तांबेरा : (गेरवा). कवकांच्या गदाकवक (बॅसिडिओमायसिटीज) वर्गातील यूरिडिनॅलीझ गणातील कवकांमुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींमुळे) होणाऱ्या वनस्पतीच्या रोगांना तांबेरा अथवा गेरवा ही संज्ञा आहे. यूरिडिनॅलीझ गणातील सर्व कवकांना तांबेऱ्याची कवके या नावाने संबोधिले जाते. या कवकांच्या ७,००० पेक्षा जास्त जाती असून त्या नेचे, शंकुमंत [→ कॉनिफेरेलीझ] आणि फुलझाडे या वनस्पतींवर अनिवार्य जीवोपजीवी (ज्यांची प्रयोगशाळेत कृत्रिम माध्यमावर वाढ होत नाही अशा) असतात. त्याला एकच अपवाद म्हणजे गव्हावरील तांबेरा रोगाच्या कवकांची प्रयोगशाळेत कृत्रिम माध्यमावर १९६७ मध्ये वाढ करण्यात आली. तांबेरा कवकांच्या पोषक वनस्पतींची संख्या मर्यादित असते. तृणधान्य पिकांचे तांबेरा रोगामुळे इ. स. पू. २,००० वर्षांपासून (अगर त्याही पूर्वीपासून) अधूनमधून फार नुकसान झाले आहे. तांबेरा कवकांच्या जीवनचक्रामध्ये पाच निरनिराळ्या प्रकारचे बीजाणू (सूक्ष्म प्रजोत्पादक घटक) आढळून येतात. यांतील प्रत्येक प्रकारच्या बीजाणूचा आकार, आकारमान, आणि कार्य वेगवेगळे असते. काही कवकांमध्ये ५ पेक्षा कमी प्रकारचे बीजाणू असतात. काही तांबेऱ्यांची कवके एकाश्रयी म्हणजे त्यांचे संपूर्ण जीवनचक्र एकाच जातीच्या अथवा वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने अगदी जवळच्या पोषक वनस्पतींवर आढळून येते. उदा., अळशी, घेवडा, गुलाब, सूर्यफूल यांवरील तांबेरा, याउलट काही कवके भिन्नाश्रयी म्हणजे त्यांच्या जीवनचक्राचा काही भाग एका जातीच्या वनस्पतीवर व बाकीचा भाग वनस्पतिविज्ञानाच्या दृष्टीने पहिल्या जातीपासून अगदी दूर असलेल्या जातींच्या वनस्पतीवर आढळून येतो. उदा., तृणधान्यांवरील (गहू, बार्ली, ओट, राय) आणि नाना प्रकारच्या गवतांवर वाढणारा खोडावरील तांबेरा (पक्सिनिया ग्रॅमिनिस ). या तांबेरा कवकाच्या जीवनचक्रात पाच प्रकारचे बीजाणू असतात. त्यांपैकी दोन प्रकारचे बीजाणू (पिक्निया बीजाणू आणि एशिया बीजाणू) बार्बेरी अथवा महोनिया नावाच्या वनस्पतीवर आढळून येतात आणि दुसरे दोन प्रकारचे बीजाणू (युरिडो बीजाणू आणि टेल्युटो बीजाणू) त्या त्या तृणधान्यावर अथवा गवतावर आढळून येतात. या कवकाच्या बीजाणूचा पाचवा प्रकार स्पोरिडिया (गदा बीजाणू) हा असून टेल्युटो बीजाणूंचे अंकुरण (रुजण्याची क्रिया) होऊन त्यांपासून निघालेल्या प्रकवकावर (प्रोमायसीलिअमावर) हे बीजाणू तयार होतात व ते वाऱ्याने बार्बेरी या वनस्पतीच्या कोवळ्या पानांवर पडल्यास तेथे त्यांचे अंकुरण होते. बार्बेरीवर प्रथम पिक्निया आणि नंतर एशिया हे बीजाणुपुंज तयार होतात. एशिया बिजाणुपुंजात एशियो बीजाणूअसतात व ते वाऱ्याने तृणधान्ये अगर गवतांवर पडल्यास त्यांपासून प्रथम यूरिडिया नावाचे बीजाणुपुंज आणि पीक पक्व होण्याच्या सुमारास टिलिया नावाचे बीजाणुपुंज निर्माण होतात. यूरिडियात युरिडो बीजाणु आणि टिलियांत टिलियो (अथवा टेल्युटो) बीजाणू असतात. अशा तऱ्हेने तृणधान्यांच्या खोडावरील काळ्या तांबेऱ्याचे जीवनचक्र पुरे होते. टिलिया बीजाणुपुंज काळ्या रंगाचे असतात आणि हा तांबेऱ्याचा प्रकार पानाप्रमाणे खोडावरही वाढतो म्हणून या तांबेऱ्याच्या प्रकाराला खोडावरील काळा तांबेरा हे नाव पडले आहे. बाजरीच्या पानावरील तांबेऱ्याच्या कवकाला पक्सिनिया पेनिसेटी  हे नाव आहे. या कवकाच्या यूरिडिया व टिलिया या अवस्था बाजरीवर आणि पिक्निया व एशिया या अवस्था वांग्याच्या पानावर आढळून येतातत्यामुळे हे कवकही भिन्नाश्रयी आहे. वर सांगितल्याप्रमाणे तांबेऱ्याच्या एकाश्रयी कवकांमध्ये सर्व प्रकारचे बीजाणुपुंज आणि बीजाणू एकाच जातीच्या वनस्पतींवर आढळून येतात.

