वेंट, फ्रिट्स वारमोल्ट : (१८ मे १९०३-              ). अमेरिकी वनस्पतिवैज्ञानिक. वनस्पतींत वाढ चालू असताना तिचे नियंत्रण कसे होते व त्या वाढीला कारणीभूत असलेल्या हॉर्मोनांची (उत्तेजक स्रावांची) कार्यपध्दती कोणती यांसंबंधीचे विशेष संशोधन त्यांनी केले. हवामानादी बाह्य परिस्थितीचे व वनस्पतींचे परस्परसंबंध कसे असतात याबाबतही त्यांनी अध्ययन केले. नेदर्लंड्‌समधील उत्रेक्त येथे त्यांचा जन्म झाला व तेथील विद्यापीठातून त्यांनी एम्‌.ए. व पीएच्‌.डी. या पदव्या घेतल्या. ते प्रथम तेथेच वनस्पतिविज्ञानाचे मदतनीस होते. १९२८ मध्ये ते जावातील शास्त्रीय उद्यानाचे [→शास्त्रीय उद्याने] संचालक व पुढे दोन वर्षांनंतर तेथेच विदेशी लोकांकरिता असलेल्या प्रयोगशाळेचे संचालक झाले. ते कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक होते (१९३५-५८). त्यानंतर सहा वर्षे ते सेंट लूइसमधील मिसूरी शास्त्रीय उद्यानाचे संचालक व पुढे रेनोतील नेव्हाडा विद्यापीठाच्या डेझर्ट रिसर्च इन्स्टिटयूटचे सदस्य झाले. १९४७ मध्ये नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसमध्ये त्यांची निवड झाली.

    उत्रेक्त विद्यापीठात काम करीत असताना वेंट यांना ⇨वनस्पतींच्या चलनवलनापैकी  प्रकाशानुवर्तनात (प्रकाशाच्या दिशेकडे किंवा दिशेविरुध्द वाढण्याच्या प्रक्रियेत) विशेष गोडी वाटली व त्यांनी त्यातील रहस्य समजून घेण्याकरिता प्रायोगिक अभ्यास सुरु केला. त्यातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, वनस्पतींच्या वर्धनशील भागांतून (विशेषतः खोड व मुळे यांच्या टोकांतून) इतर भागाकडे सारख्या प्रमाणात पसरणारा व वाढीचे नियंत्रण करणारा विशिष्ट पदार्थ (वृध्दिहॉर्मोन किंवा ऑक्सिन) असतो. ज्या वेळी टोकापासून थोडे दूर असलेल्या भागात एकाच बाजूवर प्रकाश किरण पडतात, त्या वेळी प्रकाश न पडलेल्या भागात अधिक ऑक्सिन-पुरवठा होतो, तेथे वाढ अधिक होते व त्या अवयवाचे टोक प्रकाशाकडे वळते. मुळांच्या बाबतीत याउलट प्रक्रिया झाल्याने त्यांची वाढ प्रकाशाविरुध्द होते. हे वृध्दिहॉर्मोन (ऑक्सिन) त्यांनी जिलेटीन अथवा ⇨आगरमध्ये  शोषून घेऊन त्याच्या गुणधर्मांचाही अभ्यास केला. प्रकाश व उष्णता यांच्या सान्निध्यात ते स्थिर असते, असेही त्यांना आढळले. हाच शोध रशियन वैज्ञानिक एन्‌. कोलोड्‌नी यांनी त्याच वेळी स्वतंत्र रीत्या लावल्याने हा प्रकाशानुवर्तन सिध्दांत वेंट-कोलोड्‌नी या नावाने प्रसिध्द आहे.

पुढे वेंट यांनी अधिक प्रयोग करुन वनस्पति-विकासातील हॉर्मोनांचे महत्त्वाचे कार्य विशद केले. १९३९-४९ या काळात त्यांनी काल्टेकमध्ये अनेक वातानुकूलित ⇨पादपगृहे  बांधविली व त्यांच्याद्वारे भिन्न प्रकारच्या हवामानांचा वनस्पतींवर कसा परिणाम होतो, याचा अभ्यास केला. हवामानात अंतर्भूत असलेल्या उष्णता, ओलावा, वायू इ. घटकांचा वनस्पतींच्या विकासावर भिन्न परिणाम होतो, असे त्यांना आढळले. रात्रीपेक्षा दिवसातील कमाल तापमानात वनस्पतींची अधिकात अधिक वाढ होते व त्या तापावर्ती (दिवस व रात्र यांमधील बदलत्या तापमानास अनुकूलन दर्शविणाऱ्या) आहेत त्यांची दैनिक तापावर्तिता समशीतोष्ण कटिबंधातील अनेक वनस्पतींच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या ऋत्विक (बदलत्या ऋतुमानातील) तापावर्तितेचे प्रतिरुप असते आणि त्यांचा प्रसारावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये वनस्पती ज्या सामान्य हवामानाच्या चक्रातून जाते त्यांचा अंतर्भाव होतो इ. निष्कर्ष त्यांनी काढले व एकंदरीत प्रायोगिक ⇨परिस्थितिविज्ञानाच्या  विकासाला मोठी चालना दिली.

वेंट यांनी पुढे वनस्पतींतील बाष्पनशील द्रव्यांकडे विशेष लक्ष दिले असून त्यांच्या मते टर्पिने व इतर वनस्पति-प्रसर्गे (निस्सृतद्रव्ये) यांचे हवेत विसरण होऊन नंतर प्रकाशरासायनिक क्रियेने त्यांचे अतिसूक्ष्म कणांत रुपांतर होते त्यापासून पुढे नीलोष्णता किंवा उन्हाळी विरल धुके बनते व ती संघनन-केंद्रे समजून त्यांचे मापन करता येते.⇨केनेथ व्हिव्हिअन थिमान यांच्या सहकार्याने त्यांनी १९३७ मध्ये फायटोहॉर्मोन्स व १९५७ मध्ये स्वतः एक्सपेरिमेंटल कंट्रोल ऑफ प्लँट ग्रोथ हे ग्रंथ प्रसिध्द केले आहेत.

पहा : परिस्थितिविज्ञान वनस्पतींचे चलनवलन वृध्दि, वनस्पतींची हॉर्मोने, वनस्पतींतील

परांडेकर, शं. आ.