करंबा :  (पारजांब, लौकी, एडणा क. अक्की, हेजे-अकरकाल, मुदला इं. इंडियन ऑलिव्ह, रोझ सँडलवुड ट्री लॅ. ओलिया डायोइका कुल-ओलिएसी). ऑलिव्हच्या वंशातील हा वृक्ष सदापर्णी असून भारतात भरपूर पाऊस असणाऱ्या घाटमाथ्यावर, कोकण भागात, आसाम व बंगालमधील टेकड्यांवर आढळतो. तो विभक्तलिंगी (एकलिंगी) व मध्यम आकाराचा असतो. पाने ७ – १३ × ५ – ६ सेंमी. दीर्घवृत्त्ताकृती, भाल्यासारखी, थोडी दातेरी, जाडसर व गुळगुळीत असतात. फुले लहान (स्त्री-पुष्पे थोडी मोठी ) शुभ्र व पानांच्या बगलेत अथवा आसपास उगवणाऱ्या परिमंजरीवर जानेवारी ते एप्रिलमध्ये येतात ती बहुधा द्विलिंगी किंवा एकलिंगी (पुं-पुष्पे) असतात. फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त) व एकबीजी बी कडू, लंबगोल, वाटाण्याएवढे व जांभळट असते. जून लाकूड लालसर वा पिंगट व कापल्याबरोबर सुवासिक असते म्हणून तसे इंग्रजी नाव पडले. ते कठीण, खरबरीत, मजबूत असून कपाटे व मुख्यत: कातीव व कोरीव (नक्षीदार) वस्तूंसाठी वापरतात. झाडाची साल ज्वरनाशक असते.

पहा : ऑलिव्ह ओलिएसी.

वर्तक, वा. द.