गव्हावरील तांबेऱ्याचे प्रकार : (अ) काळा तांबेरा : (१) गव्हाचे पान, (२) आवरक, (३) खोड (आ) तपकिरी तांबेरा (इ) पिवळा तांबेरा.

विशिष्टीकरण : तांबेऱ्याच्या कवकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पोषक वनस्पतींबाबतचे विशिष्टीकरण. याबाबतीत गेल्या ७५ ते १०० वर्षांत पुष्कळ मौलिक संशोधन झाले असून पिकांचे रोगप्रतिकारक प्रकार निर्माण करण्यासाठी या ज्ञानाचा फार उपयोग झाला आहे. वर उल्लेखिलेल्या पक्सिनिया ग्रॅमिनिस  जातीच्या कवकात आठ उपजाती आहेत. या उपजातींमध्ये फारच थोडे आकृतिक (बीजाणूंचा आकार, आकारमान व संरचना यांबाबतींतील) भेद आढळून येतात परंतु जीवोपजीवितेच्या दृष्टीने या उपजाती अगदी भिन्न आहेत. प्रत्येक उपजाती विशिष्ट तृणधान्ये आणि गवतांवर अथवा फक्त विशिष्ट गवतावर वाढू शकते. या जातीच्या गव्हावरील उपजातीला ट्रिटिसाय हे नाव असून ती फक्त गहू, बार्ली व गवतांचे काही प्रकार यांवरच वाढते.

गव्हावरील काळा अगर खोडावरील तांबेरा या सर्वसाधारण नावाने ही उपजाती ओळखली जाते. राय धान्यावरील उपजातीला सिकॅलिस  आणि ओट धान्यावरील उपजातील व्हेना  अशी नावे आहेत. तांबेऱ्याच्या कवकांचे विशिष्टीकरण एवढ्यावरच थांबत नाही. गव्हावरील पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसाय  या खोडावरील तांबेऱ्याच्या कवकांत २५० पेक्षा जास्त क्रियावैज्ञानिक प्रजाती असल्याचे आढळून आले आहे. निरनिराळ्या प्रजातींमध्ये आकृतिक भेद आढळून येत नाहीत. त्यामुळे गव्हाच्या एकाच झाडावर खोडावरील तांबेऱ्याच्या एकापेक्षा जास्त प्रजाती असल्यास त्यांतील भेद डोळ्यांना दिसत नाहीत अथवा सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानेही ओळखता येत नाहीत. गव्हाच्या १२ प्रकारांच्या रोपट्यांवर तांबेऱ्याच्या कवकाची वाढकरून प्रत्येक प्रकाराच्या पानावरील बीजाणुपंजाच्या आकारमानाप्रमाणे हे क्रियावैज्ञानिक प्रकार ओळखता येतात. गव्हाचा एक प्रकार तांबेऱ्याच्या एका क्रियावैज्ञानिक प्रजातीला ग्रहणशील असतो, तर तोच प्रकार दुसऱ्या क्रियावैज्ञानिक प्रजातीला प्रतिकारक असतो. क्रियावैज्ञानिक प्रकारांमध्येउपप्रकार असल्याचे आढळून आले आहे. यावरून तांबेऱ्याच्या कवकांत विशिष्टीकरण कोणत्या मर्यादेपर्यंत पोहोचले आहे,याची कल्पना येते. गव्हाप्रमाणे अळशीवरील तांबेऱ्याच्या कवकात पोषक वनस्पतीबाबत विशिष्टीकरण आढळून आले आहे.


