कोष्ठ : (गु. औप्लेट हिं. कठ सं. कुष्ठ इं. कॉस्टस लॅ. सौसुरिया लाप्पा कुल-कंपॉझिटी). या सु. दोन मी. उंच, बळकट ओषधीचा [→ ओषधि] प्रसार काश्मीर (सु. २,४८०–३,७२० मी. उंचीपर्यंत), हजारा, हिमाचल प्रदेश व गढवाल येथे आहे. शेंड्याकडील भाग लवदार तळाकडील पाने मोठी व सपक्ष देठाची, वरची पाने  लहान व त्यांच्या तळाशी दोन लहान खंड खोडाला वेढून राहतात सर्व पाने वरून खरबरीत व खालून गुळगुळीत, अनियमित व दातेरी असतात. फुले गर्द जांभळी, बिनदेठाची असून दोन ते पाचाच्या झुबक्यांनी स्तबकात येतात. फळ लहान, वाकडे, चपटे व भुरे असते.

मूळ पौष्टिक, वायुनाशी, दीपक (भूक वाढविणारे), वाजीकर (कामोत्तेजक), मूत्रल (लघवी साफ करणारे), जंतुनाशक, सुगंधी व उत्तेजक असून दमा, खोकला, विषमज्वर व पटकी यांवर उपयुक्त जुनाट त्वचा रोग, रक्तदाब, संधिवात इत्यादींवर देतात. मुळे सप्टेंबर-ऑक्टोबरात गोळा करतात त्यात सौसुरीन हे अल्कलॉइड, बाष्पनशील (उडून जाणारे) तेल, कडू राळ इ. असतात. मुळांचा उपयोग धूप, उंची अत्तरे, सुगंधी तेले, कीटकनाशके इ. बनविण्यासाठी करतात. लोकरीच्या कपड्यांना कसर लागू नये म्हणून मुळे त्यांत ठेवतात. त्यामुळे कपड्यांना सुगंधही येतो. हिमाचल प्रदेशात या वनस्पतीची मोठी लागवड असून दरवर्षी सु. २,००० टन मुळे निर्यात होतात.

पहा : कंपॉझिटी.

जमदाडे, ज. वि.