ॲपोसायनेसी : (करवीर कुल). फुलझाडांपैकी द्वि-दलिकित वर्गातील ह्या वनस्पतिकुलाचा समावेश काहींनी जेन्शिएनेलीझ गणात केला आहे, तर कित्येकांनी लोगॅनिएलीझ गणात केला आहे. लोगॅनिएलीझामध्ये या कुलाशिवाय आणखी चार संबंधित कुले येतात : लोगॅनिएसी, जेन्शिएनेसी,⇨ ओलिएसी व ⇨ॲस्क्‍लेपीएडेसी. या कुलातील वनस्पती (वंश २०० व जाती १,३०० प्रसार : उष्ण व उपोष्ण कटिबंध) काष्ठमय महालता (उदा., लांबताणी, जहरी सोनटक्का, बॉमंशिआ ग्रँडिफ्लोरा) किंवा वृक्ष (उदा., सातवीण) अगर क्षुपे (उदा., कण्हेर) व क्वचित काही ⇨ ओषधी (उदा., सदाफुली) आहेत. त्यांना दुधासारखा चीक असतो. पाने साधी, संमुख, किंवा मंडलित, क्वचित एकाआड एक [→पान] फुले द्विलिंगी, नियमित, अवकिंज, एकाकी किंवा कुंठित फुलोऱ्यात येतात. संदले पाच विपरिहित, क्वचित चार परिहित प्रदले संदलाइतकी अंशतः किंवा पूर्णपणे जुळलेली, परिवलित पुष्पमुकुट नसराळ्यासारखा, घंटेसारखा किंवा समईसारखा. केसरदले प्रदलांइतकी व त्यांच्याशी एकाआड एक, तंतू आखूड, पाकळ्यांशी चिकटलेले परागकोश परस्परांशी जुळून शंकूप्रमाणे दिसतात किंवा क्वचित (व्हॅलॅरिस) किंजल्काशी जुळलेले पुष्पमुकुटाच्या कंठात खवले किंवा केसांचे तोरण असते किंजदले दोन, फार क्वचित, अधिक  किंजपुट ऊर्ध्वस्थ, दोन कप्प्यांचा किंवा दोन स्वतंत्र किंजपुटे [→कुडा] असून बीजके अनेक असतात [→पुष्पबंध फूल]. किंजल्क डमरूसारखा फळ पेटिका, बोंड, मृदुफळ किंवा अश्मगर्मी (आठळीयुक्त, →फळ) बीजे सपाट सपक्ष किंवा शिखालू (आखूड केसांचा झुपका असलेली, →बी). सुकाणू, बॉमंशिआ, खैरचाफा, तगर, सदाफुली, कण्हेर, जहरी सोनटक्का, इ. अनेक वनस्पती शोभेकरिता बागेत लावतात. कण्हेर विषारी वनस्पती आहे. सातवीण, सर्पगंधा, काळा व पांढरा कुडा इ. औषधी असून करवंद खाद्य फळांमुळे परिचित आहे. या कुलाला ‘कुटजादि-कुल’ असेही म्हणतात.

पहा : पुष्पबंध.

जमदाडे, ज. वि.