तांबेरा रोग लागवडीखालील अनेक पिकांवर, झाडांवर व जंगलातील वनस्पतींवर आढळून येतो परंतु या रोगामुळे भारतात गहू आणि अळशी या पिकांचे विशेष नुकसान होते. गव्हावरील तांबेरा रोगामुळे १९४६–४७ साली भारतात सु. ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा अंदाज आहे. ज्वारी, बाजरी, मका, ऊस, हरभरा, वाटाणा, चहा, कॉफी व अंजीर या पिकांचे व फळांचे तांबेरा रोगामुळे कमीजास्त प्रमाणात नुकसान होते. अनेक शोभिवंत झाडांवरही तांबेरा रोग आढळून येतो. गव्हावर पक्सिनिया  वंशातील तीन प्रकारच्या कवकांमुळे तांबेरा रोग उद्‌भवतो. पक्सिनिया ग्रॅमिनिस ट्रिटिसायमुळे पानांवर, पानांच्या आवरकांवर (खोडाला वेढणाऱ्या भागांवर), खोडांवर आणि ओंब्यांवर पीक हिरवे असताना लाल बीजाणुपुंज (युरिडिया) व पीक पिवळे पडण्याच्या सुमारास काळे बीजाणुपुंज (लिया) तयार होतात.

पक्सिनिया रिकाँडिटापक्सिनिया स्ट्रायफार्मिस या कवकांमुळे पानांवर आणि आवरकांवर अनुक्रमे तपकिरी आणि पिवळा ह्या नावाने ओळखले जाणारे तांबेरा रोग पडतात. यांत यूरिडिया बीजाणुपुंज अनुक्रमे तपकिरी व पिवळे असतात परंतु पीक तयार होण्याच्या सुमारास दोन्हीमध्ये काळे टिलिया बीजाणुपुंज तयार होतात. खोडावरील तांबेरा रोगाच्या वाढीसाठी उबदार व दमट हवामानाची आवश्यकता असते. तपकिरी आणि पिवळ्या या प्रकारच्या तांबेऱ्याच्या वाढीसाठी थंड हवामान आवश्यक असते. या रोगांचा प्रसार बीजाणूंमार्फत हवेतून फार दूरवर होतो.

उपाय : पोषक वनस्पतीच्या रोगप्रतिकारक प्रकारांची लागवड करणे हा सर्वांत स्वस्त आणि शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या परवडणारा उपाय आहे. कवकनाशकांचा उपयोग काही मर्यादेपर्यंत परिणामकारक असतो परंतु तो आर्थिक दृष्ट्या परवडणारा असेलच असे नाही. तांबेरा रोगप्रतिकारक असे गव्हाचे अनेक प्रकार भारतात व इतर देशांत उपलब्ध झाले आहेत.

संदर्भ : 1. Bessey, E.A. Morphology and Taxonomy of Fungi, New York, 1964.

           2. Singh, R.S. Plant Diseases, New Delhi, 1968.

           3. Walker, J.C. Plant Pathology, New York, 1969.

गोखले,वा. पु.