बावची : (हिं.बाबची,बुक्ची गु. बौची क. बांवची गिड सं. चंद्रलेखा, बाकुची, कुष्टघ्नी इं. बाबची लॅ. सोरॅलिया कॉरिलिफोलिया कुल-लेग्युमिनोजी). साधारणत:

बावची : (१) फुलाफळांसह फांदी, (२) बिया. ३०–१८० सेंमी. उंचीची ही ⇨औषधी श्रीलंका, पाकिस्तान व भारत येथे कोठेही पडसर जागी तणासारखी वाढते. राजस्थान व पूर्व पंजाब येथे बियांकरिता हिची थोडी लागवड करतात. हिलाच कोणी ‘गवार’(गोवार) म्हणतात परंतु भाजीकरिता वापरतात ती गवार हिच्या कुलातील [⟶लेग्युमिनोजी] पण भिन्न वंशातील आहे. बावचीच्या खोडावर व फांद्यांवर खोलगट रेषा, सूक्ष्म प्रपिंड (ग्रंथी) व तुरळक पांढुरके केस असतात. पाने साधी, एकाआड एक, लांबट गोल, दातेरी व त्यांवर काळे ठिपके व थोडे केस असतात. त्यांच्या बगलेत ऑगस्ट-डिसेंबरमध्ये पिवळ्या अथवा जांभळट रंगाच्या १० -३० लहान फुलांचे झुबके येतात. शिंबा (शेंगा) लहान (३.५–४.५ × २–३ मिमी.), साधारण चपटी,टोकदार, काळी व एकबीजी असते. फळाच्या सालीला बी चिकटून राहते. बी सारक, मूत्रल (लघवी साफ करणारी), उत्तेजक, ज्वरनाशक, वाजीकर (कामोत्तेजक) व कृमिघ्न असते. मुळे दंतरोगावर व अस्थिक्षयावर, पाने हगवणीवर, फळ वांतीवर व बी चर्मरोगावर गुणकारी बियांचे तेल करंजेलातून पांढऱ्या कोडावर व महारोगावर लावतात. बियांचे चूर्ण टाकळ्याच्य बीजांच्या चूर्णाबरोबर लिंबाच्यारसातून नायट्यांना लावतात. बी कडवट व तिखट असून त्यातील तेल दाट व तिखट असते. पेंडीचा उपयोग गुरांना खाऊ घालण्यास व खताकरिता करतात. बंदेलखंडात ही वनस्पती गुरे खातात. 

कोणत्याही साध्या जमिनीत हिचे पीक येते. मार्च-एप्रिलमध्ये ३० सेंमी. अंतरावर, हेक्टरी सात किग्रॅ. या प्रमाणात बी पेरतात. पावसाळ्यात फुले येतात आणि नोव्हेंबरात बी पक्व होते. योग्य रीतीने वाढविल्यास ५-७ वर्षांपर्यंत झाडे टिकून राहतात.

परांडेकर, शं. आ.