तिरफळ : (त्रिफळ, चिरफळ, ठेसूळ हिं. बद्रंग क. जुग्मिना, जिग्मिमर सं. तिक्ता लॅ. झँथोझायलम ऱ्हेट्सा कुल–रुटेसी). मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष पूर्व व पश्चिम भारतात विशेषकरून दाट सदापर्णी जंगलात आढळतो. याच्या जून सालीवरचे काटे शंकूप्रमाणे असून साल भेगाळ, त्वक्षीय (मूळ व खोडावरील मृत पेशींचा जाड व बुचासारखा थर असलेली) व मऊ असते, यामुळेच ही झाडे जंगलातील आगीपासून सुरक्षित राहतात. फांद्या अनेक व पसरट असून त्यांच्या शेंड्याकडे अनेक एकाआड एक संयुक्त आणि पिसासारखी (समदली किंवा विषमदली) पाने झुबक्यांनी येतात दलांच्या आठ ते वीस जोड्या असून प्रत्येक दलाचा तळ असमात्र (कोणत्याही पातळीत ज्याचे दोन सारखे भाग होत नाही असा) आणि पाते लंबगोल अथवा कुंतसम (भाल्यासारखे) व प्रकुंचित (निमुळते) असते. फुले बहुयुतिक (एकलिंगी व द्विलिंगी), लहान, पिवळी व शाखायुक्त मंजरीवर जुलै–ऑक्टोबरात येतात [→ फूल]. फळे शुष्क, गोलसर, सुरकुतलेली, वाटाण्यासारखी, हिरवट पिवळसर असून बिया गोलसर, जांभळट काळ्या व चकचकीत असतात इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ रुटेसी अथवा सताप कुलात वर्णिल्याप्रमाणे. याचे लाकूड पिवळट असल्याने त्या अर्थाचे वंशवाचक नाव दिले आहे. भेंड काढून टाकून पोकळ खोडाचा उपयोग पाण्याच्या नळाप्रमाणे आसामात करतात. लाकडापासून धोटे व काठ्या बनवितात. बियांना मिरीप्रमाणे चव व वास येतो फळे व बी मसाल्यात व स्वयंपाकात वापरतात. फळांतील तेल औषधी आहे. कच्च्या फळांना संत्र्याच्या सालीसारखा वास येतो. पक्व फळ सुगंधी, स्तंभक (आकुंचन करणारे), उत्तेजक व दीपक (भूक वाढविणारे) असून संधिवातावर मधाबरोबर देतात मुळाची साल मूत्रपिंडाच्या विकारांवर उपयुक्त असते.
ठोंबरे, म. वा.