मंजिष्ठ : (१) फुलोरा व फळांसह फांदी, (२) फूल, (३) फळ, (४) बी.

मंजिष्ठ : (हिं., गु. मजिठ क. सिरगट्टी, मंजुस्थ सं. कालमेषिका इ. इंडियन मॅडर लॅ. रूबिया कॉर्डिफोलिया कुल-रूबिएसी). फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ही उपयुक्त वनस्पती उष्ण कटिबंधात सर्वत्र आढळणारी, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वेल असून ही भारतातील दाट जंगलात (सु. ३,७५० मी. उंचीपर्यंत) सामान्यपणे आढळते. शिवाय श्रीलंका, जपान, मलेशिया, इंडोनेशिया व आफ्रिकेतील उष्ण भाग येथेही हिचा प्रसार आहे. हिच्या रुबिया या वंशातील एकूण सु. ६० जातींपैकी भारतात सु. १५ जाती (एच्. सांतापाव यांच्या मते १० जाती) आढळतात. रू. कॉर्डिफोलिया व तिच्याशी निकटवर्ती असलेल्या अनेक उपजाती, प्रकार व वाण इत्यादींचा एक जटिल गट मानलेला असून त्यांचा प्रसार आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या प्रदेशांत झालेला आढळतो.

मंजिष्ठाची वेल किंवा पसरट व आधाराने वाढणारे झुडूप सु. १० मी. उंच असून खोड काहीसे काटेरी, चतुष्कोनी, खोबणीदार व पांढरट सालीचे असते त्याच्या प्रत्येक पेऱ्यावर चार तर कधी २-८, अंडाकृती-हृदयाकृती अथवा भाल्यासारखी, अनुपपर्ण (उपपर्णे नसलेली), लांब देठांची, ठळक शिरांची (३.८-९ × १.६-३.५ सेंमी.) व खरबरीत पाने असतात जमिनीतील मुळे धारण करणारा खोडाचा जाडजूड भाग म्हणजे मूलक्षोड बहुवर्षायू असून त्यावर लांब, दंडाकृती, काहीशी जाडसर व तांबूस पातळ साल असलेली मुळे असतात. फांद्यांच्या टोकास शाखायुक्त फुलोरा [परिमंजरी → पुष्पबंध] असून त्यावर लहान, पांढरट किंवा हिरवट, कधी लाल व पिवळ्या छटाअसलेली, सच्छद व काहींत थोडी फुले असतात [⟶ फूल]. मृदू फळे जांभळट किंवा गर्द जांभळी, कधी काळी, गोलसर किंवा काहीशी द्विखंडी (४-६ मिमी.), मांसल व द्विबीजी असतात ती ऑक्टोबर ते नोव्हेंबरात येतात. इतर सर्वसामान्य शारीरिक लक्षणे ⇨रुबिएसीत (कदंब कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात.

बाजारात मंजिष्ठ या नावाने वनस्पतीचे मूलक्षोड व लालसर तपकिरी सालीची मुळे मिळतात. ही मुळे गोडसर वाटली, तरी नंतर त्यांची चव तिखट व कडू असते. सुती, गरम व जाडेभरडे कापड, गालिचे व घोंगड्या रंगविण्यास या वनस्पतींच्या खोड आणि मुळे यांपासून मिळालेला रंग फार पूर्वीपासून वापरात आहे. त्यामुळे कपड्यांना शेंदरी, तपकिरी, किरमिजी असे रंग प्राप्त होतात. रंगविण्याच्या प्रक्रियेत कापड प्रथम रंगद्रवात (थंड पाण्यात मुळे बुडवून ठेवून काढलेला रसात) बुडवून ठेवतात व नंतर तुरटी लावून त्याला पक्केपणा आणतात. टांझानियात या रंगद्रवात फळे टाकतात व तो रंग लाकडी जमिनी रंगविण्यास वापरतात. हा रंजक पदार्थ ‘पर्प्यूरीन’ व ‘मंजिस्तीन’ यांचे मिश्रण असते. अलीकडे संश्लेषित (घटक द्रव्यापासून बनविलेले कृत्रिम) रंग वापरणे सोयीस्कर झाल्याने मंजिष्ठाच्या रंगाचे महत्त्व फार कमी झाले आहे.

मुळे स्तंभक (आकुंचन करणारी) पौष्टिक, पूतिरोधक (जंतूंमुळे उद्भवणाऱ्या विषाला प्रतिबंध करणारी), आमांशनाशक व रेचक असतात त्यांचा संधिवातावर व अनेक शारीरिक तक्रारींवर उपयोग करतात. त्यांचा लेप जुनाट जखमांवर लावतात व त्वचारोगांवर तो वापरतात. मुळांचा काढा पोटात घेतल्यावर दूध, लघवी व हाडे यांना लालसर छटा येते. पाने व मुळे यांचा काढा कृमिनाशक आहे. जावात भाताबरोबर या वनस्पतीचे ‘लबलब’ हे तोंडी लावणे करतात तसेच जनावरांना चाराही घालतात. झुलू जमातीतले लोक वीर्यवर्धनाकरिता व मासिक स्त्राव सुरू होण्यास मुळांचा रस देतात. मुळांपासून बनविलेले औषध अधिक प्रमाणात पोटात गेल्यास भ्रमिष्टपणा येतो.

आसाम व मणिपुर येथे आढळणाऱ्या खासियाना या प्रकारात रंगद्रव्याचे प्रमाण अधिक असते. ॲलिझरी (यूरोपीय मॅडर) हे रंगद्रव्य रू. टिंक्टोरम या जातीपासून काढतात. पूर्व हिमालयात मंजिस्ता हा प्रकार आणि रू. वालिचियाना ही जाती आढळते. रू. सिक्किमेन्सिस ही जाती नेपाळ ते पूर्वेस आसाम, नागलँड आणि मणिपूर (१,५०० मी. उंचीपर्यंत) या प्रदेशांत आढळते या वनस्पतीतील रंगद्रव्य (नागा मॅडर) पूर्व भारतात गरम कपडे, केस, भाले, दागिने, वेताच्या व बांबूच्या वस्तू इ. रंगविण्यास वापरतात. रू. टिंक्टोरम ही मंजिष्ठाची जाती काश्मीर ते स्पेनपर्यंत आढळते. ईजिप्त, इराण, भारत येथे फार प्राचीन काळापासून ती लागवडीत असून नंतर यूरोपातही पिकविली गेली. तिच्यापासूनही उत्कृष्ट रंगाचे उत्पादन केले गेले. तिची लागवड विशेषतः काश्मिरात होती. भिन्न रंगबंधक वापरून भिन्न छटांचे रंगीत कापड बनविण्यात येत असे. कॅलिको छपाई व रंगकाम यांकरिता ते रंगद्रव्य (ॲलिझरी) अद्याप कोठे कोठे वापरतात अन्नाचे काही प्रकार, सौंदर्यप्रसाधने, दंतधावने इत्यादींकरिता ते उपयोगात आहे. ते शिलाभेदक असल्याने त्याचा उपयोग शरीरातील अश्मरीवर (खड्यावर) करतात. होमिओपॅथीत त्याला अधिकृत स्थान आहे.

संदर्भः 1. C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. IX, New Delhi, 1972.

           2. Kirtikar, K.R. Basu, B.D. The Indian Medicinal Plants, Vol.II, Delhi, 1975.

जोशी, गो. वि. परांडेकर, शं. आ.