स्कॉट, ड्युकिन्फील्डहेन्री : (२८ नाव्हेंबर १८५४-२९ जानेवारी १९३४). ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ. त्यांनी वनस्पति-शारीर व पुरावनस्पती यांसंबंधी विशेष संशोधन केले.

स्कॉट यांचा जन्म लंडन येथे झाला. १८७६ मध्ये ते ख्राइस्ट चर्च येथून पदवीधर झाले. त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे वनस्पतिशास्त्र या विषयाच्या प्राध्यापकांचे सहायक म्हणून काम केले (१८८२-८५). नंतर ते रॉयल कॉलेज ऑफ सायन्स, साउथ केनसिंगटन येथे जीवशास्त्र (वनस्पतिशास्त्र) या विषयाचे सहप्राध्यापक होते (१८८५-९२). वनस्पतिवैज्ञानिक ⇨ युलिउस फोन झाक्स यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वनस्पतिविज्ञानाचा अभ्यास व संशोधन करून १८९२ मध्ये वुर्ट्सबर्ग विद्यापीठाची पी.एच्डी. पदवी मिळविली.त्याच वेळी रॉयल गार्डन, क्यू येथील जॉड्रेल लॅबोरेटरीची व्यवस्था सांभाळण्याची कामगिरी त्यांच्याकडे आली. प्रसिध्द पुरावनस्पति-शास्त्रज्ञ विल्यम क्रॉफर्ड विल्यमसन यांच्या समवेत त्यांन पुरावनस्पतिशास्त्र या विषयात महत्त्वपूर्ण काम केले. एफ्. डब्ल्यू. ऑलिव्हर यांच्या समवेत त्यांनी निेचे व बीजी वनस्पती यांदरम्यानचा वर्ग,स बीजी नेर्चेें. सायकॅडोफिलिसिस या गणात समाविष्ट केलेल्या एका वंशातील वनस्पतींच्या सुट्या बियांचे (लॅजिनोस्टोमा लोमॅक्सी) व खोडांचे (लाय-जिनॉप्टेरिस ओल्डॅमिया) जीवाश्म यांचे साम्य दर्शविणारी लक्षणे लक्षात घेऊन व त्यांचा निकट संबंध ओळखून बीजी नेचे या वनस्पतींना ‘टेरिडो-स्पर्मी’ हे सार्थ नाव दिले.

स्कॉट १९०८-१२ या कालावधीमध्ये लिनीअन सोसायटीचे अध्यक्ष होते. १९१६ मध्ये त्यांना रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्स या संस्थेचे सदस्यत्व मिळाले. तसेच १८९४ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलो म्हणूनही त्यांची निवड झाली. स्कॉट यांना रॉयल पदक (१९०६), लिनीअन पदक (१९२१), डार्विन पदक (१९२६) आणि जिऑग्राफिकल सोसायटी ऑफ लंडन यांचे व्होलॅस्टन पदक (१९२८) आदी सन्मान प्राप्त झाले.

स्कॉट यांचा इंट्रॉडक्शन टू स्ट्रक्चरल बॉटनी (१८९४, १८९६) हा सपुष्प व अपुष्प वनस्पतींच्या आकारासंबंधीचा मार्गदर्शक ग्रंथ असून स्टडीज इन फॉसिल बॉटनी (१९००) हा पुरावनस्पतिशास्त्रातील लोकप्रिय ग्रंथ आहे. तसेच एक्सटिंक्ट प्लँट्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ इव्होल्यूशन (१९२४) हा ग्रंथ देखील प्रसिद्ध आहे.

स्कॉट यांचे बसिंगस्टोक ( हँपशर ) येथे निधन झाले.

जमदाडे, ज. वि.