अक्रोड : (हिं. अखरोट गु. अखोट सं. अक्षोट इं. कॉमन-पर्शियन-यूरोपियन-सिरकासियन वॉलनट लॅ. जुग्लांस रेजिया कुल-जुग्लँडेसी). हा मोठा, पानझडी, सुगंधी वा एकत्रलिंगी वृक्ष मूळचा इराणमधला असून उत्तर भारत, दक्षिण यूरोप, सीरिया व अमेरिका या ठिकाणी लागवडीत आहे. भारतात तो हिमालयात व आसामात (९३० –३,४०० मी. उंचीपर्यंत) आढळतो. काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब व उत्तर प्रदेश येथे याची बरीच लागवड केली आहे. तो निसर्गत : २४-३० मी. उंच असून खोडाचा घेर ३-४ मी. असतो. फळांसाठी लागवड करताना उंची कमी ठेवून फांद्यांचा प्रसार वाढवतात. कोवळे भाग लवदार साल करडी व भेगाळ पाने एकाआड एक, संयुक्त, विषमदली-पिच्छाकृती (१५-१८ सेंमी.) [→पान] दले ५-१३, फार लहान देठाची, आयत-दीर्घवृत्ताकृती व अखंड लहान, पिवळसर हिरवी फुले नतकणिशावर [→पुष्पबंध ] येतात पुं-पुष्पे लांब व लोंबत्या बारीक कणिशावर व स्त्री-पुष्पे १-३, टोकाच्या नतकणिशावर फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त) हिरवे, लांबट गोलसर पेरूएवढे (५ सेंमी. व्यास) असते फलावरण झाड व चिवट अंतःकवच कठीण, सुरकुतलेले व दोन झडपांचे असून त्यात चतु:खंडी तैलयुक्त खाद्य बी असते पुष्क (दलाबाहेरील अन्न) नसतो पण दलिका जाड व वेड्यावाकड्या दिसतात [→फळ.] भौगोलिक प्रसार व दलिकांची लक्षणे यांवरून अनेक प्रकार केले आहेत  कागदी  प्रकारचे फळ उत्तम.

अक्रोड. (१) तडकलेले फळ, (२) आठळी, (३) उघडलेली आठळी, (४) बी.

या वृक्षाला  उत्तम निचऱ्याची खोल जमीन, सु. ७५ सेंमी. पाऊस (किंवा पुरेसा  पाणी पुरवठा), हिमतुषार व अतिउष्ण तपमानाचा अभाव असणारे हवामान लागते. सामान्यतः रोपे तयार करून किंवा कलमांनी लागवड करतात. काही ठिकाणी बी पडून आपोआप उगवलेली रोपे तशीच वाढवितात. रोपे तयार करण्यास निवडक बी वाफ्यामध्ये ३० सेंमी. अंतरावर व ५ सेंमी. खोल पुरून ठेवतात. दुसऱ्या वर्षी रोपे लावण्यास तयार होतात खत व पाणी सहसा देत नाहीत, पण उन्हाळ्यात पाणी देणे श्रेयस्कर असते त्यावर कवकजन्य रोग व कीड पडते  बोर्डो मिश्रण व गंधक फवारून त्याचे निवारण करता  येते. लागवडीनंतर ८-१० वर्षांनी फळे येतात.

⇨ परागण  वाऱ्याने होते. सप्टेंबर-ऑक्टोबरात फळे पिकतात. दर वृक्षाला सु. ३५ किग्रॅ. फळ येते. १०० वर्षेपर्यंत फळे येतात.

मुखशुद्धी व सुका मेवा म्हणून अक्रोडाचे बी महत्त्वा‍चे आहे ते मेवा-मिठाईत व आइसक्रीममध्ये घालतात. कच्च्या फळांपासून लोणची, मुरंबे, चटणी व सरबत  बनवितात. हिरव्या सालीचा तेलात किंवा मद्यार्कात अर्क काढून व तुरटी घालून केसाचा कलप बनवितात. हिरवी साल मत्स्यविष आहे. पाने स्तंभक (आकुंचन करणारी), पौष्टिक, कृमीनाशक असून झाडाची साल व पाने पुरळ, गंडमाळा, उपदंश, इसब इत्यादींवर उपयुक्त असतात.  फळ संधिवातावर व बियांचे तेल पट्टकृमीवर व सारक म्हणून देतात. मलायात बियांतील मगज शूल व आमांशावर देतात. बियांचे तेल खाद्य असून चित्रकारांचे रंग व रोगणे आणि साबण यांकरिता वापरतात. पेंड व पाने जनावरांना खाऊ घालतात.

लाकूड मध्यम कठीण, जड, बळकट व करडे-भुरे असते. सजावटी सामान व इतर अनेक सुबक वस्तूंकरिता उत्तम असते.

पहा : जुग्लँडेलीझ.

जमदाडे, ज. वि.

अक्रोड, जंगली : (हिं. अखरोट सं. अक्षोट इं. बेंगॉल वॉलनट, कँडल नट ट्री, वार्निश ट्री लॅ. ॲल्युराइट्स मोल्युकाना कुल—यूफोर्बिएसी), सु. १२-१८ मी. उंचीचा हा सदापर्णी शोभिवंत वृक्ष मूळचा पॅसिफिक बेटातील व मलायातील असून आसामातील व द. भारतातील जंगलात आढळतो तसेच तो लागवडीतही आहे. कोवळे भाग केसाळ पाने साधी, अंडाकृती किंवा अंडाकृती भालाकार व फांद्यांच्या टोकास गर्दीने वाढतात. फुले लहान, पांढरी, असंख्य, आखूढ देठाची, एकलिंगी, एकाच झाडावर एप्रिल-मेमध्ये परिमंजरीवर [→पुषपबंध ] येतात. फळे अश्मगर्भी, गोलसर, मांसल, हिरवी, गुळगुळीत व लिंबाएवढी बिया १-२, कठीण, तैलयुक्त , खाद्य व बीजावरणांवर खोलगट रेषा असतात [→ यूफोर्बिएसी ]. खऱ्या अक्रोडापेक्षा चव कमी. तेल स्वयंपाकात, औषधे, मेणबत्त्या‍ व दिवे इत्यादींकरिता आणि रंग व रोगण यांकरिता वापरतात. खोडाची साल कातडी कमाविण्यास उपयुक्त. एरंडेलाप्रमाणे तेल रेचक म्हणून परिणामकारक असते शिवाय त्याला एरंडेलाप्रमाणे वास किंवा चव नसते. चीनमधला ‘ तुंग ऑइल ट्री (ॲ. फॉर्दी )’ आसाम, बंगाल, बिहार व म्हैसूर या ठिकाणी आढळतो. त्याच्या बियांच्या तेलाचाही रंग-रोगणात उपयोग करतात.

परांडेकर, शं. आ.