चिनार: पान व स्तबक फुलोरे

चिनार : (बना, बोनिन इं. ओरिएंटल प्लेन, यूरोपियन प्लेन ट्री, ओरिएंटल सिकॅमूर लॅ. प्लँटॅनस ओरिएंटॉलिस कुल-प्लँटॅनेसी). हा मोठा, सुंदर, सु. ३० मी. उंच व १२ मी. घेराचा पानझडी वृक्ष मूळचा पूर्व भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील असून तेथून पूर्वेस त्याचा प्रसार झाला. वायव्य हिमालयात सतलजच्या पश्चिमेस १,२००–२,४०० मी. उंचीवर त्याची लागवड करतात या वृक्षाचा समावेश वनस्पतिविज्ञानात प्लँटॅनेसी कुलात (द्विदलिकित, आवृतबीज) करतात या कुलामध्ये फुलात संदले व प्रदले ३–६ पुं.-पुष्पात संदलांइतकी केसरदले व तंतुहीन परागकोश स्त्री-पुष्पात संदलांइतकी ऊर्ध्वस्थ मुक्त किंजदले व वंध्य केसरदले आणि प्रत्येक किंजपुटात एकच सरळ आणि लोंबते बीजक असते. [⟶ फूल]. बियांत पुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश) फारच कमी असतो.

चिनार वृक्षाचे खोड आखूड व पर्णसंभार डेरेदार व पसरट असतो. साल फिकट करडी असून तिच्या मोठ्या ढलप्या निघतात. पाने साधी, सोपपर्ण (उपपर्णयुक्त) एकाआड एक व हस्ताकृती, ५–७ खंडयुक्त, १२–२० सेंमी. लांब व अधिक रुंद असतात. एकलिंगी फुले दाट, गोलसर स्तबकावर पण एकाच झाडावर येतात व फळांचा लोंबता गुच्छ सु. तीन सेंमी. व्यासाचा असून त्यात पुष्कळ, लहान, एकबीजी कृत्स्नफळे (एकबीजी, शुष्क व न फुटणारी फळे) असतात. पंजाबात व काश्मिरात शोभेचा वृक्ष म्हणून याला बरेच महत्त्व आहे. मोठ्या उद्यानांत, कुंपनाच्या कडेने आणि रस्त्याच्या दुतर्फा मुद्दाम सावलीकरिता लावतात. त्याची क्वचित तोड करतात व खूप वाढू देतात. त्याला भारी, ओलसर व उत्तम निचऱ्याची जमीन लागते आणि ओढ्या-नाल्यांच्या काठांवर तो चांगला वाढतो. त्याला कडक थंडी बाधत नाही. प्रथम रोपे तयार करून छाट कलमे व दाब कलमे करून त्याची अभिवृद्धी (लागवड) करतात तो जलद वाढतो.

डोळे आल्यास ताजी पाने कुसकरून त्याचा लेप लावतात. साल शिरक्यात उकळून अतिसार, आमांश, अंतर्गळ (हार्निया) व दातदुखी यांवर देतात. सालीत रक्तपित्तव्याधी (क जीवनसत्त्वाच्या अभावामुळे येणारी अवस्था, स्कर्व्ही) रोधक व संधिवातरोधक गुणधर्म असतात. लाकूड पांढरे व त्याला पिवळी किंवा तांबूस छटा असते. ते सुबक मध्यम कठीण व वजनदार (दर घ. मी. चे वजन ६५७ किग्रॅ. असते, पण ते बळकट नसते. ते रापविताना वाकडेतिकडे होते, तथापि सावलीत चांगले टिकते रंधून चांगले गुळगुळीत होते व त्याला उत्तम झिलई करता येते. काश्मिरात त्याचा उपयोग लहान पेट्या, भिन्न आकाराची तबके व तत्सम वस्तूंकरिता वापरतात नंतर लाक्षारास व रंगलेप लावून त्या रंगवितात. आशियात व यूरोपात त्याचा उपयोग सजावटी सामान, कपाटे, पृष्ठावरणाचे तक्के, गाड्या, कोरीव व कातीव कामे, लगदा इत्यादींसाठी करतात. सालीत १·५% प्लँटॅनीन, ५·९% टॅनीन व ७·३% टॅनीनेतर द्रव्ये असतात. प्ररोह (कोंब) व पाने यांमध्ये ॲलंटॉइन व मुळांत ६% फ्लोबॅफेन असते. या वृक्षाच्या रसात ९०% मॅनिटॉल असते. कळ्यांपासून जिबरेलिनासारखे वनस्पतिवृद्धिकारक द्रव्य वेगळे केले आहे. फळांशिवाय इतर सर्व भागांत प्लँटॅनोलिक अम्ल (ट्रायटर्पेन) आढळते.

पहा : सिकॅमूर.

जमदाडे, ज. वि.