गारवेल : (इं. रेल्वे क्रीपर लॅ. आयपोमिया पामेटा कुल-कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी). ह्या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) वेलीचा प्रसार उष्ण कटिबंधात सर्वत्र, श्रीलंकेत व भारतात (प. द्वीपकल्प, महाराष्ट्र व कारवार) आहे. बागेत कुंपणावर व कमानीवर, रेल्वेच्या इमारतींवर व आसपास सामान्यपणे लावलेली आढळते. खोडे सामान्यतः बारीक, अनेक व त्यांवर वल्करंध्रे (सालीवरील सूक्ष्म छिद्रे) स्पष्ट दिसतात. पाने लहान व हस्ताकृती, काहीशी खोलपर्यंत विभागलेली, खंड लांबट व ३–७. फुले नाळक्यासारखी, मध्यम आकाराची, फिकट जांभळट, कंठाशी व नळीत गर्द किरमिजी, नाजूक व आकर्षक आणि वर्षभर कमी जास्त येतात. बोंडे लंबगोल व लहान. वेल सहज, जलद व भरपूर वाढते, त्यामुळेही ती लोकप्रिय झाली आहे [→ कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी].

सुपीक दुमट जमीन, भरपूर पाणी आणि भरपूर ऊन मिळाल्यास गारवेलीची आदर्श वाढ होते. तथापि ती प्रतिकूल परिस्थितीतही वाढण्याइतकी काटक असते.

या वेलीची अभिवृद्धी बहुतकरून छाट अगर दाब कलमाने करतात आणि क्वचित बियांपासूनही करतात.

खोड व मुळ्या जरी कडवट असल्या तरी हवाई बेटांत खाण्याकरिता वापरतात. मुळ्यांत आणि पानांत सायनोजेन हे विषारी द्रव्य किंचित प्रमाणात असते. दक्षिण आफ्रिकेत पित्ताच्या गांधींवर पाने वाटून लावतात. बियांमुळे जुलाब होतात. वेल दोरखंडासारखी वापरतात.

जमदाडे, ज. वि. चौधरी, रा. मो.

 गारवेल