कोनफळ : डायॉस्कोरिया  वंशातील जाती. या वेलाच्या जमिनीत पोसलेल्या ग्रंथिल मुळाला कोनफळ म्हणतात. भारतात सर्व राज्यांत, त्यातल्या त्यात पं. बंगाल, बिहार आणि ओरिसा या राज्यातं याची लागवड करतात. कोनफळात अनेक प्रकार आहेत. गुजरात मधील एका प्रकारची (डायॉस्कोरिया ग्लोबोजा ) ग्रंथिल मुळे शिजविल्यावर त्यांना कमोद जातीच्या भातासारखा सुवास येतो म्हणून त्यांना ‘कमोदिओ’ म्हणतात. त्यांची ग्रंथिल मुळे गोल व इतर प्रकारांतील मुळांपेक्षा वेगळ्या आकाराची, चार-पाच किग्रॅ. वजनाइतकी मोठी असतात. डायॉस्कोरिया ॲलाटा  प्रकार पुर्पुरिया  याच्या ग्रंथिल मुळांची साल आणि आतला मांसल भाग दोन्ही लालसर असतात. ही मुळे मध्यभागी फुगीर आणि दोन्ही टोकांकडे निमुळती असतात. ती प्रत्येकी तीन–चार किग्रॅ. पर्यंत वजनाची असतात. डायॉस्कोरिया ॲलाटा  प्रकार रुबेल्ला  याची ग्रंथिल मुळे तांबूस सालीची, लंबगोलाकार आणि आतून पांढरी असतात. प्रत्येक वेलाच्या बुंध्याशी एक मोठे आणि एक दोन लहान मुळे मांसल बनतात. सर्व परिस्थिती समाधानकारक असल्यास ती १५–२० सेंमी. लांब आणि वजनाने ६२ किग्रॅ. इतकी मोठी होऊ शकतात.

या वेलाला चांगल्या निचऱ्याची कसदार, मोकळी जमीन मानवते. दख्खनमध्ये कोनफळ बागायती पीक म्हणून लावतात. कोकण भागात लहान प्रमाणावर पावसाळ्यात जिरायत लागवड करतात.

या वेलाला चढण्यासाठी आधार आवश्यक असतो. आधार न दिल्यास वेलाची वाढ चांगली होत नाही, मुळे पोसून मांसल होत नाहीत आणि त्यामुळे उत्पन्न कमी येते. वरखत देऊन भर दिल्यास प्रतिहेक्टर १७,००० किग्रॅ. पेक्षा जास्त उत्पन्न येते.

पाटील, ह. चिं.

या वेलाला कंदकूज हा रोग स्क्लेरोशियम रोल्फसाय  या कवकामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीमुळे) होतो. कवकाचे विश्रामी बीजाणू (लाक्षणिक प्रजोत्पादक भाग) जमिनीत जिवंत राहतात म्हणून पिकांची फेरपालट करतात. निरोगी बेणे लावतात. रोगट रोपटी उपटून जाळतात. 

पहा: गोराडू.

कुलकर्णी, य. स.