हिंगण : (हिंगणबेट हिं. हिंगोल, हिंगोट क. इंगिलुका, इंगळगिडा सं. इंगुदी इं. डेझर्ट डेट लॅ. बॅलॅनाइट्स रॉक्सबर्घाय, बॅ. ईजिप्टिका कुलसिमॅरुबेसी) . हा एक सदाहरित लहान वृक्ष किंवा काटेरी क्षुप आहे. बॅलॅनाइनाट्स प्रजातीतील बॅ. ईजिप्टिका ही जाती मूळची ईजिप्तमधील असून तिचा प्रसार आफ्रिकेतील उष्ण प्रदेशांत, भारत व म्यानमार येथे आहे. सेनेगलमध्ये ती सामान्य आहे. म्यानमार येथे बॅ. ट्रायफ्लोरा ही जाती आढळते. भारतात बॅ. रॉक्सबर्घाय जातीचा प्रसार कमी पावसाच्या प्रदेशांत (आग्नेय पंजाब व दिल्ली ते सिक्कीम, राजस्थान, बिहार, कच्छ, खानदेश, दख्खन इ. ठिकाणी) आहे. तसेच ती इझ्राएल, जॉर्डन, सौदी अरेबिया व येमेन येथे आढळते. 

 

हिंगण वनस्पती १० मी.पर्यंत वाढते. तिचे खोड सरळ व सु. ६० सेंमी. व्यासाचे फांद्या अनियमित पसरलेल्या व लोंबत्या असतात. कोवळे भाग करडे व लोमश त्यावर तीक्ष्ण, मजबूत, आरोही व एकाकी काटे ( शूल) त्यावर क्वचित पाने व फुले असतात. साल पिवळसर, राखाडी किंवा करडी व जाड पाने गडद हिरवी, द्विदली संयुक्त, अल्पवृंत दले दीर्घवृत्ताकृती, अखंड, सूक्ष्म केसाळ व चिवट फुले हिरवट पांढरी, ८–१४ मिमी. व्यासाची, द्विलिंगी व सुवासिक असून ४–१० फुलांच्या वल्लऱ्यांत एप्रिल-मेमध्ये येतात. संदले व प्रदले प्रत्येकी पाच व परिहित केसरदले १० व शंकूसारख्या बिंबाच्या तळाशी चिकटलेली फळ अश्मगर्भी, १.५–३ सेंमी. लांब व १.५–४ सेंमी. व्यासाचे, कठीण, लंबगोल, साधारण टोकदार, करड्या रंगाचे, त्यावर पाच खोलगट रेषाव आठळीत एक बी, मगज ओशट व दुर्गंधी असतो. या वनस्पतीला५–७ वर्षांनी फुले व फळे लागतात. तसेच १५–२० वर्षांनी अधिकाधिक बीजनिर्मिती होते. एका वृक्षापासून सु. १०,००० फळे मिळतात. 

 

हिंगण या वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त आहेत. कोवळा पाला, फळे व फांद्या जनावरांसाठी खाद्य आहेत. तिच्या सालीपासून मजबूत धागा मिळतो. बियांमध्ये सु. ४४% पिवळट, सौम्य, स्थिर व रुचिहीन तेल असते ते औषधी आहे. आठळीतील बी काढून त्यात बंदुकीच्या दारूची पूड भरून स्फोटक गोळे बनवितात. फळात सॅपोनिने असल्याने मगजाचा उपयोग रेशीम व साधे कापड स्वच्छ करण्यासाठी करतात.तसेच कच्ची व पक्व फळे खाद्य आहेत. लाकूड जळणास, हातात धरावयाच्या काठ्या, उपयुक्त फळ्या इत्यादींकरिता वापरतात. 

 

हिंगण (बॅलनाइट्स रॉक्सबर्घाय) : (१) पानाफुलांसहित फांदी, (२) फूल, (३) फळ, (४) काट्यांनी युक्त फांदी. 
 

हिंगण वनस्पती भारतात सर्वसाधारणपणे आढळणारी, परंतु दुर्लक्षित वनस्पती आहे. पारंपरिक पद्धतीने तिचा उपयोग वांतिकारक, कृमिनाशक, कवकरोधी, रेचक, तीव्र विरेचक, पोटशूळ, डांग्या खोकला, त्वचा-रोग आदी रोगांत केला जातो. आयुर्वेदानुसार साल कृमिरोधी, खोकला आणि त्वचा रोगात तर पाने कृमिरोधी व मुळे वांतिकारक म्हणूनवापरतात. सालीचा लेप इजा झालेल्या शरीराच्या भागासाठी बाहेरून वापरला जातो. संपूर्ण वनस्पतीचा वापर सर्पदंशात करतात. बिया पोटशूळ व खोकल्याच्या द्रव औषधांत वापरतात. त्वचारोग व भाजणे यांवरगाभा वापरतात. मुळे व फळांत डायोसजेनीन नावाचे रसायन असते. यातील स्टेरॉइडे (सॅपोजेनीन) बाह्य रीत्या घेण्यात येणाऱ्या गर्भनिरोधक औषधांत वापरतात. वेदना व सूज यांवर वनस्पतीची साल वापरतात. या वनस्पतीत प्रजननक्षमताविरोधी गुणकारिता आणि प्रतिशोथकारक कार्यक्षमता असते. हिच्यातील सॅपोनीन स्टेरॉइडांमध्ये जंतुनाशक व मृदुकाय प्राणिनाशक गुण असतात.

जमदाडे, ज. वि.

 

हिंगण
हिंगण