण ( मेलिना आर्बोरिया ) : ( १ ) पाने व फुलोऱ्यासह फांदी, ( २ ) फळे.

लहान शिवण (सं. गोपभद्र लॅ. मेलिना एशियाटिका) हे मोठे, काटेरी शोभिवंत झुडूप दक्षिण भारताच्या द. द्वीपकल्पात आढळते. कुंपणासाठी शेते व बागांभोवती ते लावतात. याची पाने शिवणीपेक्षा लहान असून याला गर्द पिवळी फुले येतात. फळे खाद्य आहेत. मे. एलिप्टिका व मे. हिस्ट्रिकस या जातीही औषधीदृष्ट्या उपयुक्त आहेत.

 महाजन, श्री. द.