कवठी चाफा : फुलासह फांदी

चाफा, कवठी : (हि. बारी चंपा इं. बुल बे लॅ.मॅग्नोलिया ग्रँडिफ्लोरा कुल-मॅग्नोलिएसी). ह्या सु. २४ मी. उंच, सदापर्णी व शोभादायक वृक्षाचे वंशवाचक लॅटिन नाव मॅग्नोलिया  हे ‘वियरे मॅग्नोल’ या मोंपॅलियर येथील प्राध्यापकांच्या नावावरून दिले आहे. ⇨मॅग्नोलिएसी  अथवा चंपक कुलातील हा वंश प्रमुख व प्रस्थापित आहे व या वृक्षाची सामान्य शारीरिक लक्षणे त्या कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत. हा वृक्ष मूळचा उ. अमेरिकेतील कॅरोलायनामधील असून भारत, ब्रह्मदेश, चीन, जपान इ. देशात लावलेला आढळतो हिमालयात व निलगिरीत २,१०० मी. उंचीपर्यंत याची वाढ व प्रसार चांगला आहे. सुवासिक फुले हे त्याचे प्रमुख आकर्षक लक्षण आहे, ह्याची पाने साधी, एकाआड एक, सोपपर्ण (उपपर्णयुक्त), चिवट, गर्द, हिरवी, मोठी, वर चकचकीत आणि खाली तांबूस लवदार असतात. डहाळ्या व कळ्या तांबूस लवदार असून साल करडी व गुळगुळीत असते. फुले मोठी पांढरी, सुवासिक आणि द्विलिंगी असून फांदीच्या टोकास एकएकटी एप्रिल-मेमध्ये येतात. ती उमलण्यापूर्वी पानांच्या झुबक्यात दडलेल्या लहान कळ्या अंड्यासारख्या दिसतात. संदले मोठी व पाकळ्यांसारखी असून पाकळ्या सुट्या, ६–१२ आणि व्यस्त अंडाकृती असतात. केसरदले जांभळी व अनेक किंजदले सुटी व अनेक पुष्पस्थली (देठाच्या टोकावरील भाग) लांबट [⟶ फूल]. घोसफळ तांबूस, लवदार, अंडाकृती, ७–१० सेंमी. लांब असून प्रत्येक लहान फळ तडकून शेंदरी रंगाचे बी बाहेर पडते.

यांच्या सर्वच भागांत सुगंधी बाष्पनशील (उडून जाणारे) तेल असते. फुलांपासून सुवासिक मॅग्नोलिया तेल काढतात, मात्र ते व्यापारी प्रमाणावर काढले जात नाही. त्या नावाचे अत्तर कृत्रिम रीत्या बनवितात. बियांपासून काढलेले तेल साबण व धावनांत वापरतात. साल उत्तेजक, सुगंधी, पौष्टिक व स्वेदकारी (घाम आणणारी) असून हिवताप व संधिवात यांवर देतात. लाकूड हिरवट करडे व ⇨मॅपलप्रमाणे असते. ते लगद्याकरिता उपयुक्त असते. अभिवृद्धी (लागवड) बियांपासून आणि गुटी कलमापासून करतात. याचे फूल लुइझिॲनाचे राज्य-पुष्प आहे.

पाटील, शा. दा.